Tuesday, January 30, 2018

Happy Birthday'

 
तुझ्या वाढदिवसाचा केक 
बघ, हा मी साकारते आहे 

साखरेसोबत शुभ्र मावा आला
आणि प्रयत्न आता होतोय साकार
उबदार मायेचा स्पर्श झाला 
आणि जन्म घेई एक आकार 

सर्वांच्या स्नेहाचा रंग गुलाबी 
अन आनंदाचा रंग तो पिवळा
त्यात दिसे तुझ्या स्वप्नांची छबी 
पहा, आहे कि नाही केक भारीच निराळा 
 
शुभेच्छांच्या क्रीमची नाजूक झालर 
मेणबत्तीवर डोलते आशीर्वादाची ज्योत 
या प्रकाशात तेजाळते केकची सुंदर किनार 
जसा हसऱ्या चेहऱ्यावर आहे एक प्रकाशी झोत

तुझ्या सुंदर नावाच्या शब्दाची चॉकलेटी नक्षी
सोबत लालचुटुक चेरीची करामत जादुई
Happy Birthday देखणे पहा नटलेले पक्षी 
केक कापायला आता नको करू जास्त घाई

 - रुपाली ठोंबरे

Tuesday, January 23, 2018

हस्ताक्षरे


उभ्या रेषा... आडव्या रेषा... तिरप्या रेषा 
वलयांच्या वळणांच्या अनेक दिशा 
या वक्राकार दिशा आणि रेषांची कार्यरेषा मात्र एकच
अक्षरांना घडवण्याची...आणि त्यातून संस्कार घडवण्याची 

लिपी निराळी...संस्कृती निराळी... भाषा निराळी 
प्रत्येकाच्या लेखणीतील ढब आगळी 
या लेखणीची आणि विविधतेची आकांक्षा मात्र एकच 
संवादांना योजण्याची... आणि त्यातून नाती घडवण्याची 

सुंदर अक्षरे...शुद्ध अक्षरे...सोज्वळ अक्षरे 
मनाचा आरसाच जणू ही हस्ताक्षरे 
या अक्षरांची आणि भावनांची अभिलाषा मात्र एकच 
विचारांना मांडण्याची...आणि त्यातून माणूस घडवण्याची

जागतिक हस्ताक्षर दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 
सुंदर वाचा... शुद्ध विचार करा... स्वतःच्या अक्षरांत स्वतःचे शब्द लिहा...

वाचा : जागतिक हस्ताक्षर दिन

                                                                                      - रुपाली ठोंबरे.


