वर्षाच्या सरतेशेवटी या वर्षातील चांगल्या-वाईट गोष्टींचा छोटासा हिशोब यावेळी अगदी नकळतच मांडला गेला. याचे मुख्य कारण म्हणजे हे वर्ष स्वप्नांची पूर्तता करणारे ठरले...कधी काळी पाहिलेली पण कुठेतरी हरवलेली आणि कधी न पाहिलेली अशी सुखद धक्का देणारी. यांपैकी एक स्वप्न होते आपल्या आवडत्या विषयाचे रितसर, अगदी मनापासून घेतलेले शिक्षण. लहानपणापासूनच भाषा आणि चित्रकला या विषयांत विशेष रुची होती पण दहावीत चांगले गुण मिळाले आणि जणू सामाजिक नियमाप्रमाणे पावले अभियांत्रिकी दिशेकडे वळली. आणि दोन्ही विषय केवळ छंद म्हणून जीवनात राहिले. जे काही दहावीपर्यंत शिकले तेच नकळत पुढे फुलत गेले. त्यात सुंगंध होता, तो दूरवर पसरला देखील, परंतू जो मकरंद मनास तृप्त करेल तो काहीसा लुप्त होता. APSC आणि अच्युत सरांच्या सानिध्यात तो बऱ्याच प्रमाणात गवसला. आपल्या आवडत्या विषयात गुरु म्हणून पद्मश्री अच्युत पालव यांच्यासारखे व्यक्तिमत्व लाभणे हे खूप मोठे भाग्य आहे. असेच भाग्य पुन्हा एकदा नव्याने झळकावे तसे या वर्षात विक्रांत शितोळे सर गुरु म्हणून माझ्या आयुष्यात आले. आणि त्यांनी आयोजित केलेल्या 'फॉउंडेशन कोर्स' च्या रूपात खऱ्या अर्थाने चित्रकला या विषयाला योग्य दिशा मिळाली अगदी नेहमी हवी होती तशी.
फेब्रुवारी महिन्यात साधारण ८ महिने सुरु राहणारा हा पाठयक्रम सुरु झाला आणि जीवनात एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली. वरवर सोपा वाटणारा हा विषय तितकाच क्लिष्ट देखील आहे कारण चित्रकला म्हणजे केवळ एक विषय नाही तर या कलेचे अनेक अंग एकत्र आणून स्वतःतील सर्जनशीलतेला धडवण्याचे हे अध्ययन आहे. या अभ्यासक्रमात मला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे या प्रत्येक अंगाचा सखोल अभ्यास करून त्यातून माझ्यातील मीच नव्याने गवसत गेले. याचे पूर्ण श्रेय द्यायचे झाले तर हा विषय आणि त्यांतील उपविषय योग्य प्रकारे जाणून घेऊन , येणाऱ्या विद्यार्थ्यांची योग्यता लक्षात घेऊन जाणीवपूर्वक आखलेली संपूर्ण रूपरेषा आणि अर्थातच या सर्वांचे अचूक रेखाटन करणारे आणि अनुभव देणारे एक उत्कृष्ट शिक्षक - विक्रांत शितोळे सर. त्यामुळे सुरुवातीला जटिल वाटणारे विषय सुद्धा नंतर आनंददायक ठरू लागले. आम्ही अंदाजे ३५ विध्यार्थी... या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून ऑनलाइन एकत्र आलो. पहिला दिवस प्रस्तावना-परिचयाचा आणि मग लक्षात आले कि यांतील बहुतेकजण माझ्यासारखेच एका राहिलेल्या स्वप्नाच्या शोधात इथवर पोहोचले होते. शिक्षण आणि व्यवसाय जरी वेगवेगळ्या क्षेत्रात असतील तरी प्रत्येकाचा खरा आनंद चित्रात होता. एकमेकांना आजवर भेटलो नाही पण उत्तम संयोजनामुळे ती कमी इतकी भासलीच नाही. प्रत्येकाचेच काम अप्रतिम... फक्त काम नाही तर प्रत्येकाकडून काहीतरी गुण शिकण्यासारखा नक्कीच आहे आणि एकत्र अध्ययनामध्ये हेच खरे महत्वाचे. सर्वच सर्व उपविषयांत निपुण नक्कीच नाहीत पण एकमेकांच्या सोबतीने आणि योग्य मार्गदर्शनाने भविष्यात नक्कीच यात यशस्वी होतील. इतरांच्या चांगल्या कामाची योग्य दखल घेऊन, कौतुक करून प्रोत्साहन देण्याची कलासुद्धा खूप गरजेची आहे जी मला या ग्रुप मध्ये विशेष जाणवली.
