Tuesday, March 6, 2018

आदिशक्ती-अक्षरशक्ती--वर्ष तिसरे




या सतरा जणी त्या पंधरा जणींशी 
जवळजवळ महिना- दोन महिने 
अगदी तल्लीनतेने खेळ खेळ खेळल्या 
या सतरा जणी... आदिशक्तीची रूपे 
आणि त्या पंधरा जणी... रूपे अक्षरशक्तीची
साऱ्या जणी एकमेकींपेक्षा खूप वेगळ्या
त्या सतरा जणींनी आपापली सखी निवडली 
या दोघीही एकमेकींसाठी अगदी अनोळखी
भाषा, लिपी,संस्कृती सर्वच अगदी नवखे 
रेषा ,वळणे,रंग हेच काहीसे होते ओळखीचे
आणि त्या जवळ आल्या एका अक्षरसणासाठी 
अंक,व्यंजने,स्वरांची पुन्हा बाराखडी जमली 
कधी चुकली, कुठे अडखळली पण ही नाही हरली 
चुकता- सुधरता हळूहळू ती हिला समजत गेली
तिचे कंगोरे , तिची वळणे मनातल्या कोंदणात आली 
मग तिनेही सोडून हट्ट हिच्या कलेला स्वीकारले 
हिच्या साच्यामध्ये स्वतःला मुक्त विहरू दिले 
हिने फेकलेल्या रंगांची होळी आनंदाने अनुभवली 
त्या दोघींची आता खूप खूप गट्टी जमली 
आज या सतरा जणी पुन्हा एकत्र आल्या आहेत 
आपल्या पंधरा नव्या मत्रिणी सोबत घेऊन 
वेगळी कला आणि वेगळ्या लिपीची वेगळी अक्षरे 
असा अनोखा मेळ सादर होतो आहे या प्रदर्शनामध्ये... 
                           प्रदर्शन... स्त्री शक्तीचे 
                           प्रदर्शन ... भाषांच्या सौन्दर्याचे 
                           प्रदर्शन ... लिपीच्या उत्सवाचे
                           प्रदर्शन ... विविधतेतील एकीचे 
                           प्रदर्शन... मांडलेल्या सुलेखनांचे 
                           प्रदर्शन ...APSC मधील मुलींचे
                          प्रदर्शन ... आदिशक्ती-अक्षरशक्तीचे .


 - रुपाली ठोंबरे.
आदिशक्ती-अक्षरशक्ती... वर्ष दुसरे वाचण्यासाठी

1 comment:

  1. अतिशय सुंदर शब्दांत मांडले आहेस, रुपाली!

    ReplyDelete

Blogs I follow :