Monday, March 6, 2017

"आदिशक्ती अक्षरशक्ती"

लहानपणी जेव्हापासून पेन्सिल,कागद आणि रंगांच्या सान्निध्यात आले तेव्हापासून चित्रकलेमध्ये विशेष रुची निर्माण झाली, अगदी कधीही न संपणारी आणि फक्त वाढत जाणारी. पुढे चित्रकलेचे विविध प्रकार कधी स्वतः तर कधी कुणाकडून असे शिकत गेले पण फक्त एक आवड म्हणून. शिक्षण आणि नोकरीमध्ये माझ्या कले विषयीच्या आवडीला विशेष स्थान कधी मिळालेच नाही. पण आवड म्हणून लोकांची चित्रे पाहणे , तसेच काही काढण्याचा प्रयत्न तर कधी स्वतःच्या कल्पनेनुसार काढण्याचा असा नवा छंद जोपासला जात असतानाच एकदा एका छोट्याशा गॅलरीत जाण्याचा योग चालून आला. एका नवोदित चित्रकाराच्या चित्रांचे  एक सुंदर प्रदर्शन मांडले होते. तेव्हाच मनाच्या एका कोपऱ्यात " कधीतरी आपलेही चित्र अशा छोट्या का नाही पण अशा ठिकाणी लागावे जिथे लोक येतील, माझी कल्पना आणि कलाकृतीचा एक नमुना पाहतील, प्रशंसा करतील" अशी इच्छा जागृत झाली. त्या दिशेने प्रयत्न सुरु केले देखील पण हे किती कठीण  असते ते काही कालावधीतच कळून चुकले. त्यानंतर या स्वप्नाला मनाच्या कोपऱ्यातच ठेवून पुढे चित्रकलेच्या क्षेत्रात नवे काही शिकण्याचा आणि कागदांवर उमटवण्याचा माझा छंद मी सुरूच ठेवला. 


अच्युत स्कुल ऑफ कॅलिग्राफीमध्ये प्रवेश घेतल्यावर तर याला चांगलेच खतपाणी मिळाले. आणि आज कळवण्यास खरेच खूप आनंद होत आहे कि जागतिक महिला दिनानिमित्त या स्कुलतर्फे आयोजित केलेल्या एका मोठ्या प्रदर्शनाचा मी एक भाग आहे. मनाच्या कोपऱ्यात इतकी वर्षे वाट पाहणारे स्वप्न आज अचानक पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याने तो आनंद सर्वांगावरुन अक्षरशः ओसंडून वाहत आहे. शेवटी माझेसुद्धा चित्र एका चांगल्या गॅलरीत लागेल, लोक पाहतील, त्यावर आपली मते देतील. एका कलाकाराला हेच तर हवे असते. आणि आज ते मला मिळत आहे. यासाठी विशेष आभार मानावेसे वाटते ते माझे गुरु अच्युत पालव सरांचे, ज्यांनी खरेच मला या स्तरावर आणण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. त्यांनी मला फक्त कॅलिग्राफीचेच धडे दिलेत असे नाही तर माझ्यातल्या कलागुणांना जाणून घेऊन माझ्या अत्याधिक व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडले आहेत.एक उत्तम मार्गदर्शक म्हणून खंबीरपणे पाठीशी उभे राहिले आणि एक नवा आत्मविश्वास मला दिला.घरातील मंडळी अगदी छोटा ओम असो वा बाहेरील मित्र-मैत्रिणी, सर्वानीच आपापल्या परिने केलेल्या सहकार्याची तुलना मी करू शकत नाही. आणि या सर्वांचेच प्रतिबिंब आज माझ्या कलाकृतींत दिसून येते. अजून जीवनात खूप काही शिकायचे आहे ,खूप काही करायचे आहे. पण आता स्वतःची मेहनत आणि मार्गदर्शनासोबतच गरज आहे ती रसिकप्रेक्षकांच्या प्रोत्साहनाची.  

"आदिशक्ती अक्षरशक्ती" या प्रदर्शनाचे हे दुसरे वर्ष. पहिल्या वर्षी दादर येथे आयोजित केलेल्या या प्रदर्शनास रसिकवर्गाचा खूप मोठा आणि छान प्रतिसाद मिळाला होता. या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे फक्त महिलांनी कॅलिग्राफीच्या क्षेत्रात केलेल्या कामाचे आणि कलाकृतींचे हे प्रदर्शन आहे. APSC मधून निर्माण होणाऱ्या या सर्व महिला कलाकार प्रदर्शनासोबतच प्रात्यक्षिकही दाखवणार आहेत. चित्रे आणि कॅलिग्राफीचे औद्योगिकक्षेत्रातील कलाकृतींमुळे 'चित्रप्रदर्शन म्हणजे फक्त लावलेली चित्रे पाहायची' या नेहमीच्या संकल्पनेला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळेल. हे प्रदर्शन म्हणजे या क्षेत्रातील समस्त महिलावर्गाला एक सलाम आहे. त्यामुळे या प्रदर्शनात उपस्थितीत राहून माझ्यासारख्याच इतर २१ जणींना प्रोत्साहन देण्यासाठी आवर्जून  यावे आणि या प्रदर्शनातून तुम्ही जाताना एक वेगळेच नवे समाधान, एक अनोखा आनंद नक्कीच घरी घेऊन जाल यात शंका नाही. 

या प्रदर्शनात प्रदर्शित होणाऱ्या काही कलाकृती खालीलप्रमाणे. अशाच आणि यापेक्षाही अधिक काही अनुभवण्यासाठी "आदिशक्ती अक्षरशक्ती' प्रदर्शनाला नक्की भेट द्यावी. 







 

No comments:

Post a Comment

Blogs I follow :