संपूर्ण विषय खूप मोठा आहे, तो ८ महिन्यांत पूर्ण शिकणे जवळजवळ अशक्यच पण शास्त्र , तंत्र, विद्या आणि कला या माध्यमातून सुरुवात झाली आणि कलेचे एकेक पदर समोर उलगडू लागले. चित्रकला म्हणजे केवळ कागदावर चित्र काढणे नाही तर चित्र आधी मनात आखले जाते आणि मग भावनांच्या रंगांत भिजून हस्तरूपी कुंचल्यातून जगासमोर अविष्कार घडवून आणण्याची ही दैवी क्षमता. हा अभ्यास करताना नाट्यशास्त्र , चित्रसुत्र अशा ग्रंथांचा किती प्रभाव आपल्या कलेवर आहे हे सरांनी पहिल्याच वर्गात मनावर बिंबवले. आश्चर्य वाटले जेव्हा कळले कि चित्रकलेचा अर्थ फार पूर्वी महर्षी वत्सायन यांनी कामसूत्रात अशाप्रकारे शब्दात मांडला आहे -
रूपभेद: प्रमाणानी भावलावणीयोजनं ।
सादृश्यम वार्णिकाभंग इति चित्र षडंगकं ।।
या ग्रंथांप्रमाणेच सर वेळोवेळी इतर प्रतिष्ठित चित्रकारांची कामे आणि पुस्तके दाखवून आम्हांला प्रेरणा देत. भोवताली जे जे दिसते ते ते योग्य प्रकारे आत्मसात करून कसलीही लाज न बाळगता कुठेही असाल तरी रेखाटन सुरु ठेवा आणि पहा तुमच्यातला कलाकार आपोआपच बहरू लागेल हा त्यांच्या शिक्षणातील मूळ गाभा. मुळात अॅनिमेटर असलेले विक्रांत सर आम्हांला प्रत्येक प्रसंगी त्यांच्या त्या कामातील दाखले देऊन एका नव्या क्षेत्राबद्दलसुद्धा प्रकाशमान करत असत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय या दोन्ही स्तरांवर त्यांचे कार्य नित्य सुरु असते, विविध कार्यशाळा आणि प्रदर्शने या सर्वातून वेळ काढून ते वेळोवेळी आम्हांला त्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात सदैव तत्पर असतात. उदाहरण द्यायचे झाले तर रशियाला, लडाखला सर गेले पण त्याचा अनुभव इतक्या सुंदर पद्धतीत कथन आणि दर्शनीय झाला कि आम्ही सर्व सुद्धा काही प्रमाणात त्या प्रवासाची अनुभूती घेतली. हे अशाप्रकारे जीव ओतून शिकवणारे, आपल्यातले केवळ इतरांवर न लादणारे फार कमी असतात. रंगसंगती असो वा परस्पेक्टिव्ह, ह्यूमन अनॉटॉमी असो वा कन्स्ट्रक्शन, सुलेखन असो वा शेडींग ... उपविषय कोणताही असो त्यातील मूलभूत जाणून घेणे फार महत्वाचे आणि त्यानंतर ते एकमेकांत योग्य रीतीने गुंफून सादर करणे हीच तर खरी चित्रकला ना? Gauche या रंगमाध्यमात प्रथमच काम केले मी, पण त्यात उद्भवणाऱ्या समस्या व त्यावर केलेले उपाय या सर्वातून नवे काहीतरी शिकत गेले. या वर्गात प्रामुख्याने काही शिकले असेल तर ते हे कि कोणतीही गोष्ट सुरुवातीला कठीणच भासते पण तिला सोपे करून मांडले तर अगदी अशक्य वाटणारे कार्यसुद्धा आपल्या हातून सहज घडून येऊ शकते. खरेतर प्रत्येक