खट्याळ डोळे बोल बोबडे
दुडूदुडू पावले घरभर दौडे
गोड गळ्याचे बेसूर रडे
खळखळणारे हसू भाबडे
का असे का नको तसे
का इथे का नको तिथे
किती प्रश्न निरागस
देऊ कशी किती उत्तरे
इवल्या बालमनातल्या
कल्पक कथा आगळ्या
पुस्तकी शब्दांनाही माझ्या
फुटू लागले किती फाटे
खुर्च्यांचा बंगला उश्यांची लादी
त्या छोटुल्या घरात किचनची भांडी
गादीचा पूल त्याला चादरीचा झोका
माऊ-भो भो सोबत घर गाड्यांचे सादर
कधी उंच खिडकीवर कधी पलंगाखाली
कधी भाज्यांसंगे खेळे कधी पाण्यामध्ये
प्रत्येक उडीमध्ये मात्र जीव आमचा वर खाली
पण बेफिकीर बाल्यच ते कळत नाहीत पुढचे धोके
१... २... ३... प्रत्येक वयात एक निराळीच मजा
नव्या कल्पना नवे विचार नवे प्रश्न नवी उत्तरे
आजच्या वाढदिवशी झाली नव्या खोडयांची सुरुवात
नव्या वर्षात सारेच आपण नवे शिकू चल नवे जग पाहू
- रुपाली ठोंबरे
Chan :)
ReplyDelete