Tuesday, January 19, 2016

गोष्ट- दोन रेघांची

'कट्यार काळजात घुसली'…नुकताच काही दिवसांपूर्वी या मराठी विश्वात रुपेरी पडद्यावर झळकलेला नाट्यसंगीतमय चित्रपट. एव्हाना बऱ्याच मराठीप्रेमी आणि संगीतप्रेमींचा पाहून झालेला असेलच. एक सुंदर कलाकृती… सचिन पिळगावकर , सुबोध भावे ,मृण्मयी देशपांडे,अमृता खानविलकर ,शंकर महादेवन यांच्या अभिनयाने आणि शंकर महादेवन, राहुल देशपांडे, जितेंद्र अभिषेकी ,महेश काळे या दिग्गज कलाकारांच्या संगीतमग्न सुरांनी नटलेली.

चित्रपटाचा शेवट झाल्यावरही दोन्ही कानांत पार हृदयापर्यंत घुमत राहतात तेच सप्तरंगी निनाद…आणि मनातील अनंत समाधानाचे काजवे एकापाठोपाठ एक चेहऱ्यावर चमकू लागतात. आणि हा प्रसन्न भाव हीच अखंड कलाप्रेमींकडून या चित्रपटाला मिळालेली रोख पावती.

मला मात्र या स्वरांसोबतच आणखी काहीतरी खास या चित्रपटातून गवसले, आठवणीत राहिले. एक समजूतदार पण रोजच्या व्यवहारातही उपयोगी पडणारी एक शिकवण. जरा हे कट्यारीचे मनोगत पुन्हा आठवून पहा… एका नगरातील दोन संगीत घराणी… त्यांच्यातील वर्षानुवर्षे चालत राहिलेली स्पर्धा… आपल्या आवाजाने डोळ्यांत पाणी आणणारे शास्त्रीजी प्रत्येक वर्षी या विजयाचे मानकरी … याउलट अखंड परिश्रमांनीही विजय पताका न लावू शकणारे ,सतत हरणारे खानसाहेब… स्पर्धेत हरत असले तरी त्यांची स्पर्धा जिंकण्याची जिद्द हरली नाही… पण एका टोकाला जाऊन तेही मनातून हरले… पुढे पुढे प्रयत्नांपेक्षा ईर्ष्या जास्त वेगाने वाढली… आणि शेवटी चुकीच्या मार्गाने का होईना पण खानसाहेबांनी प्रतिस्पर्धकालाच मिटवून या स्पर्धेवर,कट्यारीवर आपल्या नावाची मोहोर चढवली…पुढे कित्येक वर्षांनी शास्त्रींच्या एका विद्यार्थ्याचे येणे…आणि सत्य उमगताच सुडाच्या भरात खानसाहेबांनी केलेली चूकच पुन्हा करू इच्छिणे….

अशा क्षणी खांसाहेबांची मुलगी झरिना या विद्यार्थ्याला एक समजूतदार मूलमंत्र देते आणि नकळत आपल्यालाही काहीतरी अमुल्य देऊन जाते.एक छोटीशी गोष्ट- दोन रेघांची … " दोन असमान रेघांमधील मोठया रेघेलाही जेव्हा लघू करण्याची गरज भासते तेव्हा तिचे अस्तित्त्व नष्ट करण्यापेक्षा शेजारी तिच्यापेक्षाही मोठी रेघ रेखाटा… ती आपोआपच लहान होईल आणि या नाविन्याचे श्रेष्ठत्व मान्य करेल…करावेच लागेल". आणि या पदपथावर पुढे चालत जाऊन हा विद्यार्थी प्रयत्नांची खडतर तपश्चर्या सुरु करतो आणि शेवटी खांसाहेबांच्या मुखातुनच स्वतःचे श्रेष्ठत्व वदवून घेतो आणि प्रतिस्पर्धकाचा नाश न करता त्याचा समूळ पराभव करतो.… यालाच म्हणतात एका तीरात २ पक्षी.

असा हा चित्रपट आणि हा नायकाच्या जीवनाला कलाटणी देणारा तो प्रसंग आपल्या सारख्या सामान्यालाही खूप काही शिकवून जातो. आजचे जग स्पर्धेवरच टिकले आहे असे कायम वाटू लागले आहे. घरात,शाळेत, नोकरीत,समाजात सगळीकडेच वेगवेगळ्या स्पर्धा. आणि या सर्वच स्पर्धांमध्ये आपण कायम एक स्पर्धक म्हणून उभे असतो… अशा वेळी प्रतिस्पर्धी काही वेळा आपले असतात तर कधी अनोळखी…पण चढाओढ मात्र कायम… कधी तेच तर कधी वेगळे स्वरूप… पण नेहमी एक विजयी तर दुसरा पराजयी होऊन राहणार. ही स्पर्धा नवे बदल घडवून आणण्यासाठी,प्रोत्साहनासाठी,समाधानासाठी ,नव्या प्रयत्नांसाठी निश्चितच असावी पण त्यातून वाढणारी ईर्ष्या नसावी. कित्येकदा यश मिळवण्यासाठी लोक चुकीच्या पद्धतीचा वापर करतात. पण हे यश खरे समाधान देते? विजयी होणाऱ्याचाच कूटनितीने नाश केल्यावर आपल्यापेक्षा दुर्बलांशी स्पर्धा करून त्यात विजयी होण्यात काय अर्थ? त्यापेक्षा आपल्यापेक्षा सबळ आणि विजयी होणाऱ्यापेक्षा अधिक परिश्रम करून योग्य तऱ्हेने पुढे जात राहिले कि यशही शेवटी आपल्या पावलांपाशी येऊन एकदा थांबेलच . स्वतःच स्वतःच्या कर्तृत्त्वाने एका सर्वोच्च शिखरावर पोहोचलो कि आपल्याला हरवणारा आपोआपच अपयशी सिद्ध होईल. एवढेच नाही तर आपले श्रेष्ठत्व तो स्वतःच जगासमोर मान्य करेल आणि यातच संपूर्ण विजय आणि परमानंद आणि अखंड समाधानाचा मेळ असेल.

- रुपाली ठोंबरे

No comments:

Post a Comment

Blogs I follow :