विषयावर खूप काही आहे सांगण्यासारखे. विषय किती क्लिष्ट असतात पण ते कसे सोप्या पद्धतीत आणि योग्य क्रमाने मांडले तर सहजसोपे होते हे स्वतः अनुभवण्यासारखे आहे. त्यामुळे यावर अधिक भाष्य करणे टाळावे म्हणते. फक्त समोर असलेले जसेच्या तसे कागदावर उतरवणे हे चित्र मुळात नसतेच... त्यामुळे वास्तव रेखाटायला हवे पण त्यात आपल्या सर्जनशीलतेचा मुलामा असायला हवा तेव्हा ते चित्र दुर्मिळ बनते. स्थिरचित्र हा विषय हाताळताना वास्तव रेखाटताना ते सुंदर कसे मांडावे ही खरी पहिली पायरी असते हे जाणवले. चित्र काढताना प्रकाशयोजना , फोटोग्राफी, मांडणी हे सर्व देखील कसे आणि किती महत्वाचे आहे ते हळूहळू आमच्यात उतरत गेले आणि ते कामातून समोर येत गेले. या अभ्यासक्रमातील सर्वात आनंददायक विषय म्हणजे शेवटचा उपविषय - abstract... जिथे सात महिने सुरु असलेल्या शिस्तशीर कार्याला तात्पुरता स्वल्पविराम देऊन असते कागदावर स्वैर विहरणे, मनसोक्त रंग उधळणे , मनातील भावनांचे आकार आपोआप समोर उमटणे... आणि यातुन निर्माण होणारे ते सर्व आपल्या स्वतःसाठी सुद्धा अद्भूत ठरावे , जणू काही जादूच... कोणी केली? आपणच... आपल्या अंतर्मनातल्या लपलेल्या चित्रकाराने जो हळूहळू बाहेर येऊ लागला आहे. पण ही जादू तेव्हाच शक्य आहे जेव्हा तो पुष्कळदा कंटाळवाणा वाटणारा ७ महिन्यांचा शिस्तशीर प्रवास सफलरीत्या पूर्ण होईल.
विक्रांत सर... खरेच मनापासून खूप खूप आभार असा हा अभ्यासक्रम योजून आमच्या सारख्या कलाप्रेमींना एक खरा मार्गदर्शक स्वतःच्या रूपात मिळवून दिल्याबद्दल. मार्गदर्शन करणारा चेहरा जितका महत्वाचा तितकेच महत्वाचे ते हात ज्यांच्या हातभाराशिवाय इतका मोठा ऑनलाईन उपक्रम उभारणे फार कठीण. आणि ते हात कृपा मॅमचे आणि त्याबद्दल मनापासून धन्यवाद. जसा गुरु तसे त्यांचे शिष्यही, त्यांच्या सहवासात येणारे सर्व विद्यार्थी सुद्धा अशाचप्रकारे निःस्वार्थ भावनेने इतरांपर्यंत पोहोचावे हा त्यांचा प्रामाणिक विचार मला नेहमी भावतो. योग्य तेच लोकांपर्यंत पोहोचावे हा त्यांचा अट्टहास त्यांच्या बोलण्यातून नेहमी दिसून येतो. विक्रांत सरांचा क्लास म्हणजे अशी शाब्दिक कलात्मक मेजवानी जी कितीतरी प्रसंगी भावुक करणारी, तुम्हाला पुढच्याच क्षणी सुंदर काही करण्यास उत्स्फूर्त करेल आणि पुढचा कितीतरी काळ या सर्वातून मिळणाऱ्या आनंददायी समाधानाने तृप्त करेल. ही मेजवानी काही दिवसांनंतर थांबणार असली तरी त्या शब्दांची जादू नक्कीच भविष्यात काहीतरी चमत्कारीत कार्य घडवून आणण्यात यशस्वी ठरेल.
- रुपाली ठोंबरे



No comments:
Post a Comment