Wednesday, December 31, 2025

चित्रकलेची खरी सुरुवात

वर्षाच्या सरतेशेवटी या वर्षातील चांगल्या-वाईट गोष्टींचा छोटासा हिशोब यावेळी अगदी नकळतच मांडला गेला. याचे मुख्य कारण म्हणजे हे वर्ष स्वप्नांची पूर्तता करणारे ठरले...कधी काळी पाहिलेली पण कुठेतरी हरवलेली आणि कधी न पाहिलेली अशी सुखद धक्का देणारी. यांपैकी एक स्वप्न होते आपल्या आवडत्या विषयाचे रितसर, अगदी मनापासून घेतलेले शिक्षण. लहानपणापासूनच भाषा आणि चित्रकला या विषयांत विशेष रुची होती पण दहावीत चांगले गुण मिळाले आणि जणू सामाजिक नियमाप्रमाणे पावले अभियांत्रिकी दिशेकडे वळली. आणि दोन्ही विषय केवळ छंद म्हणून जीवनात राहिले. जे काही दहावीपर्यंत शिकले तेच नकळत पुढे फुलत गेले. त्यात सुंगंध होता, तो दूरवर पसरला देखील, परंतू जो मकरंद मनास तृप्त करेल तो काहीसा लुप्त होता. APSC आणि अच्युत सरांच्या सानिध्यात तो बऱ्याच प्रमाणात गवसला. आपल्या आवडत्या विषयात गुरु म्हणून पद्मश्री अच्युत पालव यांच्यासारखे व्यक्तिमत्व लाभणे हे खूप मोठे भाग्य आहे. असेच भाग्य पुन्हा एकदा नव्याने झळकावे तसे या वर्षात विक्रांत शितोळे सर गुरु म्हणून माझ्या आयुष्यात आले. आणि त्यांनी आयोजित केलेल्या 'फॉउंडेशन कोर्स' च्या रूपात खऱ्या अर्थाने चित्रकला या विषयाला योग्य दिशा मिळाली अगदी नेहमी हवी होती तशी. 

फेब्रुवारी महिन्यात साधारण ८ महिने सुरु राहणारा हा पाठयक्रम सुरु झाला आणि जीवनात एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली. वरवर सोपा वाटणारा हा विषय तितकाच क्लिष्ट देखील आहे कारण चित्रकला म्हणजे केवळ एक विषय नाही तर या कलेचे अनेक  अंग एकत्र आणून स्वतःतील सर्जनशीलतेला धडवण्याचे हे अध्ययन आहे.  या अभ्यासक्रमात मला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे या प्रत्येक अंगाचा सखोल अभ्यास करून त्यातून माझ्यातील मीच नव्याने गवसत गेले. याचे पूर्ण श्रेय द्यायचे झाले तर हा विषय आणि त्यांतील उपविषय योग्य प्रकारे जाणून घेऊन , येणाऱ्या विद्यार्थ्यांची योग्यता लक्षात घेऊन जाणीवपूर्वक आखलेली संपूर्ण  रूपरेषा आणि अर्थातच या सर्वांचे अचूक रेखाटन करणारे आणि अनुभव देणारे एक उत्कृष्ट शिक्षक - विक्रांत शितोळे सर.  त्यामुळे सुरुवातीला जटिल वाटणारे विषय सुद्धा नंतर आनंददायक ठरू लागले. आम्ही अंदाजे ३५ विध्यार्थी... या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून ऑनलाइन एकत्र आलो. पहिला दिवस प्रस्तावना-परिचयाचा आणि मग लक्षात आले कि यांतील बहुतेकजण माझ्यासारखेच एका राहिलेल्या स्वप्नाच्या शोधात इथवर पोहोचले होते. शिक्षण आणि व्यवसाय जरी वेगवेगळ्या क्षेत्रात असतील तरी प्रत्येकाचा खरा आनंद चित्रात होता. एकमेकांना आजवर भेटलो नाही पण उत्तम संयोजनामुळे ती कमी इतकी भासलीच नाही. प्रत्येकाचेच काम अप्रतिम... फक्त काम नाही तर प्रत्येकाकडून काहीतरी गुण शिकण्यासारखा नक्कीच आहे आणि एकत्र अध्ययनामध्ये हेच खरे महत्वाचे. सर्वच सर्व उपविषयांत निपुण नक्कीच नाहीत पण एकमेकांच्या सोबतीने आणि योग्य मार्गदर्शनाने भविष्यात नक्कीच यात यशस्वी होतील. इतरांच्या चांगल्या कामाची योग्य दखल घेऊन, कौतुक करून प्रोत्साहन देण्याची कलासुद्धा खूप गरजेची आहे जी मला या ग्रुप मध्ये विशेष जाणवली. 

संपूर्ण विषय खूप मोठा आहे, तो ८ महिन्यांत पूर्ण शिकणे जवळजवळ अशक्यच पण शास्त्र , तंत्र, विद्या आणि कला या माध्यमातून सुरुवात झाली आणि कलेचे एकेक पदर समोर उलगडू लागले. चित्रकला म्हणजे केवळ कागदावर चित्र काढणे नाही तर चित्र आधी मनात आखले जाते आणि मग भावनांच्या रंगांत भिजून हस्तरूपी कुंचल्यातून जगासमोर अविष्कार घडवून आणण्याची ही दैवी क्षमता. हा अभ्यास करताना नाट्यशास्त्र , चित्रसुत्र अशा ग्रंथांचा किती प्रभाव आपल्या कलेवर आहे हे सरांनी पहिल्याच वर्गात मनावर बिंबवले. आश्चर्य वाटले जेव्हा कळले कि चित्रकलेचा अर्थ फार पूर्वी महर्षी वत्सायन यांनी कामसूत्रात अशाप्रकारे शब्दात मांडला आहे -