Thursday, January 4, 2018

चूरा काचांचा...आज ऑफिसमध्ये येताना रस्त्याच्या एका कडेला पावलोपावली येत होता काचांचा चूरा... दिसत होते काही गाड्यांचे जाळल्यानंतरचे भग्न अवशेष...हे सारे पाहून मन अगदी विषण्ण झाले... अगदी एखाद्याने कसे पैसे जमवून एखादी आपली आवडती कार विकत घेतली असेल... तीतून तो अनेकदा आपल्या चिमुरडीसोबत तिच्या शाळेत गेला असेल , बायकोला फिरायला घेऊन गेला असेल , गावाहून आलेल्या आपल्या वृद्ध आईबाबांना घरी आणले असेल... अशा किती आठवणी होत्या त्या  गाडीमध्ये... कितीतरी वर्षांपासून पाहिलेल्या स्वप्नाच्या पूर्ततेचे प्रतीक असेल ती गाडी... पण काल काही क्षणांतच जातीयतेच्या वादावादीत त्या सर्व आठवणींचा आणि स्वप्नांचा चुराडा झाला... इन्शुरन्सवाल्यांकडून खूप हेलपाटे मारल्यानंतर काही पैसे तर नक्कीच मिळतील पण सोबत त्या गोड आठवणींवर या भीषण घटनेचे पडसाद पुढे कित्येक वर्षे त्या मनांवर राहतील. रिक्षाच्या रोजच्या उत्पन्नावर आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करणाऱ्या बिचाऱ्या जीवाला आता तुटलेल्या काचांच्या तुकड्यात कितीतरी दिवस रेंगाळत राहावे लागेल. फुटलेल्या काचेच्या खिडक्या आणि त्याखाली रस्त्यावर पडलेला तो चमकता चूरा खूप सारे निरुत्तरित प्रश्न विचारत होता.... मला फोडणाऱ्याने एकदा तरी ज्या कारची खिडकी ते फोडत आहेत , ज्यांच्यावर दगड फेकत आहेत त्याच्या रक्ताचा रंग पाहिला का ? जर जवळ जाऊन तो रंग पाहिला असता तर समजले असते कि आपण एकच आहोत... सर्वांचा जीव हा एकाच विश्वशक्तीचा भाग आहे, देश-वेष-भाषा जरी विभागले गेले असतील तरी सर्व एकाच मातीतून जन्मले आणि एकाच मातीत विलीन होतील... पण हे सर्व सांगणार कोणाला? ते फक्त फोडत गेले ... जाळत गेले. आणि या सर्वात नकळत जळत गेली ... माणुसकी. त्यात किती निष्पाप जीव होरपळले असतील त्याचा विचार त्या मनांत आलाच नसेल का? सुंदर भारताचे स्वप्न साकारण्यास समर्थ असणारे हात जेव्हा सरकारी गाड्या ,स्टेशन्स वर उठतात तेव्हा हा देश कितीही प्रयत्न करून का मागे राहतो या प्रश्नाला अचूक उत्तर मिळते आणि मग प्रत्येकजण नुसताच मुग्ध होऊन स्तब्ध होतो...कारण त्याच्या आणखी एका स्वप्नाचा चुरा त्या ठिकाणी झालेला असतो... स्वप्न सुंदर भारताचे ... स्वप्न विविधतेतून असलेल्या एकतेचे...

आपल्या देशाचा इतिहास खूप सुंदर आणि प्रेरणादायी आहे त्यातून शिकून पुढे प्रगती करत आपल्या वीरांना खरी श्रद्धांजली द्यायला हवी पण इतिहासाच्या पानांवरती झालेल्या घटनांची मुळे आज पुन्हा अशाप्रकारे उन्मळून काढत नव्या जातीवादाला जन्म दिल्याने आजचा वर्तमानदेखील अशीच एखादी दुर्दैवी घटना बनून इतिहासात जमा होईल. उद्या पुन्हा त्या घटनांना उजाळा देऊन भविष्यात वातावरण मालिन करण्याचा प्रयत्न होईल. आणि या सर्वांत शिकार मात्र नेहमीच एक सामान्य नागरिक होत असतो. त्याच्या स्वप्नांचा चुराडा हा असा क्षणांत होत जातो आणि मग उरते ती फक्त एक चर्चा...  कोणी केले ? का केले ? काय चुकले ? कुणाची चूक ? कोण चांगले आणि कोण वाईट ? मी काय करू शकतो ? आपल्या हातात काहीच नाही ? सर्व ठीक कसे आणि कधी होईल?....... 

- रुपाली ठोंबरे.

Monday, January 1, 2018

आज नव्याने...

आपल्या मनातल्या सुकलेल्या पानांना फुलवण्याचा प्रयत्न नित्य सुरु असावा म्हणजे एक दिवस एक टुमदार शेत मनाच्या वाऱ्यावर डुलताना आढळेल

अगदी बालपणापासून असंख्य स्वप्ने प्रत्येकाच्याच मनाशी नेहमी रुंजी घालत असतात...पण इतर गोष्टींमुळे कधी मुद्दाम तर कधी अनावधानाने त्यांकडे दुर्लक्ष्य होते...आणि मग त्या दुर्लक्षित राहिलेल्या स्वप्नांच्या कळ्या न उमलताच कोमेजू लागतात...त्यातील एखादी कळी उमलून फुल होईपर्यंत अशा अनेक नव्या कळ्या नव्याने जन्म घेऊन निर्माल्य होण्याच्या तयारीत असतात... इतके दिवस या सुकलेल्या कळ्या एक सल बनून मनात कितीतरी वर्षे टोचत राहतात... तेव्हा या वर्षी जर मनात आणले तर आज या कळ्यांची पुन्हा भेट घेऊन पाहू... बघू , काही त्राण कमी करता येत असेल तर ... जरा जवळ जाऊन पाहिले तर जाणवेल कि ती सुकलेली न उमललेली फुले अजूनही मनात कुठेतरी जिवंत असतात , त्यांच्यात नव्याने जगण्याची उर्मी असते पण आपल्याकडेच त्यांच्यासाठी वेळ नसतो...मग आपल्यालाच नकळत वाटेल कि चला, या स्वप्नांना आज नक्कीच न्याय त्यायला हवा ...

