Sunday, February 21, 2016

सेल्फी… आधुनिक जगातील एक जीवघेणे वेड



परवा एका मैत्रिणीच्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाला गेले. हल्ली लहान मुलांचा पहिला आणि पाचवा वाढदिवस म्हणजे थाटामाटातच असावा अशी प्रथाच सुरु झाली आहे . छान वातानुकूलनाची सोय असलेला अलिशान हॉल घेतला होता. रंगीबेरंगी फुग्यांची कमान दारातच सर्वांचे स्वागत करत हसत बाहेरून येणाऱ्या वाऱ्याच्या सौम्य झुळूकेसोबत डुलत उभी होती. तशीच फुग्यांची पण काहीश्या वेगळ्या आकारात रंगीत आरास समोरच्या मंचाभोवती सजली होती. होम एअर फ्रेशनरचा सौम्य सुगंध दरवळत होता. जागोजागी विविध कार्टून पात्रांचे रूप धारण करून आपल्या उत्तम वेशभूषेची कला दाखवणारे कलाकार फिरत होते.रंगीबेरंगी, सुंदर कपड्यांत लहान मुले आपल्या आईवडिलांना न जुमानता इकडेतिकडे बागडत होती. प्रत्येकाच्या डोक्यावरच्या शंकुकृती कागदी रंगीत टोप्या उठून दिसत होत्या.लहानग्यांना आकर्षित करणारे खेळ सुरु होते. मुलीचे दोन्ही आजी-आजोबा अगदी कौतुकाने सर्व पाहुणे मंडळींची विचारपूस करत आनंदात प्रत्येकाला लगबगीने भेटत होते. मैत्रिणीचा नवरा मात्र ही सर्व व्यवस्था पाहण्यात तितक्याच आनंदात होता. हाक मारताच हातात येणारा शीतपेयाचा ग्लास आणि आग्रहाचे स्टार्टर्स यांमुळे खाण्यापिण्याचीही रेलचेल सुरु होती. एकूण वातावरण अगदी छान वाटत होते… असेलच.चांगला लाख रुपयांचा तरी खर्च केला असेल त्या १ वर्षाच्या बाळाच्या आईबाबांनी….आजच्या मोडर्न भाषेत सांगायचे झाले तर हे एक मिनी लग्नच. आणि हे सर्व एक खास नेमलेला छायाचित्रकार अचूक टिपून घेत होता.शिवाय आमच्या सारख्यांचे अत्याधुनिक स्मार्टफोन्सही आमच्या चील्ल्यापिल्ल्यांचे काढण्यासाठी इकडेतिकडे विहरत होते.

असाच एक तास घालवल्यावर नुकताच खरेदी केलेला छान नवा फ्रॉक, त्यासोबत इंचभर केसांच्या केलेल्या अनोख्या केशरचनेला सांभाळणाऱ्या  इवल्याशा म्याचिंग पिना,बांगड्या, बूट असे कितीतरी आभूषणे परिधान करून ती चिमुरडी उत्सवमूर्ती तिच्या आईसोबत प्रकट झाली. आधी तर इतके सारे लोक आणि त्यांची जबरदस्तीची जवळीक पाहून ती घाबरलीच. बिचारीचा सुरु असलेला ओळख समारंभ पाहून क्षणभरासाठी त्या लहान जीवाची दया ही आली. या सर्वाला कंटाळून जेव्हा तिने आपला भोंगा सुरु केला तेव्हा आता लवकरात लवकर केक कापायला हवा याची सर्वाना जाणीव झाली. याचे एक छान मजेदार कारण आहे. ही अशीच रडत राहिली तर केलेली सर्व तयारी विस्कटून जाईल आणि केक कापताना तिचा फोटो चांगला येणार नाही. 'फोटो'… सर्वांचेच आकर्षण. आणि तसेच हसत रडत मेणबत्ती विझवण्याचा,केक कापण्याचा, भला मोठा फुगा अगरबत्तीने  अचूक फोडण्याचा, त्यातून बाहेर पडणाऱ्या रंगीत वर्षावाचा, सर्वांचा आनंदाचा सोहळा पार पडला. आणि मग नवा कार्यक्रम सुरु झाला तो म्हणजे फोटोग्राफीचा. आता या क्षणी हॉलमधील सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे तो छायाचित्रकार. तोही लगबगीने त्या छकुलीचे या न त्या सर्व नात्यांसोबत फोटो काढत आपली कला दाखवत मग्न होतो.त्यानंतर आई-मुलगी,बाबा-मुलगी,मुलगी -केक,तिघे आणि केक ,आत्या ,आजी-आजोबा,मामा अशा सर्व उपस्थितीत असलेल्यांचे वेगवेगळ्या अलटपलट आणि संयोगातून शेकडो फोटो काढले गेले. आता जवळजवळ सर्व उपस्थित पाहुणे चित्रफितीवर आले असतील तेवढ्यात त्या चिमुरडीची मावशी एक भली मोठी सेल्फी स्टिक आणि त्याच्या दुसऱ्या टोकावर अडकवलेला तिचा अत्याधुनिक स्मार्टफोन असे समीकरण घेवून धावत पळतच समोर आली."अब इस ख़ुशी के मौकेपर एक सेल्फी तो बनता  है" म्हणत चांगले १५-२० सेल्फी तिने काढले. पुन्हा तेच वेगवेगळे combinations. यात त्याचा चेहराच दिसत नाही, अमक्यावर सावली येते आहे तर कुठे तमक्यावर भरघोस प्रकाशाचा झोत अशा या न त्या कारणांनी झालेल्या पुनारावृत्तींची तर गणतीच नाही. असे हे फोटो प्रकरण बराच वेळ रेंगाळले. आता फोटो निघाला म्हणजे सर्वांचे चेहरे आणखी तृप्त दिसू लागले. काहीजण तर अजूनही आपण फोटोत कसे दिसत असू त्यासाठी काढलेल्या फोटोंची पुन्हापुन्हा उजळणी करत होते. काहींच्या बाबतीत फोटोसाठी इतके वेड म्हणजे मूर्खपणाच आणि त्यात हे नव्या युगातले सेल्फी वेड म्हणजे तर महामुर्खपणाच.

