Thursday, January 12, 2017

तारांगणातले मृगजळ

अडीच-तीन वर्षांचा चिमुरडा प्रथमच नेहरू तारांगणात आला आणि तेथले त्याच्या कल्पनेपलीकडले जग पाहून क्षणात भांबावून गेला , चकित झाला.एवढे मोठे घुमटाकार छतसुद्धा त्याच्या अपरिचयाचे... त्यामुळे सर्वात आधी तर त्याचेच कुतूहल होते भारी. भर दुपारी उन्हातून येऊन इथे वाजणारी थंडी मात्र या AC ,पंख्यांच्या कालखंडात त्याच्यासाठी नवीन नव्हती. आसपास खूप सारे लोक , त्यांत भर होती ती त्याच्यापेक्षा वयाने छोट्या-मोठ्या मुलामुलींची.भोवताली पसरलेल्या कृत्रिम क्षितिजाशी वसलेले मुंबई शहर तर फारच विलोभनीय. हे सर्वच काही त्या बालमनासाठी एक नवे आकर्षण. पण त्याच्या  आईच्या मनात आणि चेहऱ्यावर मात्र चिंतेचे वेगळेच सावट. आता आत तर शिरलो आहोत पण थोड्या  वेळातच कार्यक्रम सुरु होईल , सर्वत्र अंधार पसरेल तेव्हा बाळ काळोखात घाबरणार तर नाही ना ? रोजचे आकाशातले चंद्र ,तारे आवडतात म्हणून याला आणले खरे पण त्याला नक्की आवडेल ना कि रडेल वैगरे ? इथे आणून चूक तर केली नाही ना ? अशा असंख्य प्रश्नांमध्ये ती  बावरलेली होती. आणि इतक्यात सारे दिवे हळूहळू मालवू लागले. पांढरे शुभ्र आकाश मिनिटभरात संध्याकाळचे लालकेशरी रंग पांघरून घेत काळे कुट्ट झाले. पण हे आकाश सोबत घेऊन आले लाखो तारे आणि तेही एकाच वेळी. उघड्या आकाशात तर रोज अशा चांदण्या पाहतो पण या उंच इमारतींच्या शहरांत दृष्टीस पडतील तेवढ्याच. इथे तर पूर्ण सभोवताल अगदी मोकळा.आसपास नजर जाईल तिथे लाखो ताऱ्यांनी गच्च भरलेले फक्त आकाशच आकाश . नक्षत्रांतील तारे आणि त्यांच्याशी निगडित गोष्टी फारच सुंदर. सर्व अगदी तल्लीन होऊन गेले होते हे नयनरम्य दृश्य अनुभवण्यात. पण त्या अडीच वर्षांच्या चिमुकल्याच्या मनात काय बरे सुरु असेल? भीती वाटत असेल का? पण छे ! त्याच्या आईच्या मनात असलेली भीती तर आता पूर्णपणे त्या निरागस चेहऱ्यावर अदृश्य होती. उलट तो हा निसर्गाचा अविष्कार पाहण्यात गुंग होता.अशा वेळी असे वाटते कि कधीकधी पालक म्हणून आपणही चुकतो का? चुकीचा विचार करत भीती या राक्षसामुळे कित्येकदा आपण मुलांच्या प्रगल्भतेला वाव देत नाही. हे बरेचदा आपल्याही नकळत घडते. अगदी जन्मल्यापासूनच आसपास घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीतून लहान मूल काहीतरी आत्मसात करत असते हे इथे विशेष नमुद करावेसे वाटते. असो. तर कोट्यवधी तारे असे एकाच वेळी पाहून तो भारावून गेला होता.माहितीसोबत येणाऱ्या नवनवीन आकृत्या त्याच्या बालमनासाठी फक्त समोर उमटलेले चित्र होते. कोटी वर्षांपूर्वीचा इतिहास, विश्वाची उत्पत्ती या सर्व गोष्टी त्याच्या वयाच्या बुद्धिमत्तेपलीकडे होते पण तरी तो पाहत होता , काही तरी नवे अनुभवत होता, आपले तर्क लावत होता .फुल ना फुलाची पाकळी या उक्तीप्रमाणे कणभर तरी त्या विकसित होणाऱ्या मेंदूत शिरेल हा त्यामागचा एकमात्र उद्देश. नक्षत्रांचा असा सुंदर नजराणा घेऊन ताऱ्यांनी भरलेले आकाश वर पाऊस बनून कोसळत होते पण ते बालमन मात्र एका वेगळ्याच गोष्टीच्या शोधात होते . वेगवेगळे ग्रह आणि तारे बघताना त्यांच्यासोबत आपले जुने नाते आहे का ते पडताळून पाहत होता. पण छे ! अंदाजे रोजच अवकाशात अगदी उघड्या डोळ्यांनी अगदी सहज पाहायला मिळणारा चंद्र मात्र त्याला दिसला नाही, ते जुने नाते या एवढ्या विशाल ,संपूर्ण अवकाशात सापडत नव्हते . खऱ्या चंद्रावरचा त्याच्या कल्पनेपलीकडील पृष्ठभाग नजरेसमोरून कितीदा तरी गेला पण तो शोधत होता तोच त्याचा लाडका मित्र... चांदोबामामा. आकाशात इतस्ततः विखुरलेल्या शुभ्र पुंजक्यांमध्ये कधीतरी त्याला आता तो भासत होता. पण त्या दीर्घिका आणि वायूमंडले आहेत हे मात्र त्याला समजत नव्हते.पण एकाच वेळी आकाशात १० चंद्र पाहिल्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. किती सारे तारे आणि किती सारे चंद्र.!! त्याच भ्रमात , आनंदात तो उत्सुकतेने त्या तारांगणात मग्न होता. अशाच प्रकारे तारे,ग्रह ,नक्षत्र,दीर्घिका, आकाशगंगा यांच्या सहवासात काळ ओसरत होता, बरेच काही शिकवत होता . पण कार्यक्रमाच्या सरते शेवटी दिसलेली पृथ्वी आणि त्याभोवती फिरणारा आपला रोजचा चंद्र त्याला अधिक ओळखीचा वाटला. आणि त्या वेळी त्याच्या चेहऱ्यावर जे होते ते होते खरे समाधान हवे ते मिळवल्याचा.

हा एक छोटासा प्रसंग कदाचित सर्वांच्या आयुष्यात घडणारा. कधीतरी कल्पनेपलीकडील विश्व आपल्या समोर असते. देवाने निर्माण केलेले हजारो चमत्कार आसपास असतात. पण आपले लक्ष्य मात्र कित्येकदा एकच असते. आणि ते शोधण्यात आपण पूर्ण वेळ घालवतो. योग असेल तेव्हा आयुष्यात येईल या सृष्टीच्या नियमाप्रमाणे धीर धरून थांबत असताना अनेक मृगजळे वाटेत येतात. आपण काय करतो ? त्यातच खोटे समाधान मानून पुढे चालत राहतो. बरेचदा सकारात्मक विचार करून उचललेलं हे पाऊल योग्यच. फक्त आहे त्यात समाधान मानून प्रयत्नांची सोबत ना सोडणं हे महत्त्वाचं. मग एक दिवस जे हवं ते स्वतःहून तुमच्याही नकळत जेव्हा समोर येऊन उभे राहील तेव्हा त्या समाधानाच्या ओहोळातून ओसंडून वाहणारा आनंद खरेच अवर्णनीय आणि अविश्वसनीय असेल.


- रुपाली ठोंबरे .

1 comment:

Blogs I follow :