Monday, May 7, 2018

शुक्रतारा ...मराठीतली भावगीते मला अतिशय प्रिय... आणि त्यांत सुद्धा ज्येष्ठ गायक, अरुण दातेंनी स्वरबद्ध केलेली गाणी म्हणजे तर एक सुरेल मेजवानीच...दोन पिढ्याच नव्हे तर पुढच्या कितीतरी पिढ्यांच्या मनांवर अधिराज्य गाजवेल असा तो आवाज...अतिशय हळवा, थरथरता , मिठास आणि लोभस असा तो स्वर ...  पार हृदयाच्या तारांना जाऊन भिडणारा...हलकेच अंतरंग हलवून त्यात भावनांची असंख्य तरंग वलये क्षणात निर्माण करणारा ... माझ्या जीवनात खरी मराठी गाण्यांची आवड निर्माण झाली ती या शुक्रताऱ्याच्या स्वरांनी...मला बहुतेकदा गाण्यातील शब्द अधिक भुरळ पाडतात पण अरुण सरांच्या आवाजात अशी काही मोहिनी होती कि मी फक्त शब्द आणि चालच नव्हे तर या आवाजाच्या खऱ्या प्रेमात पडायचे....त्यांची ती मधुर गाणी किती आणि ती कितीदा ऐकली असतील मी...काही गीते तर विशेष हृदयाला भिडून जायची.... ' या जन्मावर ... या जगण्यावर शतदा प्रेम करावे... ' या गीताच्या प्रत्येक ओळीत जगण्यावर भरभरून प्रेम करावे असेच वाटायचे, मनावर पांघरून घेतलेल्या उसन्या दुःखाचे ओझे काही काळ तरी हलके वाटायचे ...' देवाघरच्या फुला सोनुल्या , देवाघरच्या फुला...' ऐकले आणि आपलेच बालपण मनाच्या अंगणात रांगत येत असे... भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी आणि त्यांची अधुरी राहिलेली कहाणी...  मनात एक वेगळीच कालवाकालव करून जायची...याउलट येशील येशील येशील राणी म्हणत साखरचुंबन मागणारा तो आवाज नकळत मनाला वेड लावून जाई ...'जेव्हा तिची अन माझी चोरून भेट झाली... ' हे कानी आले आणि खरेच फुले कळ्यांत आणि झाडे भरात आल्याचा भास होत असे...'डोळे कशासाठी ? कशासाठी?... ' ऐकताना मनात विचार तरळून जायचा, हे गाणे कशासाठी? कशासाठी ? मनात साठवून भिजून जाण्यासाठी...त्यांचे एक गीत सांगते ,' शब्दमाळा पुरेशा न होती , स्पर्श सारेच सांगून जाती... ', पण त्या आवाजाची कमाल अशी होती कि गात्रात गायलेला तो एक झंकार सुद्धा त्या गीताचे सारे मर्म अचूक सांगून जाई... 'जपून चाल पोरी जपून चाल...' ऐकले की हासून होतेच मुलगी लाजून लाल... त्यांची गाणी ऐकताना वाटे ' आज मी तुझ्यासवे, तुझ्यात मी विसावले...' आणि या मधूर कर्णस्पर्शाने रात्र कुसुंबी बहराची होऊन जाई... दिल्या घेतल्या वचनांच्या बकुळफुलांची शपथ घालणारा हा आवाज....' दिवस तुझे हे फुलायचे ' म्हणत झोपाळ्यावाचूनच मनाला मनसोक्त झुलवायचा...'दिस नकळत जात गेले आणि दूरदूरच्या चांदण्यात मन असेच हिंडत राहिले...कधी ' धुके दाटलेले उदास उदास...' या शब्दस्वरांनी लक्ष भासांनी मन वेढले गेले...त्यांची गीते ऐकली कि मनोमन हेच वाटायचे कि आता ' सूर जुळले, शब्दही जुळले , जुळले मधुमय गीत...इतकेच काय तर 'श्री राम जय राम जय जय राम...' या सदासुखी रामनामास अविरत ओठी आणण्याचे पवित्र कामसुद्धा या आवाजाने केले आहे...'उघडा दार घराचे ,उघडा दार मनाचे' असे गात प्रत्येकाच्या हृदयातील आत्मारामाला जागे करण्याचे पुण्यकर्मही या वाणीने न्यायाने साकारले आहे... अबोला दूर करण्यासाठी स्वतःचा रंग आणि गंधही देणारा हा स्वर... संधीकाली धुंदलेल्या दिशादिशांमध्ये बावरलेली प्रीत जागवणारा हा स्वर... मलमली रात्रीची वाट पाहणारा हा स्वर...स्वरगंगेच्या काठावरती वचन घेणारा हा स्वर...माझ्यासारख्या सखी शेजारणीला हलकेच मनातल्या मनात हसवत राहतो आणि मग हास्यांत पळे आपसूकच गुंफली जातात...' ही पौर्णिमा , हे चांदणे येईलही पुन्हा , माझे तुझे गाणे परि उमलेल का पुन्हा ? असे विचारणारा तो 'मंदावणारा शुक्रतारा ...' आज ' डोळ्यांत सांजवेळी आणू नकोस पाणी...' म्हणत समजावतो आहे...

असेन मी , नसेन मी, तरी असेल गीत हे 
फ़ुलाफ़ुलात येथल्या उद्या हसेल गीत हे 

- रुपाली ठोंबरे

4 comments:

  1. खूपच छान रचना !!

    ReplyDelete
  2. Tuzhe karave tevdhe kautuk kami aahe tuzhya hatat saraswati aahe rupa

    ReplyDelete
  3. रूपाली, अरूण दातेंच्या एकेका भावगीतांबद्दल बोलायचे तर जागा,  वेळ आणि शब्द कमी पडतात. पण तू इतक्या साऱ्या गीतांना एकत्र गुंफून थोडक्यात पण सुंदर शब्दांमध्ये आदरांजली वाहिली आहे ते खूप छान वाटले.

    ReplyDelete

Blogs I follow :