रूपभेद: प्रमाणानी भावलावणीयोजनं ।

सादृश्यम वार्णिकाभंग इति चित्र षडंगकं ।।

या ग्रंथांप्रमाणेच सर वेळोवेळी इतर प्रतिष्ठित चित्रकारांची कामे आणि पुस्तके दाखवून आम्हांला प्रेरणा देत. भोवताली जे जे दिसते ते ते योग्य प्रकारे आत्मसात करून कसलीही लाज न बाळगता कुठेही असाल तरी रेखाटन सुरु ठेवा आणि पहा तुमच्यातला कलाकार आपोआपच बहरू लागेल हा त्यांच्या शिक्षणातील मूळ गाभा. मुळात अॅनिमेटर असलेले विक्रांत सर आम्हांला प्रत्येक प्रसंगी त्यांच्या त्या कामातील दाखले देऊन एका नव्या क्षेत्राबद्दलसुद्धा प्रकाशमान करत असत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय या दोन्ही स्तरांवर त्यांचे कार्य नित्य सुरु असते, विविध कार्यशाळा आणि प्रदर्शने या सर्वातून वेळ काढून ते वेळोवेळी आम्हांला त्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात सदैव तत्पर असतात. उदाहरण द्यायचे झाले तर रशियाला, लडाखला सर गेले पण त्याचा अनुभव इतक्या सुंदर पद्धतीत कथन आणि दर्शनीय झाला कि आम्ही सर्व सुद्धा काही प्रमाणात त्या प्रवासाची अनुभूती घेतली. हे अशाप्रकारे जीव ओतून शिकवणारे, आपल्यातले केवळ इतरांवर न लादणारे फार कमी असतात. रंगसंगती असो वा परस्पेक्टिव्ह, ह्यूमन अनॉटॉमी असो वा कन्स्ट्रक्शन, सुलेखन असो वा शेडींग ... उपविषय कोणताही असो त्यातील मूलभूत जाणून घेणे फार महत्वाचे आणि त्यानंतर ते एकमेकांत योग्य रीतीने गुंफून सादर करणे हीच तर खरी चित्रकला ना? Gauche या रंगमाध्यमात प्रथमच काम केले मी, पण त्यात उद्भवणाऱ्या समस्या व त्यावर केलेले उपाय या सर्वातून नवे काहीतरी शिकत गेले. या वर्गात प्रामुख्याने काही शिकले असेल तर ते हे कि कोणतीही गोष्ट सुरुवातीला कठीणच भासते पण तिला योग्य ठिकाणी तोडून सोपे करून योग्य क्रमाने मांडले तर अगदी अशक्य वाटणारे कार्यसुद्धा आपल्या हातून यशाची एकेक पायरी पार करत सहज घडून येऊ शकते. खरेतर या कोर्स मधील प्रत्येक विषयावर खूप काही आहे सांगण्यासारखे. हे सर्वच खरेतर स्वतः अनुभवण्यासारखे आहे. त्यामुळे यावर अधिक भाष्य करणे टाळावे म्हणते. फक्त समोर असलेले जसेच्या तसे कागदावर उतरवणे हे चित्र मुळात नसतेच... त्यामुळे वास्तव रेखाटायला हवे पण त्यात आपल्या  सर्जनशीलतेचा मुलामा असायला हवा तेव्हा ते चित्र दुर्मिळ बनते. स्थिरचित्र हा विषय हाताळताना वास्तव रेखाटताना ते सुंदर कसे मांडावे ही खरी पहिली पायरी असते हे जाणवले. चित्र काढताना प्रकाशयोजना , फोटोग्राफी, मांडणी हे सर्व देखील कसे आणि किती महत्वाचे आहे ते हळूहळू आमच्यात उतरत गेले आणि ते कामातून समोर येत गेले. या अभ्यासक्रमातील सर्वात आनंददायक विषय म्हणजे शेवटचा उपविषय - abstract... जिथे सात महिने सुरु असलेल्या शिस्तशीर कार्याला तात्पुरता स्वल्पविराम देऊन असते कागदावर स्वैर विहरणे, मनसोक्त रंग उधळणे , मनातील भावनांचे आकार आपोआप समोर उमटणे... आणि यातुन निर्माण होणारे ते सर्व आपल्या स्वतःसाठी सुद्धा अद्भूत ठरावे , जणू काही जादूच... कोणी केली? आपणच... आपल्या अंतर्मनातल्या लपलेल्या चित्रकाराने जो हळूहळू बाहेर येऊ लागला आहे. पण ही जादू तेव्हाच शक्य आहे जेव्हा तो पुष्कळदा कंटाळवाणा वाटणारा ७ महिन्यांचा शिस्तशीर प्रवास सफलरीत्या पूर्ण होईल. 

विक्रांत सर... खरेच मनापासून खूप खूप आभार असा हा अभ्यासक्रम योजून आमच्या सारख्या कलाप्रेमींना एक खरा मार्गदर्शक स्वतःच्या रूपात मिळवून दिल्याबद्दल. मार्गदर्शन करणारा चेहरा जितका महत्वाचा तितकेच महत्वाचे ते हात ज्यांच्या हातभाराशिवाय इतका मोठा ऑनलाईन उपक्रम उभारणे फार कठीण. आणि ते हात कृपा मॅमचे आणि त्याबद्दल मनापासून धन्यवाद. जसा गुरु तसे त्यांचे शिष्यही, त्यांच्या सहवासात येणारे सर्व विद्यार्थी सुद्धा अशाचप्रकारे निःस्वार्थ भावनेने इतरांपर्यंत पोहोचावे हा त्यांचा प्रामाणिक विचार मला नेहमी भावतो. योग्य तेच लोकांपर्यंत पोहोचावे हा त्यांचा अट्टहास त्यांच्या बोलण्यातून नेहमी दिसून येतो. विक्रांत सरांचा क्लास म्हणजे अशी शाब्दिक कलात्मक मेजवानी जी कितीतरी प्रसंगी भावुक करणारी, तुम्हाला पुढच्याच क्षणी सुंदर काही करण्यास उत्स्फूर्त करेल आणि पुढचा कितीतरी काळ या सर्वातून मिळणाऱ्या आनंददायी समाधानाने तृप्त करेल. ही मेजवानी काही दिवसांनंतर थांबणार असली तरी त्या शब्दांची जादू नक्कीच भविष्यात काहीतरी चमत्कारीत कार्य घडवून आणण्यात यशस्वी ठरेल. 