अलीकडे हे सेल्फिचे फ्यॅड भलतेच वाढत चालले आहे. क्वचितप्रसंगी सेल्फी ही खरच गरज असते. आम्ही एकदा दुबईला फिरायला गेलो होतो तेव्हा आमचा अति आधुनिक कॅमेरा खूप कमी लोकांना हाताळता यायचा आणि परिणामतः फक्त एकमेकांचे किंवा नुसत्या सभोवतालचे फोटो आमच्याकडे जमा होवू शकले. दोघांचे एकत्र असे खूपच कमी फोटो काढता आले. तर तेव्हा हे सेल्फिचे ज्ञान इतके प्रगत नव्हते म्हणून अचूक वापरताही आले नाही. या प्रसंगावरूनच आणखी काही आठवले. २०१० सालची लंडनमधील ती गुलाबी पहाट.…  आणि मी एकटीच त्या नव्या देशी नवे काही अनुभवताना.लहानपणापासून इंग्लिश कवितेमधून ज्याच्याबद्दल विलक्षण आकर्षण वाटत होते त्या लंडन ब्रिजवरून चालताना अचानक थेम्स नदीवर आले आणि समोर टॉवर ब्रिज दृष्टीस पडला. आता याच्यासोबत आपला एकतरी फोटो असावा असे अगदी मनापासून वाटले. पण तेव्हा काही आजच्या सारखी जादुई सेल्फी स्टिक नव्हती. शेवटी इच्छा प्रबळ होती म्हणून तिथेच एक जपानी मला भेटला. तोही माझ्यासारखाच एकटा भटक्या. त्याने स्वतःहूनच माझ्या कॅमेरातून माझा फोटो काढून देऊन माझी इच्छा पूर्ण केली . आणि आज माझ्या लंडनभेटीच्या अल्बम मध्ये हा फोटो एक अप्रतिम आठवण बनून राहिला . आता त्यावेळेस या बदल्यात त्या जपानीने माझ्याकडून त्याच्या वेगवेगळ्या आकृतींची चांगली २५-३० फोटोंची मालिकाच बनवून घेतली. असो…. सांगण्याचे तात्पर्य असे कि काहीप्रसंगी हे सेल्फिसारखे वेड पांघरावे लागते हे जरी खरे असले तरी त्यावर एक नियंत्रण नक्कीच असावे. या सेल्फिबद्दल नुकत्याच एका ब्लॉग मध्ये लिहिलेले आठवले - सेल्फी काढत असताना आपण काहीतरी बावळटपणा करत असल्याचा भाव त्या मूक चित्रात नकळत दिसून येतो.

