Wednesday, February 8, 2017

एक ध्येय पण मार्ग हजार

दुपारची वेळ. सहज म्हणून घराबाहेरच्या ओट्यावर उभे राहून आसपासची गंमत पाहत होते. उन्हाळ्यातली भर दुपार...फारसे कोणी बाहेर दिसत नव्हतं. दूर रस्त्यावरून एखादी पुसट आकृती चालताना दिसे. हिंदी-मराठी विविध मालिकांची मधूनच ऐकू येणारी शीर्षकगीते,कित्येकदा घोळका करून गप्पाटप्पा मारणाऱ्या गृहिणी यावेळेस घरात का बंदिस्त झाल्या आहेत याची वार्ता देत होते. त्या पिवळ्याधम्म कडक उन्हात वाळत ठेवलेले पापड मध्येच येणाऱ्या गरम वाऱ्याच्या झुळुकीबरोबर फडफडत होते. असे सर्व चित्र आजूबाजूला असताना माझे विशेष लक्ष वेधले ते आमच्या शेजारच्या रोहितने. बराच वेळ मला दुरून  नक्की उमगलेच नाही कि हा नक्की काय करतो आहे . त्यामुळे मीच थोडे जवळ जाऊन पाहिले तर याचा एक नवा खोडकरपणा सुरु होता... एका मुक्या प्राण्याला उगीचच त्रास देण्याचा.

रोहितच्या आईने मोठ्या परातीमध्ये रवा उन्हात ठेवला होता. त्यात चुकून भेसळ होऊन मिसळल्या गेलेल्या साखरेसाठी एक मुंगी सारखी तिथे ये-जा करत होती.प्रत्येक वेळी ती यायची , परातीची ती उंच भिंत पार करून त्या रव्याच्या राज्यात शिरायची आणि तेथे असलेला साखरेचा शुभ्र चमकदार घनाकार इवल्याशा डोक्यावर घेऊन पुन्हा ती भिंत पार करून तिच्या घरी जायची. असा तिचा कार्यक्रम बराच वेळ सुरु होता. आणि या तिच्या सुरळीत सुरु असलेल्या कार्यक्रमात विघ्न आणण्याचे काम हा ४ वर्षांचा रोहित करत होता. तिच्या रस्त्यात मध्येच बोट ठेवून काही अडथळा निर्माण करी. पण मुंगी सुद्धा काही कमी नव्हती. परातीची ३ इंचाची भिंत ओलांडणारी ती त्या इंचभर बोटाची उंची अगदी सहज पार करून जाई. कधीकधी कडकडून चावा घेऊन क्षणभरासाठी तरी स्वतःचा मार्ग मोकळा करून घेई. मग तो चिमुरडा सुद्धा चिडे... धावत जाऊन कुठून तरी पाणी आणले आणि दिले ओतून त्या रस्त्यात. बिच्चारी मुंगी...फारसे पोहता येत नाही पण लक्ष्य मात्र मिळवायचेच. त्या पाण्याच्या ओघळातून निर्माण झालेल्या तळ्याभोवती काठाकाठाने चांगल्या २ फेऱ्या मारल्या तिने. थोडा वेळ तशीच थांबली. खूप वेळ झाला तसे एका बाजूला पाण्याचा प्रभाव कमी जाणवला किंवा उन्हात त्यातले थोडे पाणी उडून गेले आणि मुंगीला तिचा टीचभर मार्ग मिळाला. लगेच ती त्या चक्रव्यूहातून आत शिरली. या पठ्ठयाने पुढे परातीच्या पायाशी मोठा ओबडधोबड दगड आणून ठेवला. पण मुंगीने न हरता , न वैतागता तोही कसाबसा पार केला आणि शेवटी आपल्या लक्ष्यापाशी येऊन थांबली. असे बराच वेळ चालले. शेवटी रोहितच कंटाळला आणि तो पुन्हा त्या मुंगीच्या वाटेला गेला नाही. आधी परिश्रम घेतले, एक निश्चय मनाशी बांधला आणि त्या निश्चयाशी कायम राहून कितीही अडथळे आले तरी सातत्याने प्रयत्न करत राहण्याची मुंगीची जिद्द शेवटी तिच्या कामी आली. आता सर्वच खूप सुकर झाले होते. हे करताना ध्येय जरी एकच असले तरी ते पूर्ण करण्यासाठी अवलंबलेले मार्ग मात्र सर्व प्रकारे वापरले होते. त्यासाठी अजिबात कंटाळा नव्हता. 

ही छोटीशी घटना किती काही शिकवून जाते. आयुष्यात निश्चय अगदी ठाम असावा. तो डगमगणारा नक्कीच नसावा. पण तो पूर्ण करण्यासाठी स्वीकारलेल्या मार्गावर जरी अडथळे आले तरी वैतागून न जाता नवा मार्ग शोधून त्यावर चालत राहून ध्येय गाठावे.

थोडक्यात काय तर, निश्चयावर ठाम असावे मात्र त्याला पूर्णत्वाला नेण्यासाठी स्वीकारलेला मार्ग मात्र नेहमी परिवर्तनशील असावा. 

- रुपाली ठोंबरे.

No comments:

Post a Comment

Blogs I follow :