- रुपाली ठोंबरे 

Thursday, November 6, 2025

प्रवास... गोष्टीपासून चित्रापर्यंतचा

महाराष्ट्रातील अनेक घरांत अगदी प्रामुख्याने आढळून येणारे वर्तमानपत्र म्हणजे लोकसत्ता. आणि या वर्तमानपत्रातील प्रत्येक चित्रातून घराघरांत पोहोचलेले व्यंगचित्रकार निलेश जाधव हे त्यांच्या कलेच्या माध्यमातून सर्वांच्याच परिचयाचे झाले आहेत. ही सर्व चित्रे घरात लोकसत्तातील विविध पुरवण्यांमध्ये नेहमीच पाहायला मिळतात पण तरीही तीच चित्रे जेव्हा एकत्र दादर येथील पु ल देशपांडे कला अकादमी मधील कलादालनात पाहिली तेव्हा त्या चित्राची जादू काही वेगळीच होती. प्रत्येक चित्रातील व्यक्तिरेखा आपल्याला काही सांगू पाहत आहे इतके जिवंत भाव त्या चित्रात होते... मग त्यातील व्यक्ती सामान्य असो वा असामान्य , ती तितकीच बोलकी असतात. हे सर्व पाहताना निलेशची चित्रे अशी कलादालनात पाहायला मिळणे ही खूप वर्षांपासूनची असलेली माझी इच्छा पूर्ण झाली असे वाटले. सुमारे १५० विविध विषयांतील चित्रे तिथे सजवलेली होती पण तरी हा त्याच्या कार्यातील महत्त्वाचा असा १५-२० % च भाग असावा. असे अनेक प्रदर्शने भविष्यातही पाहायला नक्कीच आवडेल. ही चित्रे कलादालनात मला वेगळी वाटली कारण नेहमी वर्तमानपत्रात एक कथा किंवा बातमी सोबत जोडून आलेल्या चित्राचा मागोवा घेणे सहज शक्य होते. चित्र अचूक समजूनही येते. पण इथे कलादालनात तीच चित्रे प्रेक्षकाला नव्याने विचार करण्यास भाग पाडतात. गोष्टीपासून चित्र आपण नेहमीच अनुभवतो पण चित्रापासून गोष्टीचा प्रवासही इतका सुंदर असू शकतो हे आज अनुभवले. 

या चित्र प्रदर्शनासोबतच निलेश जाधव यांनी आपल्या बालमैफिलीतील बालगोपाळांसाठी घेतलेली कार्यशाळाही खूप विशेष होती. पेन्सिल, रंग , कागद या सर्वांसोबत प्रत्येकाचा चित्रप्रवास अगदी लहान वयातच सुरु होतो, आणि त्याच वेळी जर योग्य मार्गदर्शन मिळाले तर नक्कीच ती कला एखाद्यात खोल रुजण्यात आणि उद्याच्या जगात बहरून येण्यास सफल ठरते. खरे तर दीड तासात कोणी मोठा चित्रकार बनू शकत नाही हे जरी खरे असले तरी त्या दीड तासात मिळालेले ज्ञान कुठेतरी मनात नक्कीच चांगला बदल घडवून आणण्यात यशस्वी ठरू शकते. अशाप्रकारे दीड तासात असा बदल घडवून आणण्यासाठी कार्यशाळेमध्ये नक्की काय घेतले जाईल याची उत्सुकता मलादेखील होती. मुलांचा निलेश दादा बनून आकारांचे महत्व मुलांना खूप छान प्रकारे समजावले. कुठल्याही चित्राचा मूळ पाया म्हणजे काय...आपल्या नेहमीच्या परिचयाचे वर्तुळ, त्रिकोण , चौकोन आणि रेषाच की. फक्त हे सर्व किती प्रमाणात , कशाप्रकारे आणि किती कलात्मकतेने वापरतात यावर त्या चित्राचे स्वरूप ठरत जाते. एका रेषेत केलेला बदल चित्रातील भावना किती वेगळ्या पद्धतीने बदलतात हे सोप्या ईमोजी सारख्या चित्रांतून समजून घेण्यात मुलांना खूपच मज्जा आली. सुरुवातीला 'माझी चित्रे बोलतात ना तुमच्याबरोबर ?' या प्रश्नावर गोंधळून गेलेली किलबिल आता प्रत्येक चित्रासोबत संवाद साधू लागली होती. चित्राची भाषा हळूहळू कळू लागली होती. निर्जीव वस्तू तर सोडाच पण प्राणी असो पक्षी असो वा माणूस...यांमध्ये सुद्धा आकार दडलेले असतात हे कदाचित या मुलांना नव्याने समजले असेल त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक नवा शोध लागल्याची भावना दिसून येत होती. आणि ते अधिक उत्साहाने यात सहभागी होत होते. बालमैफिल मधील चित्रे पाहताना अनेकदा हा प्रश्न मला देखील पडायचा कि एखाद्या प्राण्याचे किंवा मुलाचे हावभाव , आपल्या मनाचा वेध घेता येणारी कृती कशी बरे सुचत असेल , नक्की कुठून सुरुवात होत असेल किंवा कथेतील नेमका कोणता भाग चितारायचा हे कसे ठरवले जात असेल. आज प्रत्यक्ष गोष्टीचे चित्र होताना पाहिले आणि जणू माझ्या मनात गुंतलेली ही प्रश्नांची वीण उलगडत गेली . ढोल्या हत्ती आणि चिंटुकल्या मुंगीची गोष्ट इतक्या सहज सुंदर पद्धतीने चित्रात मांडली कि ती दोघेही  बोलके झाले होते आता. 