मला खरेतर हा सेल्फी प्रकार मुळीच आवडत नाही पण बदलत्या काळानुसार बदलले पाहिजे हेही तितकेच खरे. पण ही विचित्र क्रांती इतक्या वेगात घडून आली कि कळलेच नाही आपण कधी यात सहभागी झालो. आज युवा पिढी सोडाच, त्या साठीच्या घरातल्या रमामावशी पण त्यादिवशी नवी साडी घालून कॅमेरा समोर वेडेवाकडे तोंड करत आढळल्या. लहान मुलांच्यात तर हे सर्व प्रकार खूप लवकर अंगवळणी पडतात. त्यादिवशी एका मैत्रिणीच्या मुलाचा वेगळाच फोटो तिचा DP म्हणून पहिला आणि तिला त्याबाबत विचारले असता त्या ५ वर्षाच्या लहानग्याने स्वतःचा कसा छान फोटो काढला याचे कौतुक पुराण ऐकत बसण्याचा योग चालून आला. ज्या गोष्टीची सवय पडू नये म्हणून वेळीच आळा घालायला हवा त्या गोष्टीचे तोंड भरून कौतुक करणाऱ्या आईचे मला विशेष आश्चर्य वाटत होते. याची इतकी लागण होण्यामागे त्याची होणारी सततची जाहिरात हेही एक कारण आहे. अलीकडे सेल्फी नावाचा उल्लेख असलेले नाटकही येऊन गेले.चित्रपट आला असेल कि नाही हे इतके ज्ञात नाही जरी नसेल आला तरी येत्या काळात असा एखादा चित्रपट नक्कीच पडद्यावर झळकेल यात शंका नाही.  "चल आज सेल्फी ले ले रे " म्हणत बेधुंद नाचणाऱ्या सलमानसोबत या प्रकाराला रुपेरी पडद्यावरही मनाचे स्थान मिळाले. हल्ली कुठलाही शो असेल तर प्रमुख पाहुण्यासोबत एक सेल्फी काढण्याची आगळी प्रथा सुरु झाली. आणि हे सर्व पाहून आपल्यातला एक कलाकार जागा होतो आणि स्वतःवरच प्रयोग करू लागतो. सेल्फी शब्द इतका प्रचलित झाला कि चेहऱ्याचा सेल्फी घेण्यापेक्षा मनाचा, अंतःकरणाचा सेल्फी घ्यावा असेही सुचवण्यात आहे. त्यातून वाईटातून काहीतरी चांगले घडवण्याचाच प्रयत्न असावा हे आगी प्रकर्षाने दिसून येते.

पण कुठल्या तरी परदेशी या सेल्फिचा शोध लागला आणि परदेशी गोष्टींसाठी नेहमी उत्सुकता असलेल्या आपल्या देशात आपण ते अगदी डोक्यावर मिरवू लागलो. इतके कि स्वतःच्या जिवाचीही पर्वा न करता. आजकाल दिवसा आड सेल्फी मुळे होणाऱ्या अपघातांची बातमी ऐकायला मिळते. अपघातापेक्षा हे म्हणजे कशाचीही चिंता नसणाऱ्या खोटया जगात वावरणाऱ्याची तात्पुरत्या सुखासाठी केलेली आत्महत्याच.आजच्या युवक-युवतीनो, स्वतःचे फोटो काढा, इतराना त्रास न देता काढता ही चांगली गोष्ट पण हा छंद आगगाडी,खवळलेला समुद्रकिनारा, कडेकपारी अशा जिथे जाण्यास मनाई असेल तिथे जोपासणे १०० % अयोग्य. फेसबूक,whatsapp या सारख्या सोशल मिडियावर आठवडाभरासाठी एक नवा फोटो टाकण्यासाठी केवढा हा आटापिटा.… अगदी जीव धोक्यात घालून? आजपर्यंत कित्येक जीव या सेल्फीरुपी कलियुगी राक्षसाने भक्षण केले आणि हे चित्र असेच वाढत गेले तर अशा अपघातांची संख्या अगण्य होईल.म्हणून घडलेल्या प्रकारांपासून वेळीच सावध झालेले योग्य.मनात येणाऱ्या सर्वच विचारांना हकिकतेत आणण्याची घाई करण्याआधी अशा कृत्याचा स्वतःला किंवा इतरांना त्रास तर होणार नाही या गोष्टीचा मागोवा घेणे नेहमीच हिताचे. कोणत्याही गोष्टीची कितीही जाहिरात होत असेल तरी आपण ते कितपत अंगिकारले पाहिजे हे ज्याचे त्याने स्वतःच ठरवले पाहिजे. थोडी सावधानता, मनात उत्पन्न होणाऱ्या प्रत्येक वेडेपणाला थोडा आवर असेल तर सेल्फीच काय प्रत्येकच गोष्ट आपल्या फायद्याचीच ठरू शकेल.आणि तेव्हा हे नवे तंत्रज्ञान शाप नाही तर वरदान वाटू लागेल. 


- रुपाली ठोंबरे      

1 comment:

Blogs I follow :