Friday, March 31, 2017

मुलुंड महोत्सव...APSC कॅलिग्राफी चित्रप्रदर्शनासोबत

८ मार्च ला सुरु झालेले माझे पहिले आणि APSC  मुलींचे दुसरे कॅलिग्राफी चित्रप्रदर्शन...आम्हा सर्वांसाठीच एक अविस्मरणीय अनुभव. उदघाटन सोहळा छान थाटात सुरु असतानाच 'मी मुलुंडकर' प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राहुल अनुप बाणावली या प्रदर्शनाला भेट देतात आणि त्यांना सर्व कलाकृतीनी नटलेले हे प्रदर्शन खूप आवडते. इतके कि त्याच क्षणी ते अच्युत सरांसमोर एक इच्छा प्रकट करतात- यंदाच्या मुलुंड महोत्सवात या प्रदर्शनाचेही पदार्पण व्हावे अशी. तो रंगसोहळा अनुभवत असतानाच आमच्या आनंदाला एक नवे भरतीचे उधाण आले होते.


एकाच महिन्यात दुसरे प्रदर्शन म्हणजे आम्हा सर्वांसाठी एक कौतुकाचीच बाब. गुढीपाडव्यानिमित्त दर वर्षी मुलुंडमध्ये होत असलेल्या या मुलुंड महोत्सवासाठी आमची खरी सुरुवात झाली ती २५ तारखेला दुपारी अडीच वाजता. इक्विनॉक्स फिनॉमिनाच्या त्या तळपत्या उन्हात आम्ही आमची नव्या प्रदर्शनाची जागा सर्वप्रथम पाहिली. अतिशय कडक ऊन आणि कमी वेळ असे आमचे समीकरण असले तरी इतर गोष्टींकडे फारसे लक्ष ना देता आम्ही सर्व जण लगेच कामाला लागलो. नुकत्याच एका प्रदर्शनातून उतरून आलेल्या सर्व चित्रचौकटी दोर्यांसोबतच असल्याने त्यात खूप वेळ गेला नाही. हातोडीच्या प्रत्येक घावासोबत एकेक खिळा पुढच्याच क्षणी आमच्या चित्राला भिंतीवर लावण्यासाठी समर्थ होई. बघता बघता काही मिनिटांतच त्या पांढऱ्याफटक मुग्ध भिंती रंगीबेरंगी झाल्या. एका ओसाड वाटणाऱ्या त्या जागेस लगेचच एका सुंदर गॅलेरीचे स्वरूप प्राप्त झाले. या नव्याने उदयास आलेल्या गॅलेरीचा प्रत्येक कोपरा आता जिवंत झाला होता. ती प्रत्येक मुकी भिंत आता काहीतरी सांगत होती. स्त्रियांची कथा, स्त्रियांची कला आणि बरेच काही. ठाण्यात नुकत्याच पार पडलेल्या प्रदर्शनात असलेलीच चित्रे जरी असली तरी इथे ती नव्याने वेगळी उठून दिसायची. चित्रे तीच पण मांडणी खूप वेगळी आणि त्यामुळे पुन्हा नव्याने या प्रदर्शनाला येणाऱ्यांनाही प्रदर्शन नवखे वाटायचे. त्या वेळी विविध प्रकारच्या सादरीकरणातून प्रत्येक वेळी कशी वैविध्यता घडून येते हे कळले. मुलुंडमध्ये एकाच दृष्टीक्षेपात सर्व प्रदर्शन पाहतानाही त्यातील वैविध्यता लगेच प्रेक्षकांचे मन जिंकून घेई.



ठाण्यामधील अपेक्षित यशानंतर आम्हा मुलींचा उत्साह दुपटीने वाढला होता. तो आम्ही सर्वानी निर्माण केलेल्या आणि विक्रीस उपलब्ध असलेल्या कलाकृतिपूर्ण वस्तूंवरून दिसून येत होता.ठाण्यातील प्रदर्शनापेक्षा प्रामुख्याने वेगळा असलेला भाग म्हणजे APSC तील मुलांनी केलेले शिवाजी महाराजांसंबंधीचे काम. त्याकडे पाहून 'अप्रतिम' हा एकच शब्द मनात येईल. मुलुंडमधील प्रसिद्ध भाजप नेते सरदार तारा सिंग, नृत्य दिग्दर्शक उमेश जाधव अशा अनेक मान्यवर व्यक्तींची कौतुकाची थाप आम्हा सर्वांना उद्याच्या वाटचालीसाठी खरेच उपयुक्त ठरेल.