त्यानंतर एका लहानश्या छकुलीला स्टेज वर बोलावून चित्र काढण्याचा प्रवास कसा सुरु होतो, आणि पुढे ते चित्र कसे साकारत जाते याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पाहायला सर्वाना खूप आवडले. कौतुक त्या छकुलीचेही जी अगदी उत्साहात आणि उत्सुकतेने छानप्रकारे निःस्तब्ध उभी राहिली. लहान मुलांना आपल्या वयातल्या मुलांपेक्षा मोठ्यांवर होणारे प्रयोग पाहण्यात काही विशेष मज्जा येते आणि हे निलेशनी अगदी अचूक हेरले. मग काय, एका दादांना स्टेजवर बोलावण्यात आले. त्यानंतर सर्वानी त्यांच्या शरीयष्टीचा , हावभावाचा अभ्यास केला आणि पाहता पाहता त्यांचे व्यंगचित्र सर्वांसमोर प्रस्तुत झाले. त्यांनाही आणि मुलांनाही खूप आनंद झाला . असा हा छोटासा पण तितकाच दमदार कार्यक्रम संपत जरी आला तरी या कार्यशाळेतून मुलांनी नक्कीच काहीतरी घेतले असेल. आशा आहे त्यांना आता पटले असावे कि देवाने डोळे आणि हात नुसते मोबाईलला पाहण्यासाठी नव्हे तर आसपास दिसणारे व न दिसणारे असे अनेक आकार पाहून ,अनुभवून ते कागदावर उतरवण्यासाठी दिले आहेत. कदाचित या क्षणी तीच मुले आईकडे हट्ट करून मिळालेल्या मोठ्या कागदावर चित्राच्या साहाय्याने आपल्या मनाला, स्वतःला मांडत असावे. आणि जर खरेच असे एकाही घरी झाले असेल तर तीच या कार्यशाळेची खऱ्या अर्थाने झालेली सफलता आहे. 

- रुपाली ठोंबरे 

Friday, September 19, 2025

'अनबाऊंड'..अक्षरांच्या पलीकडले

'लेटर्स एन स्पिरिट्स'... हे नाव गेले अनेक वर्षे ऐकत आले आहे, सुलेखनाच्या क्षेत्रात मराठी साहित्याच्या माध्यमातून या कलाप्रेमी समूहाने दिनदर्शिका किंवा कॉफी टेबल पुस्तक या रूपांत केलेली कामे पाहिली, यांतील अनेक कलाकारांचा गेल्या काही वर्षांतील प्रवास अगदी जवळून पाहिला आहे. बहुतेक सर्वच जण विविध क्षेत्रात कार्यरत असतानाही आपला सुलेखनाचा अभ्यास सातत्याने करत असतात. आणि त्याचेच फलस्वरूप म्हणजे आज मुंबईतील प्रतिष्ठित अशा जहांगीर आर्ट गॅलरी येथील प्रमुख कलादालनात सुरु असलेले 'अनबाऊंड' हे चित्रप्रदर्शन. 


