Monday, November 20, 2017

दव भिजले पावसात ...

या वर्षी पावसाळ्याचे स्वागत आणि पावसाची राहण्याची सोय चांगली जय्यत झाली असेल असे वाटते.यावर्षी पाऊस फारच आनंदला वाटते आमच्यावर. म्हणूनच कि काय हिवाळा आला तरी पावसाला काही  आपला निरोप घ्यावासाच वाटत नाही. आता एक-दोन महिन्यांपूर्वीचीच गोष्ट. पावसाळा संपून कित्ती तरी दिवस झाले होते तरी हा पाहुणा जाण्याचे नाव काही घेईना. अगदी कायम सोबत नसेल तरी दिवसातून त्याची एक फेरी हमखास होत असे.प्रत्येकाला पाऊस आवडतो हे जरी खरे असले तरी अगदी त्याचा त्रास होईपर्यंत बरसत राहावे हे मात्र मुळीच बरोबर नाही.एखाद्याला मधुमेह झाला कि साखर व्यर्जच होते.मग हा मधुमेह होईपर्यंत कशाला एवढे साखरेचे अतिक्रमण? पावसा, तुझेही हे असेच झालंय बघ. तू येतोस तेव्हा किती आनंद देतोस...ते सर्व आकाशात जमणारे काळे मेघ , वाहणारा सो सो वारा, आभाळातून बरसणारे हजारो मोती, मातीचा तो मृदगंध , फुटणारी नवी पालवी, वाहणारे निर्झर ... अगदी सर्वच हवेहवेसे वाटते. पण हा अनुभव काही काळासाठी आणि तुझ्या ऋतूतच स्वर्गमय वाटतो रे. सगळीकडे पाणी पाणी झाले कि एका काळानंतर ते नकोसे होते.आणि म्हणूनच तर निसर्गाने ऋतुचक्र निर्माण झाले आहे. पावसाळा झाला कि हिवाळा आणि हिवाळा झाला कि उन्हाळा आणि परत असेच हे जीवनचक्र सुरु. प्रत्येक ऋतूने नव्याने अतिथी येऊन यावे, चार महिने आनंदाने राहावे, आणि पुन्हा निरोप घेऊन जावे. दुसऱ्याच्या कारभारात मध्येच येऊन लुडबुड कशाला? प्रत्येकाची आपली अशी काहीतरी देण, ती त्या त्या ऋतूतच अनुभवण्यात खरे सुख.

पण पावसा, सांग ना ? तुला आता काय झाले आहे ? तुला जावेसेच वाटत नाही का इथून? इतके प्रेम असले तरी आता तू जा म्हणजे तुझे ते अप्रूप नेहमीच जीवाला वेड लावीत राहील. काही दिवसांपूर्वीचे ठीक होते. तेव्हा या हिवाळ्याने आपले पाय रोवले नव्हते अजून. पण आत्ता ? चांगली थंडी पडते आहे आता. पहाटेच चोरपावलांनी थंडी कुशीत शिरते ती दुपारपर्यंत दूर जायचे नाव घेत नाही. आणि संध्याकाळी सूर्याच्या निरोपासंगे त्याला घाबरून दडून बसलेली ही थंडी पुन्हा बिलगून बसते. पहाटेची गुलाबी थंड हवा , धुक्यात हरवणारी पाऊलवाट , पानापानांवर जमलेले दव मोती... हा सर्व हिवाळ्याचा नजराणाही आम्हा सर्वांना हवाहवासा असतो. या थंड गारव्यानंतर अंगावर येणारे सूर्यनारायणाचे कोवळे ऊन आणि त्यातून मिळणारी ऊब...अहाहा हे तर अतिशय अभूतपूर्व. प्रत्येक दिवशी मन आणि अंग या ऊन- गारव्याच्या भेटीनंतरच्या या मोहक स्पर्शासाठी आतुरलेले. आणि आता तूच सांग, अशाच प्रसंगी तू असा आजसारखा अनाहूत पाहुण्यासारखा अचानक तडमडलास तर कसे बरे चालेल ? त्या थंडीत जिथे ऊबदार गरम स्पर्शाची इच्छा तिथे असे गार गार पाण्याचे थेंब आकाशातून बरसू लागले तर... ? बरे तुझे स्वागत करावे पुन्हा नव्याने तर त्यासाठी आमच्याकडे छत्रीसुद्धा नसते. कारण तूच असा वर्दी न देता अचानक आलेला असतो. शुभ्र दाट धुक्याच्या चादरीसमोर तुझे काळे मेघपुंजके नेत्रांना नाही सुखावू शकत.दवबिंदूंनी ओलावल्या पाऊलवाटेवर अनवाणी चालताना मिळणारा आनंद तुझ्या पाण्याच्या तळ्यांनी विरून जातो कारण तुझ्या थेंबांच्या पसाऱ्यात जमलेले हे आता हवेहवेसे वाटणारे दव भिजून वाहून जातात. आणि मग असे झाले कि नकळत मनात तुझा राग येतो. तुझ्या या अशा कारभारामुळे मिळणाऱ्या आजारांच्या निमंत्रणांमुळे दोन शिव्याही पडतील बघ तुला. मग तूच दुखावशील, नाराज होशील आणि पावसाळ्यात येण्यासाठी पुन्हा तुझे नवे नाटक. अरे हो हो , माहित आहे. आम्हीच कुठेतरी कारणीभूत आहोत या असल्या गफलतींसाठी.पण आता ऐक. तू खुशाल जा तुझ्या घरी. तुझ्यासाठी खूप खूप झाडे लावू आम्ही. म्हणजे पुन्हा परत यायला तू तुझी वाट चुकणार नाही. आणि तुझी वेळही जाणार नाही. आता जास्त वेळ दवडू नकोस. उगाच हिवाळ्या-उन्हाळ्याच्या कार्यक्रमात हस्तक्षेप करू नकोस नाहीतर तेही रागावतील आणि तुझ्या ठरलेल्या वेळी तुला ते येऊ द्यायचे नाहीत. सर्वच चक्र बिघडून जायचे. 

पण काही म्हणा आज असा हिवाळ्यात न सांगता आलास खरा. ऑफिसला जाताना भिजवल्याने जरा रागही आला. पण तरी पावसावरचे माझे अतूट प्रेम काही केल्या तुझ्यावर रुसू देत नव्हते. आणि मग धुक्यातून वाट काढत भावनेच्या ओघात भिजलेल्या मनावर नकळत उमटलेल्या चार ओळी चिंब न्हाल्या...


 पाऊलवाट दवात ओलावलेली 
आज पुन्हा नव्याने भिजली
आठवण तुझ्यासवे रंगलेली 
आज पुन्हा नव्याने स्मरली

- रुपाली ठोंबरे.

1 comment:

Blogs I follow :