रोजच्या त्याच वातावरणात राहून कंटाळलेल्या मुलाला काहीतरी वेगळेपण म्हणून सहज माझ्या एका बालमैत्रिणी कडे घेऊन गेले.' आपण कुठे जात आहोत?' ','कशाला ?','मी ओळखतो का ?" अशा त्याच्या असंख्य बोबड्या प्रश्नांना उत्तरे देत शेवटी मी त्या परिसरात पोहोचले. तब्बल १५ वर्षांनी मी येथे आले होते. अनोळखी वाटत असला तरी ओळखीच्या खाणाखुणा अजूनही पुसटशी वाट काढत भूतकाळ स्मरण करून देत होत्या. काही दिवसांपूर्वीच फेसबूक वर नव्याने ही बालमैत्रीण भेटली आणि सुट्टीत तिच्या आईकडे आली म्हणून प्रत्यक्षात भेटण्याचा बेत आखला होता आम्ही.
१५ वर्षांपूर्वीचे तिच्या आईचे घरही आता नव्याने सजले होते. आसपास बरेच काही बदलले होते.हा बदल अनुभवतच आम्ही तिच्या दारासमोर आलो. मी तिच्या घरी गेले कि कायम सताड उघडा असणारा तिचा दरवाजा आज बेलच्या प्रतीक्षेत होता. संध्याकाळ असतानाही तो उकाडा नकोसा होत होता… आत शिरल्यावर AC च्या शीतप्रवाहात हायसे वाटू लागले. मग गप्पा रंगल्या. मुलेही आसपासच खेळत होती.त्यांची आता छान गट्टी जमली होती.
मग अचानक बालपण रांगत रांगत यावे तसे संभाषणात ते नकळत आले. बालपणीच्या खास गप्पांमध्ये सर्वात महत्त्वाचा काळ होता तो म्हणजे उन्हाळ्याची मिळणारी भलीमोठ्ठी सुट्टी.
"मराठी असो वा इंग्लिश, व्याकरणाच्या आणि अक्षरांच्या दृष्टीने पाहायला गेलो तर 'मे ' महिना सर्वात लहान. पण मज्जा करण्यासाठी 'मे ' महिना म्हणजे खूप मोठा ,आनंदाचा,आणि आवडीचा … कितीही मस्ती करा , अभ्यासाला तर मोठ्ठी दांडी ,छोटे-मोठे, हवे-नको ते सारे सारे करण्याचा सर्वांचाच आवडता महिना… आज कॉर्पोरेट जगतात या महिन्याला महत्त्व तसे कमीच . पण आपणा सर्वांना एका हव्याहव्याशा भूतकाळात घेवून जातो तो हा आपला लाडका महिना…. मे महिना."
सारिकाच्या या बालआठवणींमध्ये मीही भर घालत पुढे बोलू लागले,
" अगं हो ना , साधारण ३० एप्रिलला प्रशस्तिपत्रक हाती पडायचे. मोठयाना हवे ते गुण मिळवून दाखवले कि तेही खूशच. त्यावेळी पालकांच्या अपेक्षाही जास्त नव्हत्या म्हणा. मग काय ? बाहेर वैशाखाचे भर दुपारचे रणरणते ऊन असो किंवा रात्रीचे टपोरे चांदणे… आपली ओढ सतत बाहेर असायची…. मित्रमैत्रिणीकडे. त्या काळी ना आतासारखे मोबाईल ,न वेगवेगळे कॉम्प्यूटर वरचे महागडे गेम्स ना केबलवर भरमसाठ च्यांनेल्स. घरी बसल्याबसल्या कंटाळा यायचाच मग कामी यायचे बैठे खेळ … कैरम , बुद्धिबळ ,सापशिडी ,नवा व्यापार,भातुकली यांसारख्या खेळांत दिवस कसा निघून जायचा कळायचेच नाही. साऱ्यांचीच सारखीच स्थिती म्हणून नेहमी सोबती मिळायचेच.याच्या घरी कधी त्याच्या घरी… सतत ये-जा. शिवाय कोणी गावावरून इथे आले कि एक वर्षापूर्वी भेटलेल्या भावंडासोबत नव्याने खेळ रमायचे. बैठया खेळांतून काही वेगळेपण म्हणून मग बाहेर नवे खेळ रंगायचे. मुलं म्हटली कि क्रिकेट ,विटीदांडू,गोटया ,भोवरा … आणि आपण मुली छान लंगडी ,चीप्पी-चीप्पी नाहीतर एक मोठ्ठा भातुकलीचा डाव मांडायचो .आठवते ? आपण एकदा आपल्या बाहुला बाहुलीचे लग्न सुद्धा लावले होते …. "
" हो आठवते ना … खूप मोठा थाट होता तो . शेवट भांडणात झाला होता तरी खूप मज्जा आली होती .कित्ती कित्ती खेलोय्चो आपण तेव्हा. लपाछुपी , पकडापकडी ,रंगरंग ,तळ्यात-मळ्यात असे कित्तीतरी खेळ… छोटे मोठे काही खेळ तर आता आठवत ही नाहीत."