प्रदर्शन सुरु झाले आणि अगदी दुसऱ्याच दिवशी माझा ते पाहण्याचा योग जुळून आला. १६ सुलेखनकार... प्रत्येकाची विचार करण्याची , अक्षरांना समजून घेण्याची, त्यांना मांडण्याची तऱ्हा वेगवेगळी पण अक्षरांच्या एका अदृश्य धाग्याने एकत्र गुंफलेली. मला लेखिका म्हणून खरी ओळख देणारे, लोकसत्तामधील सर्व चित्रांवर वर्चस्व गाजवणारे निलेश जाधव यांच्या प्रदर्शनाची तर कितीतरी वर्षांपासून मी वाट पाहत होती. आणि आज त्या प्रतिक्षेला पूर्णविराम मिळाला आणि तो ही अतिशय उत्कृष्टरीत्या... मुळातच फाईन आर्टचे विद्यार्थी आणि आतापर्यंत नोकरीनिमित्त मिळालेल्या अनुभवाचे एकत्र चित्रण पाहायला मिळाले. अक्षरांच्या सानिध्यात प्रत्येक माणसाचे जीवन विविध रंगछटांच्या ऊनसावलीत विविध आकार घेत असते , त्याच्या भावभावना त्यासोबत जुळलेल्या असतात, एखाद्या गोष्टीचे आकलन किंवा व्यक्त होतानाही साथ असते ती अक्षरांची आणि हे सर्व एकत्रितरित्या एका चित्रात मांडण्याचा विचारच किती आगळावेगळा... आणि हेच मला त्याच्या चित्रांत जाणवले. निलेश व्यक्तिचित्रांमध्ये तर माहीर आहेतच पण अक्षरांवर पण इतके प्रभुत्व आहे हे आजच पाहिले... खूप छान. या सर्वात एक निरागस मुलगी...अक्षरांच्या सहवासात जणू भविष्याची स्वप्ने पाहत रमलेली आहे ती मला अधिक भावली. जेव्हापासून खरी सुलेखनचित्रे मला कळू लागली तेव्हापासून मी अक्षयाला ओळखते... माझ्यासाठी अक्षरांचा तो प्रवासच अक्षयाच्या पहिल्या प्रदर्शनापासून सुरु झाला. विविध भाषा आणि शैलींतील सुलेखनातील कानेकोपरे माहित असूनही एकाच शैलीला घेऊन त्यातून अद्भुत प्रयोग करत प्रत्येकवेळी नव्याने सर्वांना अचंबित करण्यात ती नेहमी सफल झालेली दिसते. तिची काम करण्याची पद्धत, रंगांची अचूक उधळण, या रंगछटांत सुरु असलेला अक्षरांचा लपाछुपीचा खेळ हे सारे नेहमीच मंत्रमुग्ध करणारे असते. हे सर्व प्रत्यक्षात पाहायला आणि त्यातून बरेच काही शिकायला अनेकदा मिळाले आहे, पहिल्यापासूनच तिची चित्रे प्रेरणादायी असतात परंतु यावेळी या सुंदर अक्षरांचे कॅनव्हासवरील विशाल स्वरूप पाहताना वेगळीच मज्जा आली. वाईन रंगातील तिची कलाकृती ज्यात गोल्डन अक्षरांत उठावदार 'बी' 'ए' 'सी' अशी स्वैर अक्षरे... त्या चित्रात एक वेगळीच नशा जाणवते.या चित्राने माझे लक्ष विशेष वेधले गेले आणि मला खूप आवडलेही. अक्षरे म्हणजे जीवनाच्या कॅनवासवर रंग भरणारे माध्यम....हे डॉ शिरीष शिरसाट यांच्या २ कलाकृतींमधून स्पष्टपणे जाणवते... सावल्यांचा वापर करून केलेली आखणी आणि त्यामध्ये विसावलेली अक्षरे... सुंदर. डॉक्टरांचे असे काम मी प्रथमच पाहत होते आणि त्यांच्या इतर कामाप्रमाणेच हे सुद्धा खूप आवडले. मंगेश आकूला यांच्या चित्रांमध्ये एका स्ट्रोकमध्ये मांडलेली अक्षरे , विविध रंगसंगती एकत्र आणून केलेल्या अक्षर रचना... सर्वच मनमोहक. देवनागरीसोबत मोडी , गुजराती, तेलुगू अशा इतर भाषांतही केलेला प्रयत्न सुंदर आहे. एरव्ही बीजी लिमये म्हणजे कवितांमधील मूळ गाभा ओळखून त्या अक्षरांना बोलके स्वरूप देणारा अवलिया अशीच त्यांची ओळख होती. आजही अक्षरयज्ञ मधील संध्याकाळची बीजीं सोबतची आमची अक्षर मैफिल आठवते. सकाळपासून सुरु असलेली कार्यशाळा संपली कि बीजी सरांसोबत आमचा एक नवा अक्षरप्रवास सुरु व्हायचा. त्यांचे प्रदर्शनातील काम यावेळी खूप वेगळे होते, मग ते कापडावरील विष्णुसहस्त्रनाम असो वा अक्षरांची रेखीव कोरलेली सुंदर गुंतागुंत असो... सारेच काम केवळ अप्रतिम. अक्षरांच्या पलीकडेही एक वेगळे ऍबस्ट्रॅक्ट , भाववाचक असे विश्व असते जे सामान्य माणसाच्या कल्पनेपलीकडे असूनही नेत्रसुख देणारे ठरते हे पटवून देणारे काम म्हणजे मनीष कसोदेकर यांची अक्षरचित्रे. भले काय लिहिले आहे ते वाचता येणार नाही किंबहुना तशी त्या कलाकाराची अपेक्षाही नसते परंतु तरीही ती चित्रे प्रेक्षकाला खिळवून ठेवू शकतात. अशा कलाकृती निर्माण करणे सोपे नक्कीच नसते. मलाही त्यांच्या या चित्रपर्यंतच्या प्रवासाबद्दल अजून जाणून घेण्याचे विशेष कुतूहल आहे कारण ते काम खरंच खूप प्रेरणादायी आहे. ऍबस्ट्रॅक्ट बद्दल विचार करता पिनाकीन रिसबूड यांचे कामही दृश्य-अदृश्य अक्षरांचा सुरेख मिलाप भासतो. एक उत्तम छायाचित्रकार म्हणून वावरताना त्यांची सुलेखनकार ही दुसरी बाजूसुद्धा यशस्वीरीत्या मांडलेली या प्रदर्शनाच्या माध्यमातून पाहायला मिळते. मुळचे नाशिकचे असलेले चिंतामण पगारे यांची देवनागरी भाषेतील चित्रे म्हणजे मेडिटेशन आणि कलात्मकता यांची योग्य सांगड. त्यांच्या चित्रांनी नाद, मौन, वैश्विक अनुनाद या सर्वाला दृश्य रूप देण्याचा प्रयत्न केला आहे.मनिषा नायक यांच्यामते अक्षर म्हणजे दृश्य स्वर आहे आणि त्या अक्षराला रंग , आकार , पोत, रचना यांच्या साहाय्याने भाववाचक तालबद्ध रूप देऊन अक्षरांचे आगळेवेगळे रूप जगासमोर आणण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मनिषासाठी अक्षर हे अध्यात्मिक , वैश्विक भाव आहे ज्याचे प्रकटीकरण हा एक विविध अक्षरांचा एकत्र सोहळा वाटावा. मनन साठी सुलेखनकला म्हणजे एक भावनिक प्रवाह ज्यात निर्माण होणाऱ्या प्रत्येक तरंगासोबत स्वत्व, संस्कृती आणि वारसा याबद्दलची त्याच्या विश्वातील कथा उलगडत जाते.फक्त तुलनात्मक रंगछटांचा अभ्यास आणि अक्षरांची विशिष्ट रचना यामुळे चित्राचे सौन्दर्य अगदी मोजक्या रंगांतदेखील किती फुलू शकते ही किमया रुपाली गट्टीच्या चित्रांमधून अनुभवायला मिळते. सिनेमॅटिक संकल्पन आणि सुलेखन यांचा सुरेख मेळ घडवून आणत सुलेखनाच्या माध्यमातून दृश्य कथाकथन कशाप्रकारे अस्तित्वात येऊ शकते ते या प्रदर्शनात पाहावयास मिळते. रंगीबेरंगी अक्षरांच्या दुनियेत अक्षरांची एक ग्रे बाजू पण असू शकते हे विनय देशपांडेंच्या कलाकृतीतून समोर येते आणि या तिसऱ्या परिमाणाबद्दल उत्सुकता वाढते. प्रत्येक कॅनव्हासवर विशिष्ट रचनेत, केवळ २ रंगांत मांडलेली २६ रोमन अक्षरे... अक्षरांचे एक वेगळे रूप समोर आणतात. सुलेखन , चित्रकला अनेकजण करतात पण यासाठी लागणारी शाई, साधने स्वतः केलेल्या प्रयोगातून अस्तित्वात आणणारे अश्विन कारळे सारखे उत्तम कलाकार फार कमी असतात. प्रदर्शनातील त्याचे काम म्हणजे नियमित  वापरातील अक्षरांना पारंपरिक पद्धतीत न मांडता त्यांना एका विशिष्ट शैलीमध्ये मांडून नव्या सुलेखनकारांसाठी एक चांगले उदाहरण प्रस्थापित केले आहे . जे असेल ते तसेच न घेता त्यातून नवे काही शोधण्याचा प्रयत्न करून वेगळ्या प्रकारे मांडता आले पाहिजे. स्नेहलच्या मते सुलेखन हा संकल्पन आणि ललितकला यांमधील दुवा असून ती या पिढीतील सुलेखनकारांपैकी एक आहे जिचा भर सुलेखनात मुक्तपणे भाव प्रकट करून नित्य प्रयोगशील काम करण्यावर आहे. शाईतून निर्माण झालेले अक्षरांचे तालबद्ध आकृतिबंध ऍबस्ट्रॅक्ट स्वरूप हा तिच्या 'शब्द संचार' या मालिकेतील मूळ अर्क आहे. निरूच्या प्रदर्शनातील कामाने मला खरेच एक सुखद धक्का दिला. काही महिन्यांपूर्वीच तुझी हरवलेली कॅलिग्राफी पाहण्याची इच्छा आहे असे मी तिला बोलून गेले होते आणि आज तिची चित्रे इथे लागलेली आहेत. निरूच्या चित्रांत एक लयबद्धता, चिकाटी, जागरूकता आणि शिस्त दिसून येते. प्रत्येक स्ट्रोक जणू योगामधील एक पवित्रा... मनाला शांती, स्थिरता देणारा. चौथ्या शतकातील पल्लव लिपीतून प्रेरणा घेऊन पेस्टल रंगसंगतीत अतिशय सुबकरीत्या निर्माण केलेल्या कलाकृती पारंपरिक आणि आधुनिक या दोन्ही परस्परविरोधी गोष्टींचा एकत्रित मेळ घालण्यात यशस्वी ठरल्या आहेत. निलेश देशपांडे यांची १५ चित्रांची एकत्र मालिका पाहण्यात मला विशेष मज्जा आली. प्रत्येक फ्रेम एकमेकांपेक्षा वेगळी... एक भाव , एखादी अवस्था दर्शवणारी... मोजक्या रंगांत आणि मोजक्या ढंगात सादर झालेली.... पण तरी एकमेकांसोबत सामावून जाणारी.  