मी मुलुंडकर प्रतिष्ठान आयोजित गुढीपाडव्यानिमित्त सादर होणारा मुलुंड महोत्सव हा मुळातच एक मोठा उत्सव आणि त्यामुळे संबंध मुलुंडकरांसाठी एक खास आकर्षण. मुलुंडशी जिव्हाळ्याचं नातं असलेल्या बाल, महिला ,युवा ,ज्येष्ठ नागरिक, चाकरमानी अशा प्रत्येक वर्गातील प्रत्येक घटकासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. चैत्र पाडव्याच्या निमित्ताने नववर्ष स्वागतयात्रेतील सहभागासह भारतातील सर्वात भव्य रांगोळी या महोत्सवात रेखाटली जाते ही अभिमानाची गोष्ट आहे.पहिल्या दिवशी ढोल-ताशांच्या  नादात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अप्रतिम नृत्याविष्काराने सर्वानाच वेड लावले होते. या ... खेळा...मजा करा... सांगत सुरु झालेला बाल महोत्सव अगदी सर्वानाच बालपणात घेऊन गेला. मंत्रमुग्ध स्वरांची गुढीपाडव्याची संगीतमय पूर्वसंध्या एक अविस्मरणीय सुरांची मेजवानीच.प्रसिद्ध सुलेखनकार अच्यूत पालव यांच्या कलाकारीचे ४० फूट x ५ फूट आकाराचे एक उत्तम प्रात्यक्षिक मुलुंडकरांस पाहण्याचे भाग्य लाभले. आजपर्यंत कित्येक नृत्यस्पर्धा किंवा नृत्याचे कार्यक्रम पाहिले होते पण इथे त्यातही काही वेगळेपण होते... चित्रपटांतील रोजच्या गाण्यांवरच अवलंबून न राहता इथे नृत्याविष्कार सादर झाला तो जुन्या-नव्या घरोघरी पोहोचलेल्या सुंदर मालिकांच्या शीर्षकगीतांवर. खरेच एक सुंदर कल्पना, हो ना ?गृहिणींच्या कौशल्याला खरा तेव्हा व्यासपीठ मिळाला जेव्हा सुरु झाला, खेळ पैठणीचा.



शिवराज्याभिषेकाची रांगोळी हे या महोत्सवाचे एक प्रमुख आकर्षण होते. तसेच छायाचित्रकार गोपाळ बोधे यांच्या एरियल फोटोग्राफीचे आणि अच्युत पालव स्कुल ऑफ कॅलिग्राफीच्या महिलांचे चित्रप्रदर्शन हेदेखील एक आगळेवेगळे आकर्षण होते. सोबत विविध वस्तूंचे प्रदर्शन हा खरा सामान्य जनतेसाठी आकर्षणाचा भाग ठरला.



परिसरासोबत प्रेक्षकवर्ग बदलत जातो हे प्रकर्षाने जाणवले असले तरी ठाणे आणि मुलुंड मध्ये आम्हाला प्रेक्षकांचा काही प्रमाणात सारखाच प्रतिसाद लाभला. दोन्हींकडे कलेची चहेती गर्दी होती. कॅलिग्राफी या नव्या विषयाबद्दल फारशी जाण नसली तरी ती शिकून घेण्याची इच्छा होती. अगदी बच्चेकंपनीला देखील अक्षरांची अशी मोहक वळणे आकर्षित करत होती हे विशेष. यातूनच तर भविष्यातील सुंदर अक्षरे निर्माण होतील अशी शाश्वती दिसून येते. मुलुंडमधील असा उत्तम प्रतिसाद पाहून आणि त्यांच्या कॅलिग्राफी शिकण्याच्या इच्छेला पाहून अच्युत पालव सरांनी येत्या २ महिन्यांत एक चारदिवसीय कार्यशाळा मुलुंडमध्ये आयोजित करण्याचे या महोत्सवातच घोषित केले. मुलुंड महोत्सवाच्या आमच्या यशानंतर या कार्यशाळेतही आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळेल अशी आशा करत मी संपूर्ण मुलुंडकरांचे या कला प्रदर्शनाला भेट दिल्याबद्दल आणि स्त्रीशक्तीला प्रोत्साहन दिल्याबद्दल आभार प्रकट करते. अशी संधी दिल्याबद्दल राहुल बाणावलींचे मनापासून आभार.या महोत्सवात पुढे वर्षानुवर्षे अशीच प्रगती होत राहील आणि मुलुंडकरांचा असाच मोलाचा वाटा असेल यात शंकाच नाही. तरी माझ्याकडून सर्वानाच खूप खूप शुभेच्छा.


No comments:

Post a Comment

Blogs I follow :