( हल्ली अन्न ,वस्त्र ,निवारा या मुलभुत गरजांप्रमाणेच मोबाईल ही सुद्धा एक खूप मोठी गरज बनली आहे. गरज म्हणण्यापेक्षा त्याची आता सर्वांनाच खूप सवय झाली आहे. आणि त्याचा वापर काही ठराविक वर्गासाठी मर्यादित नसून सर्वच त्याच्या प्रेमात आहेत. अगदी मोठ्या व्यावसायिकापासून ते भाजी विकणाऱ्यापर्यंत, अगदी ५ महिन्यांच्या छकुलीपासून ते ८० वर्षांच्या आजोबांपर्यंत सर्वांनाच याचा भारी लळा. आणि का नसेल बरे ? याच्या मदतीने आपल्यापासून शरीराने दूर असलेल्या पण मनाने जवळ असणाऱ्याबरोबर संवाद साधता येतो . हल्ली तर कॅमेरा ,रेडीओ,गाणी ,खेळ असे सारे यात असल्याने या मैत्रीचे रुपांतर आज प्रेमात झाले आहे , हे खरे . कोणताही ,कुठेही कसाही क्षणच काय तर खऱ्याखुऱ्या चित्रांची मालिकाही अचूक टिपता येते. हल्ली रस्ता शोधायचा असेल किंवा साधे रोजचे गणित जरी सोडवायचे असेल तरी याची आठवण काढली जाते. कुठेही सोबत हा असला तर इतर कोणताही विरंगुळा लागत नाही हे मात्र खरे. मग हाच 'जिवापेक्षा प्रिय' कधीतरी चुकून घरी राहिला कि जीव अगदी कासावीस होतो. एखादया प्रियकराला भेटण्यासाठी जशी ओढ मनात असते तशीच किंबहुना त्यापेक्षा अधिक आतुरता असते. आणि मग कधी एकदा घरी जाऊ आणि याला दिवसभर चुकचुकलेल्या बोटांच्या मिठीत घेवून दिवसभराचे काही काळ हरवलेले सुख अनुभवू असे होते …… )
काय कसे झाले ,कसे तुला विसरले आज , समजतच नाही
तुझ्याविना आज मला मुळी करमतच नाही ।।
तू नाही हाती आणि जणू कोणीच नाही संगती
तुझ्याविना आज जणू थांबल्या साऱ्या भेटीगाठी ।।
तुझ्यासवे ऐकता गाणे, मोर मनी नाचती
आज झाले शांत सारे मग ओठ तरी काय गुणगुणती ।।
क्षण एकेक तू सारे टिपतो अचूक , हे डोळे जे पाहती
आज जगही अनोळखी दिसे जेव्हा तू नाही माझा सांगाती ।।
तुझ्याविना हल्ली बघ, होतच नाही बेरीज-वजाबाकी
तू नाहीस आणि चुकत जाते दिवसाचे गणितही ।।
बोटांना माझ्या आता लागला लळा तुझाच भारी
कधी एकदा घरी जाते अन तुला भेटते असे झाले उरी ।।
असा कधी झालास रे तू माझा सर्वात प्रिय सवंगडी
तुझ्या असण्या - नसण्याने खूप फरक पडतो रे हल्ली ।।
- रुपाली ठोंबरे .
Ekdam perfect Rupali
ReplyDeleteNice one .!
ReplyDeletemast...
ReplyDelete