कलादालनात लागलेले सर्वच सुलेखनकारांचे काम अप्रतिम आणि विलक्षण आहे...इथे ब्लॉगवर काही छायाचित्रे आहेत, थोडक्यात माहिती आहे ... पण मला विशेष नमूद करावेसे वाटते कि प्रत्यक्षपणे तिथे जाऊन घेता येणारा अनुभव त्याहीपेक्षा सुंदर असेल. त्यामुळे जर तुम्ही सुलेखनकार असतील किंवा कलाप्रेमी जरी असाल तरी मला तुम्हाला आवर्जून सांगावेसे वाटते कि या कलादालनाला भेट देऊन स्वतः ही अनुभूती घेणे केव्हाही चांगले. चित्रे नुसती बघण्यापेक्षा ती निर्माण करणाऱ्या सुलेखनकारांशी बोलून त्या चित्रांबद्दल जाणून घेण्यात एक विशेष आनंद आणि समाधान असेल. आणि त्यासाठी लेटर्स एन स्पिरिट्स हा समूह नेहमीच तत्पर असतो. या सर्वांसोबत आता पर्यंत त्यांची प्रकाशित झालेली पुस्तके जवळून पाहण्याची संधी सुद्धा आहे. २२ सप्टेंबर २०२५ हा शेवटचा दिवस असला तरी जास्त वेळ न दवडता हा आस्वाद घ्यायला हवा कारण अक्षरांची अशी मेजवानी पुन्हा पुन्हा अशाप्रकारे गॅलरीत नक्कीच मिळत नाही. 

- रुपाली ठोंबरे 



Tuesday, September 16, 2025

उदयगिरी ... एक स्वप्नपूर्ती

आज भारताची शान असलेल्या, आत्मनिर्भर भारताचे प्रतीक ठरलेल्या विशाल अशा दोन भारतीय युद्धनौका 'आय एन एस उदयगिरी' आणि 'आय एन एस हिमगिरी' दिमाखात समोर उभ्या , डावीकडे पांढऱ्या शुभ्र गणवेषांमध्ये अतिशय शिस्तीमध्ये येणाऱ्या प्रत्येक अतिथीच्या स्वागतास सज्ज असलेले ५० नौसैनिक, दोन्ही युद्धनौकांचे अभिमानाने प्रतिनिधित्व करणारे कॅप्टन, आसपास खूप काही सुरु होते पण सर्व अगदी शांतपणे आणि सुव्यवस्थेत... हे असे दृश्य माझ्यासारख्या सामान्य नागरिकासाठी स्वप्नवतच होते. पण आज मी तिथे उपस्थित होते भारतीय नौसेना पोत उदयगिरी आणि हिमगिरी या युद्धनौकांच्या प्रवर्तिकरण समारोहासाठी एक अतिथी म्हणून. खरं सांगते तिथे पाऊल ठेवणे हेच खूप अभिमानास्पद वाटत होते. लहानपणापासून आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना फक्त गोष्टींमध्ये, वर्तमानपत्र आणि दूरदर्शनवर पाहिले होते. आज आसपास त्यांच्यामध्ये वावरणे आणि ते आपल्याशी बोलत आहेत , आपले कौतुक करत आहेत , युध्दनौकेमध्ये आतपर्यंत जाण्याची संधी, देशाचे रक्षामंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत झालेली भेट हे असे क्षण आयुष्यात आले यावर विश्वासच बसत नव्हता. आणि या सर्वांचे श्रेय जाते माझ्यातील कलेला, या कलेला योग्य वेळी योग्य प्रकारे खत पाणी घालून फुलवणाऱ्या माझ्या 'अच्युत पालव स्कूल ऑफ कॅलिग्राफी' या सुलेखन शाळेला आणि युद्धनौकेसाठी कार्य करण्यासाठी उत्स्फूर्त करणाऱ्या 'उदयगिरी' युद्धनौकेच्या कलाप्रेमी कॅप्टनला. 

