Friday, April 28, 2017

पुस्तकरूपी मित्र


"जर खिशात दोनच रुपये असतील तर १ रुपयाची भाकरी घ्या आणि १ रुपयाचे पुस्तक घ्या. 
त्यातील एक गोष्ट तुम्हाला जगण्यासाठी आधार देईल आणि दुसरी गोष्ट तुम्हाला कसे जगावे हे शिकवेल."

एक खूप सुंदर विचार आणि विचार करायला लावणारा हा बाबासाहेब आंबेडकरांचा सुविचार काल  वाचनात आला आणि आपोआपच 'पूस्तक' या अगदी रोजच्याच वापरातल्या वस्तूकडे लक्ष केंद्रित झाले. फक्त पुस्तक या विषयावर असा तर कधीच विचार केला नव्हता पण कोण जाणे का पण आज पुस्तकाबद्दल खूप आपुलकी वाटू लागली. 

अगदी लहान असल्यापासून म्हणजे २-३ वर्षांपासून ही पुस्तक नामक जादू आपल्या आयुष्यात येते. रंगबिरंगी चित्रांनी रंगलेली १०-१५ कागदाची पाने आणि तेवढेच रंगीत पृष्ठ एकत्र आले कि झाले ते आपण बालवयात पाहिलेले पुस्तक.पहिल्यांदा अ आणि A मी तिथेच तर पाहिला होता.त्या पुस्तकातील वर्णमालेतील सर्व अक्षरे असे एकेक करून नवनव्या चित्रांची ओळख करून देताना अजूनही आठवतात. विमान, जहाज एवढेच काय अगदी अंतरिक्ष यान सुद्धा हि पुस्तके अचूक दाखवतात. त्यातूनच हळूहळू जगातील वस्तू आणि नंतर जगच कळू लागले. अक्षरांशी मैत्री झाली आणि हीच पुस्तके नवे शब्द घेऊन आले, कान, मात्रा, वेलांटीनी नटलेल्या वाक्यांनी एक नवा संवाद सुरु केला. जसजसा अर्थ कळत गेला, हे पुस्तक  खूप आपलेसे वाटू लागले. एक जीवाभावाचा मित्र - हव्या त्या प्रश्नांची अचूक उत्तरे देणारा, जगावेगळी हवी तशी सर्व माहिती देणारा आणि तीही कधीही न थकता, प्रश्न विचारणारा आणि गरज पडल्यास उत्तही तोच देणारा, गरजेच्या प्रसंगी धावून येणारा, संकटकाळी योग्य मार्गदर्शन करणारा, छोट्या छोटया विनोदांतून करमणूक करणारा.जसजशा इयत्ता वाढत गेल्या या मित्राचे नवनवे स्वरूप नजरेस पडू लागले. कधी तो इतिहासाच्या जुन्या लढायांत घेऊन जाई तर कधी भूगोलातील विविध देशांची सैर करून आणी. कथा- कवितांच्या सान्निध्यात तर खऱ्या अर्थाने माझे जीवन फुलू लागले.प्रत्यक्ष डोळ्यांनी जे पाहता येणार नाही किंवा स्वतःच्या पायांनी त्या वयात जिथे जाता येणार नाही ते सर्वच आम्ही त्या पुस्तकाच्या टपोऱ्या अक्षरांत आणि सुबक आकृत्यांत पाहिले. माणसाच्या शरीरातील अवयव असो किंवा अंतराळातील ग्रहतारे सारेच सहज समजू उमजू लागले. 

आजही जून महिन्यातील ते शाळेचे पहिले दिवस आठवतात. बालभारती, गणित, विज्ञान अशी कितीतरी नवी कोरी पुस्तके बाबा शाळा किंवा दुकानातून आणत. नव्या पुस्तकाचा तो नवा सुगंध अजूनही कधी समोर आला कि ते सोनेरी दिवस आठवतात आणि कोणत्याही पुस्तकाच्या  नव्या पानामध्ये ते दिवस जगत असल्याचा भास होतो. आमच्या काळी कित्येकदा जुनी पुस्तके मोठ्या ताईदादांकडूनही घ्यावी लागत पण त्यातही एक वेगळा आनंद असायचा. एखाद्या हुशार ताईने केलेल्या खुणांमुळे उत्तरे कशी पटापट सापडायची. ती मजा देखील काही औरच होती. पुस्तके जुनी असो वा नवीन, मला ती कायम प्रिय असायची. एक गणिताच्या पुस्तकासोबत माझा नेहमीच ३६चा आकडा असे पण हळूहळू त्याच्याशीदेखील मैत्री झाली.अभ्यासाव्यतिरिक्त माझे आवडते पुस्तक होते चांदोबा. ठकठक , चंपक देखील त्याच श्रेणीतील... थोडे हसवणारे आणि थोडे शिकवणारे. छोटी छोटी १०-१२ पानी गोष्टीचे पुस्तक असो वा ५-७ विषयांना एकत्र सामावून घेणारे नवनीतचे गाईड असो , सारेच काही हवेहवेसे. फक्त हा मित्र निवडतानादेखील इतर मित्रांसारखी सुसंगत महत्त्वाची.

पुढे मोठे झालो तशी पुस्तकेही मोठी झाली. एका विषयासाठी २-३ मोट्ठी मोट्ठी पुस्तके परीक्षेच्या आदल्या रात्री घेऊन बसून चाळण्यात इंजिनीरिंगची ४ वर्षे कशी गेली कळलेच नाही. मग कथाकादंबऱ्या आल्या , ललितसाहित्य आले. आज शिक्षण पूर्ण झाले, लग्न झाले ,मुलगा झाला पण पुस्तक हा मित्र काही दूर गेला नाही. उलट तो अधिकाधिक जवळ येऊ लागला. आरती आणि पोथीच्या स्वरूपात देवपण देखील न सांगता ही कागदाची पाने सहज  देऊन जातात. अशा कागदाच्या पानांवर विचारांची टपोरी अक्षरे पाहिली कि माणूस ते विचार जगू लागतो. विविध लेखकांच्या विचारांची मोरपिसे सडा जणू या पुस्तकांमध्ये जपून ठेवलेली  असतात .भावनांना जिवंत करण्याचे सामर्थ्य या पुस्तकांतील प्रत्येक ओळीत दडलेले असते. त्यांना अनुभवताना माणूस म्हणून स्वतः घडत असताना साकार झालेले हे व्यक्तिमत्त्व सदा या पुस्तकरूपी मित्रांचे ऋणी राहील. खरेच आयुष्यासारखी अतिभयंकर वाटणारी गोष्ट जर हलकीफुलकी करायची असेल तर पुस्तकाला जवळ करायला हवे. आज कागदी पुस्तके जाऊन ई पुस्तके आली पण पुस्तकांची कथा आणि उपयोग मात्र तोच. 
म्हणूनच,
पुस्तके घ्या ,पुस्तके वाचा आणि पुस्तके वाचायला दया. 

- रुपाली ठोंबरे.


No comments:

Post a Comment

Blogs I follow :