म्हणत गार गार लिंबूपाणी घेऊन सारिका जवळ आली.
ते गार सरबताचे ग्लास हातात घेतले आणि १५ वर्षांपूर्वीचा तो शाळेशेजारी मिळणारा चम्मचगोला आठवला.ते झाडावरची चिंचा ,बोरे पाडणे ,घरातून चोरून आंबे-कैऱ्या आणून भातुकलीमध्ये त्या चिमुकल्या हातांनी थाटलेला पन्हे आणि लोणच्याचा घाट आठवला. ते आठवून माझे मलाच हसू आले. आणखी काहीसे आठवून मी म्हटले ,
" सारिका आठवते का ? आपल्या आई पापड, लोणचे वैगरे घालायच्या तेव्हा उन्हात काही वाळत घातले कि आपण बसायचो राखण म्हणून. आणि तेव्हा तर कित्ती मज्जा करायचो. सुट्टीत मामाच्या घरी जायचे आणि गावाकडची मज्जा…. ती तर काही औरच. खरेच ते दिवस अगदी आपले हक्काचे असायचे. पुन्हा यायला हवे असे बालपण "
असे म्हणत मी तिच्या १२ वर्षाच्या मुलीकडे एका लटक्या हेव्याने पाहिले.आणि त्याच क्षणी मघापासून अगदी उत्साहाने आणि कौतुकाने आम्हा मैत्रिणींचे संभाषण ऐकणाऱ्या त्या चिमुरडीच्या इवल्या ओठांना बोल फुटले,
" अगं मावशी , आत्ता तुम्ही आमच्या एवढ्या छोट्या झाल्या की यातली काहीसुद्धा मज्जा मिळणार नाही. खरंच . खूप कंटाळून जाल तुम्ही . ऊन्हात तर आई जरा सुद्धा जाऊ देत नाही. आणि असे सर्व वेगवेगळे खेळ खेळायला आमच्याकडे कुठे वेळ असतो? सकाळपासून या न त्या क्लासला जाऊन जीव इतका दमून जातो कि काही काही सुद्धा करावेसे वाटत नाही. मग करमणूक म्हणून २४ तास मनोरंजन करणाऱ्या TV चाच आसरा घ्यावा लागतो. आई-बाबा दोन्ही सकाळीच कामाला जातात. इतर तर कोणी घरी नसतच. जास्त कोणाला घरी घेवू नये आणि आणि जास्त कुणाच्या घरी जावू नये अशा नव्या धोरणामुळे मैत्रिणी सुद्धा फोनवरच भेटतात…अगदी तासंतास. आणि त्या झाडावरच्या चिंचा, बोरे पाडण्यासाठी तिथे आता झाडच नाही. साधा फेरीवाला पण आमच्या अलिशान सोसायटीत येवू शकत नाही … आणि मग आम्ही मुकतो तो उन्हाळी खाऊ. काय खायचे ते एखाद्या रविवारी हॉटेलमध्ये जावून खावून यायचे.कधी कधी हॉटेल छान वाटते पण त्यात ती मज्जा कशी असणार . इथे आईला साध्या जेवणाचे गणितच इतके किचकट वाटते तर मग हा पापड- लोणच्याचा थाट तर स्वप्नातही इथे दिसणार नाही.
मावशी , तू म्हणते तशी उन्हाळी सुट्टी मला पण अनुभवायची आहे. मला गावचे शेत ,ते डोंगर,ती नदी , ती गावाकडची नाती ,ते चिंचेचे झाड हे सारे सारे खूप आवडते.मलाही कधी तरी अशी मज्जा करायची … अगदी मनसोक्त … अल्लड होऊन महिनाभर बागडायचे… अभ्यासाचे किंवा कोणत्याही क्लासचे टेंशन न घेता….पण आई म्हणते आपल्याला गावच नाही. ही मुंबईच आपले गाव जिथे आता तुझ्या गोष्टीतल्यासारखे शहरपण उरले नाही. आमचे खेळण्याचे मैदान सुद्धा आता फक्त आमचे म्हणून नाही बरे का . नात्यांचा तर दूरदूर आमचा हवा तसा संपर्कच नाही . कधीतरी वाजणारा फोन हेच ते कुठेतरी अस्तित्त्वात असल्याचे निशाण.तुमच्या गावी आहे का अशी मज्जा…. अशी सुट्टी मिळेल का तिथे ? मग मलाही हा मे महिना हवाहवासा वाटेल अगदीतुझ्या एवढी मोठी होईन तेव्हाही … सांग न मावशी, आहे का असे गाव तुमचे… ?"
त्या चिमुरडीचे बोलणे ऐकले आणि आम्ही दोघी मैत्रिणी एकमेकांकडे बघतच राहिलो.त्या छकुलीच्या प्रश्नांचे होकारार्थी उत्तर देण्यासाठी माझे गाव कुठे पूर्वीसारखे राहिले होते ?… ते गाव आज कुठेतरी हरवलेले होते आणि त्यासोबतच मुलांचा 'मे ' महिना.
- रुपाली ठोंबरे
No comments:
Post a Comment