आजही प्रकर्षाने आठवतो तो दिवस. जानेवारी २०२५ मध्ये मुंबईतील प्रतिष्ठित अशा 'जहांगीर आर्ट गॅलरी' या कलादालनात आमचे 'अक्षरभारती' हे सुलेखन कलाप्रदर्शन यशस्वीरीत्या पार पडत असताना एके दिवशी भारतीय नौसेनेचे कॅप्टन आणि सोबत कमांडर यांनी तिथे भेट दिली.ते तिथे सामान्य दर्शकाप्रमाणे आले होते पण तरी त्यांची बोलण्याची पद्दत, समोरच्याबद्दल असलेला आदर , शांत असे व्यक्तिमत्त्व या सर्वामुळे आमची ती भेट असामान्य वाटली. मला मुळातच माझ्या कलाकृतींबद्दल भरभरून बोलायला खूप आवडते आणि इथे तर समोरून चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यांनाही माझ्या कल्पना , विचार जाणून घेण्यात रस होता. भारतीय ११ शास्त्रीय भाषांमध्ये केलेल्या एका कलाकृतीने त्यांचे लक्ष वेधून घेतले. त्या चित्राबद्दल सांगताना मी कित्येक वर्षांपासून असलेली माझी इच्छा व्यक्त केली. आपला देश जसा शेतीप्रधान आहे तसाच तो लिपिप्रधान आहे. अनेक भाषा आणि लिप्यांनी समृद्ध अशी आपली भारतीय संस्कृती अशा चित्रांच्या माध्यमातून जगासमोर मांडली तर नक्कीच भारत देशाची एक खूप सुंदर आणि महत्त्वपूर्ण बाजू विश्वात प्रकाशमान होईल. कदाचित हाच माझा विचार त्यांना आवडला असावा आणि काही महिन्यांतच त्यांनी मला संपर्क साधला. आणि त्यानंतर 'उदयगिरी' या नावाला समर्पक अशा एकूण ४ कलाकृती माझ्या हातून घडून आल्या ज्यांनी भारतीय सुलेखन क्षेत्रात आज एक इतिहास घडवला. 


या प्रत्येक चित्राचे एक वैशिष्ट्य आहे. खरे तर प्रत्येक चित्रातून एक नवीन ब्लॉग निर्माण होईल. मी तयार केलेली सर्व अक्षरचित्रे असल्याने चित्रातील कण न कण अक्षरांनी सामावून गेलेला आहे. त्यातील एका चित्रात शास्त्रीय , अधिकृत आणि पुरातन अशा एकूण २१ भारतीय भाषांमध्ये उदयगिरी हे नाव रंग आणि रचना यांचा मेळ घालून कलात्मकतेने मांडण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. २१ च का तर २१ फेब्रुवारी हा मातृभाषा दिवस म्हणून ओळखला जातो म्हणून. जरी अनेक लिपी असतील तरी ते चित्र एक वाटते... ही  संकल्पना भारतातील विविधतेत असलेली एकता दर्शवते. हे चित्र नौकेमध्ये कॅप्टनच्या केबिन मध्ये दिमाखात विराजमान झाले आहे. माझ्याप्रमाणेच इतरही चित्रकारांची चित्रे त्या दालनात भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवत आहेत.  दुसरे चित्र म्हणजे ५ फ्रेम्सची एकत्र रचना. यातील प्रत्येक चित्रचौकटीत उ द य गी  री अशी अक्षरे समुद्रलाटांच्या अक्षरशैलीमध्ये अनुक्रमे मांडली आहेत... दुरून दिसताना ते फक्त एक अक्षर वाटते पण जवळ जाऊन पाहिले तर ते प्रत्येक अक्षर हजारो भारतीय लिपीकृत अक्षरांनी तयार झालेले आढळून येईल. या चित्रात एक विशेष म्हणजे यात असलेला एक प्रतीकात्मक बिंदू जो प्रतीक आहे सूर्याचा... प्रत्येक फ्रेममध्ये त्या बिंदूचा होणारा प्रवास म्हणजे सूर्योदय... उदयगिरी या त्या नौकेच्या नामार्थाला समर्पक. हे चित्र नौकेमध्ये कॅप्टनच्या बेडरूम मध्ये आहे. घरी तयार करताना हे चित्र खूप सामान्य वाटले मला पण त्या ठिकाणी फ्रेमिंग केल्यानंतर खूप सुंदर वाटत होते. खरेच म्हणतात ना चित्राला योग्य जागा , प्रकाशयोजना मिळाली तर त्यातील सौंदर्य अधिक खुलते. तिसऱ्या चित्राची अक्षरांची मूळ संकल्पना अशीच होती फक्त इथे बिंदू नसून पाचही चित्रे विविध रंगांतील अक्षरांनी भरून गेली आहेत. हे पाच रंग म्हणजे ऋतूंचे प्रतीक... आपली युद्धनौका सर्व ऋतूंमध्ये, परिस्थितींमध्ये त्याच जोशात आणि उत्साहात कार्यरत असेल ही त्यामागची माझी संकल्पना. चौथे चित्र म्हणजे मी प्रथमच केलेला एक आगळावेगळा प्रयोग होता जो सुरुवातीला फार कठीण वाटत असला तरी शेवटी ते यशस्वीरीत्या पूर्ण झाले. उगवत्या सूर्यासोबत रंगलेले आकाश, खाली समुद्राच्या पाण्यातील लाटांवर अलगद पसरलेले त्याचे  प्रतिबिंब, एक पक्षांचा थवा जणू या दिनकराला भेटण्यासाठी आतुर होऊन झेप घेत आहे आणि अशा या वातावरणात विशाखापट्टणम येथील डॉल्फिन टेकडीवर दिमाखात उभे असलेले दीपगृह...असे भूदृश्य मी प्रथमच कॅनवासवर अस्तित्वात आणले होते आणि या चित्राचे वैशिष्ट्य म्हणजे इथे पाणी, आकाश, अगदी पक्षीसुद्धा अक्षरांनी चितारले होते. वॉर्डरूम म्हणजे डाईनिंग एरिया... तिथे ही दोन्ही चित्रे आज नौसैनिकांना साथ देण्यासाठी तिथे उपस्थित झाली आहेत. ओडिया लिपीमधील अक्षरे आणि देवनागरीतील शिरोरेषेला एक वेगळे वळण देऊन समुद्राच्या लाटा निर्माण झाल्या, तेलुगू मधील अक्षरांची एक विशेष ठेवण असते आणि त्यातूनच माझ्या चित्रातील पक्षी अगदी लयीत जन्माला आली, आता राहिले आकाश तर ते मात्र ११ भाषांतील अक्षरांनी भरून आले होते. प्रत्येक लिपीतील अक्षरे थोडी वेगळी पण अगदी सहज इतरांसोबत सामावून जाणारी...आपल्या देशाची हीच तर खासियत आहे. 