आजचा नववर्षाचा पहिला दिन...तोच सूर्य नेहमीप्रमाणे काळोखाचे साम्राज्य धुळीत मिळवून नवे रंग घेऊन आकाशी आला... सभोवताली पक्षी , झाडे , पाणी सारे सारे अगदी रोजसारखेच... पण तरीही जग आज निराळे भासत होते... कारण रोजचाच तोच सूर्य आज मात्र अधिक स्फूर्तिदायी वाटत होता... त्याच्या प्रकाशाने मनात एक नवे चैतन्याचे कारंजे जन्माला आले... त्या तेजकणांनी अंग अंग उत्साहाने प्रेरित झाले...आयुष्यभरच्या स्वप्नांच्या सुकलेल्या कळ्यांना नवसंजीवनी लाभली... त्याच कळ्यांना पुन्हा एकदा नव्याने गोंजारण्याचे भाग्य या जन्मी लाभले... आज जिथे सारे जण नवे संकल्प करण्याच्या तयारीत असतात तिथे आपण मात्र आपल्याच जुन्या, काळाच्या ओघात खोल गर्तेत बुडालेल्या इच्छा-आकांक्षांना सावरून पैलतीरी आणण्याच्या प्रयत्नात जाऊया...त्यांना वेळेच्या योग्य नियोजनाचे आणि निश्चयाचे बळ देणारे नवे पंख देण्याचा प्रयत्न करूया... आणि हे करत असताना खरेच असे वाटेल  जणू खूप पूर्वी अशी एखादी कविता सुचली... २ ओळी लिहिल्या आणि मग नंतर पुढच्या ओळी राहूनच गेल्या... तो कागद त्या अर्धवट राहिलेल्या कवितेला घेऊन कितीतरी वर्षे नव्या शब्दांच्या प्रतीक्षेत वाऱ्यावर उडत राहिला पण आज मात्र त्या कवितेला नवे शब्द लाभले आणि ती आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे...

या कवितेसारखेच काहीसे आपल्या स्वप्नांचे , संकल्पांचे असते , नाही का? नवा संकल्प सुरु करून तो असा अर्धवट राहून जाण्यापेक्षा या वर्षी जुन्याच स्वप्नांना खतपाणी घालून ताजे करून फुलवले तर...जीवन नव्या अर्थाने सार्थ होईल , आपलाच आपल्याबद्दलचा आत्मविश्वास दृढ होईल, नाही का ?... एक कविता पूर्ण झाली कि नव्या कवितेसाठी शब्द आपली ओंजळ आपसूकच पुढे करतील आणि मग आपल्यातील आत्मविश्वासाच्या जोरावर जन्म होईल आणखी एका नव्या कवितेचा. अशा प्रकारे आयुष्याच्या शेवटी फक्तच अर्धवट रचनांनी हिरमुसलेल्या कोऱ्या पानांपेक्षा एखादा मोजकाच कवितासंग्रह नको का ठायी असायला? अंतःकरणाच्या कोपऱ्याशी अहोरात्र टोचत राहणाऱ्या अर्धवट राहिलेल्या स्वप्नांच्या कळ्यांऐवजी फुललेल्या मोजक्याच पण आवडत्या फुलांचा गुच्छ जास्तच सुख देऊन जाईल , हो कि नाही ? विचार करून पहा आणि हो , सोबत कृतीपण...मग चला तर कामाला लागूया... नव्या वर्षाच्या जुन्याच स्वप्नांना नव्याने फुलवण्याकरता ... आणि त्यासाठी तुम्हां सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा !!!

- रुपाली ठोंबरे

Blogs I follow :