Monday, April 6, 2020

सगळीकडेच हाहाकार !


" अरे, आज अचानक काय झाले काही समजलेच नाही. एकाएकी सभोवताली अंधार दाटून आला. वेळ पाहिली तर अजून ही तर माणसांची झोपण्याची वेळ नाही. पण तरी सर्व लाईट्स बंद झाले.आणि एका क्षणात पुन्हा तोच सभोवताल दिव्यांनी झगमगून निघाला. नक्की काय सुरु आहे ?"
जमलेल्यांपैकी एकाच्या या प्रश्नावर दुसरा लगेच उत्तरला ,
" अरे , या देशाच्या पंतप्रधानांनी जनतेला दिवे लावून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवण्यास सांगितले होते. तेच सध्या सुरु आहे."
"अरे पण इतकी एकता आहे या देशात ? तर मग आपला निभाव लागणे अशक्यच, नाही का ?"
जमलेल्या कोरोना विषाणूंच्या घोळक्यातून त्यांचा म्होरक्या पुढे बोलू लागला .
" हो ती चिंता आहेच. किती आशेने आपण सर्व या देशात आलो होतो. पण काय झाले ? आपण हातपाय पसरवायला सुरुवात करताच मध्येच एके दिवशी अचानक रस्त्यांवरून लोकच गायब झाली. दिवसभर मानवी शरीर मिळालेच नाही त्यामुळे आपल्यापैकी अनेकांचा मृत्यू झाला. त्यानंतर टाळ्या , थाळ्या वाजवून किती तो नाद घुमला आसमंती.पुढे देशात अगदी २१ दिवसांचा लॉकडाऊन. मंदिरे , दळणवळण सारे सारे थांबले आपल्याला थांबवण्याकरता . देशातला प्रत्येक नागरिक जमेल तशी मदत करत आहे.हे सर्व पाहून एक वेळ वाटले आता तर इथून काढता पाय घेतला पाहिजे. "
" पण असे अनेक मूर्ख लोक पण आहेत याच देशात ज्यांना अजून आपल्या शक्तीची प्रचिती आली नाही . म्हणूनच ते कुणालाही न जुमानता खुशाल बाहेर पडत आहेत."
" आणि हो सध्या तसेच काही जण आपल्या हाती लागत आहेत . "दुसरा आनंदाने उद्गारला.
" अगदी बरोबर . तेच म्हणत आहे मी. पण ते फार काळ टिकणार नाही . इथले प्रशासन अजून कठोर कारवाई सुरु करतील आणि त्यांनाही वठणीवर आणतील. इथे येण्याआधी वाटले होते कि इतक्या मोठ्या लोकसंख्येचा देश. अगदी सहज हरवू शकणार पण याला . पण कुठेतरी ते भाकीत खोटे ठरत आहे."
आपल्या म्होरक्याच्या बोलण्यावर एक कोरोना चिंतेच्या स्वरात उत्तरला ,
" मग आता ?"
तसा त्यांच्यातील एक ज्येष्ठ कोरोना म्हणाले ,
"आता काय ? आपल्याला वाट पाहावी लागणार येथील काही देशद्रोह्यांकडून एखादी चूक झाली तर. पण मला आता तशी शक्यता कमीच  वाटत आहे . इथले शासन , प्रशासन आणि जनता सुद्धा न हरणारी आहे,जिद्दी आहे .फक्त आपणच नव्हे तर जातीवाद', धर्मवाद ,राजनीती, गरिबी  असे  इतर अनेक शत्रू या देशात कायम वावरत असतात आणि अजूनही आहेतच, पण तरी त्यांचा विश्वास ठाम आहे. आपल्या विरोधात लढाई सुरु केली आहे तर यात विजय मिळवणारच अशी शपथच घेतली आहे जणू. एका उत्कृष्ट  नेतृत्वाखाली सर्वजण एकत्र बांधले जात आहेत.समाजातील एका वर्गावर आपण आक्रमण केले तर लगेच दुसऱ्या वर्गातील लोक विविध तऱ्हेच्या सहकार्य करत धावून येतात . आपण लोकांचे मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहोत हे लक्षात येताच आजचे प्रकाशपर्व उदयास आले. ज्यामध्ये एक नवी ऊर्जा मिळाली आहे या देशाला. अजून काही दिवस उरले आहेत. तोपर्यंत जर कोणीच बाहेर पडला नाही तर मानवी शरीरांअभावी आपले अनेक कोरोना नष्ट होतील. मग त्यापूर्वीच इथून पाय काढलेला बरा. तुम्हाला काय वाटते ?"
आपल्या पेक्षा वयाने मोठया असलेल्याचे असे विचार ऐकल्यानंतर तो म्होरक्या पुढे म्हणाला ,
" काही दिवस पाहू काय होते आहे ते ? हे लोक जर असेच घरामध्ये राहिले तर इथे आपला टिकाव लागणे कठीणच . मग तेव्हा आपल्याला इथून निघून जावेच लागेल. इथे सर्वांचे प्रयत्न पाहून मला तरी आता वाटू लागले आहे कि आपण या युद्धात हरू. तरी हाताच्या बोटांवर मोजता येण्यासारखे लोक आपल्याला मदत करतीलच . कदाचित जर तोच  माणूस शहाणा झाला नाही तर आपला निभाव लागणे शक्य होईल.नाहीतर आपले काही खरे नाही. आपण हरणार आणि भारत जिंकणार ."
बघा , त्यांच्याही जगतात तेही मानत असतीलच कि माणसाचे घरामध्ये राहणे हाच त्यांचा विनाश आहे. मग ही साधी गोष्ट आपल्याला का बरे कळू नये.कोरोनाला हरवायचे असेल तर आपण एका ठिकाणी थांबलेच पाहिजे अन्यथा सर्व काही कायमचे थांबून जाईल . लॉकडाऊन चे काही दिवसच उरले आहेत. तेव्हा सर्व नियमावलींचे काटेकोर पालन करूया. घरीच राहूया ... स्वच्छता बाळगूया... विनाकारण घराबाहेर पडणे टाळूया...डॉक्टर आणि पोलिस यांच्याबद्दल आदर दाखवूया ... घरातल्यांबरोबर नेहमी मिळत नाही तो वेळ आता मिळाला आहे . तो आनंदात घालवूया... आणि स्वतः सुरक्षित राहून देशाला वाचवूया ... कोरोनाच्या विळख्यातून या जगाला वाचवूया .

- रुपाली ठोंबरे. 

1 comment:

  1. Situation la sajeshi Katha. Mast lihili aahes. Keep it up.

    ReplyDelete

Blogs I follow :