महिनाभरापूर्वी ही चित्रे घरात साकारत असतानाही काही वेगळ्याच भावना होत्या. आपल्या देशासाठी काही करायला मिळणे हे प्रत्येकाचेच स्वप्न असते. एकदा बोलता बोलता तेथील कमांडर बोलून गेला कि आम्ही घरापासून ४-६ महिने दूर नौकेवर असताना एका वेगळ्याच मानसिक स्थितीमध्ये असतो त्यावेळी तुझी ही चित्रे मनाला एक वेगळा आनंद देतील ही सुद्धा एक वेगळ्या प्रकारची देशसेवाच आहे... त्याचे हे शब्द अक्षरशः मनावर खूप खोल कोरले गेले आहेत आणि स्वतःबद्दल एक वेगळा अभिमान जागृत झाला. आज ती सर्व चित्रे सागवान फ्रेम्स मध्ये बंदिस्त होऊन युद्धनौकेमधील महत्वाच्या ३ रूम्स मध्ये आहेत. देशाच्या इतक्या प्रतिष्ठित ठिकाणी पितळेच्या टॅलीवर कोरलेला प्रत्येक चित्रामागचा माझा विचार आणि वर्णन... त्यासोबत त्यावर कोरलेले आपले नाव हा मला मिळालेला आतापर्यंतचा सर्वात मोठा सन्मान आहे असे मी मानते. जोपर्यंत ही युद्धनौका राहील तोपर्यंत ती चित्रे अजरामर राहतील असे जेव्हा त्यांनी सांगितले तेव्हा धन्य वाटले. आणि हे सर्व स्वतःच्या डोळ्यांनी पाहून आणि स्वतः अनुभवणे हा एक खूप मोठा अविस्मरणीय क्षण होता. 

या सर्वांतून आनंद , समाधान , सन्मान तर मिळालाच पण यात घडलेली प्रत्येक गोष्ट प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे खूप काही शिकवून गेली. आपण सैनिकांबद्दल, त्यांच्या त्याग-शौर्य-कर्तृत्वाबद्दल खूप काही ऐकतो परंतू त्याची जाणीव मला तिथे उपस्थित राहून जास्त झाली आणि त्यांच्याबद्दल असलेला अभिमान द्विगुणित झाला. देशातला प्रत्येक नागरिक आपल्या कुटुंबासोबत सुरक्षित राहावा यासाठी त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या त्यागासमोर आपल्या व्यथा फारच तुटपुंज्या वाटू लागल्या. अजून एक गोष्ट जाणवली ती म्हणजे शिस्त. सैन्यामध्ये शिस्त असते हे माहित होते पण ठरलेल्या वेळेपेक्षा एक मिनिट उशीर सुद्धा अजिबात चालत नाही किंवा ठरलेल्या गणवेषात काडीमात्राचाही बदल अशा चुकीला माफी नाही, कुठलीही सबब अपेक्षित नसते आणि तिथे काम करणारेदेखील इतके शिस्तशीर असतात कि आपली चूक लक्षात येताच कुठलीही सबब पुढे न करता लगेच  आवश्यक ती कृती करतात हे प्रत्यक्ष पाहिले. त्यांचे स्वतःचे काम, बोलण्यात मिनिटामिनिटाचा हिशोब असायचा. त्यामुळे वेळेची किंमत कशी असावी हे शिकायला मिळाले. त्यांचे व्यक्तिमत्त्व ही तर प्रत्येक सामान्य व्यक्तीवर खास ठसा उमटवणारी असते. आदराने बोलणे, वागणे आणि त्यासोबतच असलेले देशप्रेम हे सर्व त्यांच्या प्रत्येक कृतीतून जाणवते. 

पूर्वार्धात ८ वर्षे 'ओ एन जी सी' साठी 'वेल प्लॅनर' म्हणून काम करत असताना जो देशाभिमान मला जाणवायचा त्याच भावना जवळजवळ १० वर्षांनंतर उदयगिरीसाठीचे हे काम करताना दाटून आल्या. याच वर्षी माझे गुरु आणि APSC चे सर्वेसर्वा अच्युत पालव यांना सुलेखन क्षेत्रातील विलक्षण कामगिरीबद्दल 'पद्मश्री' हा किताब देऊन सन्मानण्यात आले  आणि त्याच वर्षी त्यांच्या एका विद्यार्थिनीच्या सुलेखन चित्रांना भारतीय नौदलाने अशाप्रकारे सन्मान बहाल केला हे सर्वच भारतीय सुलेखनकारांसाठी प्रेरणादायी आहे. या दोन्ही गोष्टी भारतीय सुलेखन क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण आहेत. 'तू माझी विद्यार्थिनी आहे हे सांगताना मला अभिमान वाटतो'... आपल्या गुरुकडून अशा शब्दांत आपले कौतुक व्हावे हे प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. आणि उदयगिरीच्या या माध्यमातून आज स्वप्नपूर्ती झाली असे मला वाटते. माझ्याप्रमाणेच इतर अनेक सुलेखनकार देशातील अनेक भाषांत, लिप्यांत उत्तम काम करत आहेत, त्या सर्वानाच अशाप्रकारे संधी उपलब्ध झाल्या तर नक्कीच या क्षेत्रात एक नवी क्रांती घडून येईल.  एरव्ही चित्रकलेत काय ठेवले आहे म्हणणाऱ्यांसाठी या कलाक्षेत्रातही भविष्यात किती संधी उपलब्ध आहेत त्यासाठीचे हे एक उत्तम उदाहरण आहे. तीव्र इच्छा असेल तर माणूस कुठेही आपले स्थान प्रबळ करू शकतो. त्यामुळे आपली मुले नुसती चित्र काढत असतील तर त्यासाठी दुःखी न होता त्यांना त्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. यातूनच एक नवा भारत नक्कीच जगासमोर येईल. 

 - रुपाली ठोंबरे . 


Blogs I follow :