Tuesday, June 13, 2017

नभ मेघांनी आक्रमिले ।
आज पुन्हा एकदा पिवळ्याधम्म उन्हात चमचमत्या शुभ्र मेघांस कुणीतरी रंगवले. निळ्या-लाल-जांभळ्या रंगांची फुलेच फुले आकाशी दूरवर कुणीतरी अंथरली.अन पाहता पाहता काय गजब झाला... ही सारी कापूसपुंजके क्षणात काळवंडली. आकाशातले ते घारे घारे डोळे आम्हां पाहत होते. थोडी भीती थोडे नवल त्यांना दिसत होते इथे सर्वांच्याच चेहऱ्यावर. पण का कुणास ठाऊक, अवतीभवती पिंगा घालणारा,अंगावर शिरशिरी आणणारा तो खट्याळ वारा मात्र मला वर नजर रोखून पाहण्यापासून रोखत होता.जणू तो मला घोंगावत सांगत होता कि आता
नभ मेघांनी आक्रमिले ।
तारांगण सर्वही झाकून गेले  ।।
तेव्हा या आसमंती आता एका काळ्या चादरीविना काही उरले नाही पण थोड्याच वेळात ती चादर फाटेल आणि कुबेराचा तारांगणाहूनही दिव्य खजिना तुझ्या आसपासच बरसेल. तू जरा धीर धर.

जून महिन्यातल्या या सुरु असलेल्या धुळवडीमध्ये सुकलेला पाचोळा ,कागदाचे कपटे,मातीचे लोट असे सारेच काही एकमेकांत मिसळून होळी खेळत होते. पिंगा घालणारा वारा आता बेभान होऊन दूर दिशादिशांत मुक्त संचारत होता. वर उंच उंच जाणारा तो भोवरा आकाशात पार ढगांपर्यंत पोहोचला आणि सारे आभाळच सैरभैर झाले. त्या थंडाव्यात ढगांचे ढगांशीच एक गुज निर्माण झाले आणि नभी पावसाचा षड्ज लागला. या मिलनातून आसमंती मल्हार जागला. आणि भुईच्या दिशेने धावणाऱ्या रुपेरी सरींचे मधुर गायन कानोकानी गुंजू लागले. रखरखीत भुईच्या स्पर्शाने हे स्वरही गंधाळले आणि उंच अवकाशातून एखादी अत्तरकुपी धरित्रीवर क्षणात आपटावी आणि ती कस्तुरी चोहीकडे शिंपडली जावी तसे चोहीकडे धरणीच्या श्वासांत मधुमय मृदगंधेचा धुंद दरवळ होता. आणि हळू हळू चांदीची थेंबफुले माळून येणाऱ्या या सरी अधिकाधिक दाट होऊ लागल्या.ढगांचा ढोल मोठ्या उत्साहात वर्षाराणीची वर्दी देत आता अस्मानी घुमतो आहे.या वर्षाराणीच्या चाबकाच्या फटकाऱ्यांची बिजली चपळतेने आकाशभर लखलखते आहे. तिथे समुद्र उसळतो आहे ,वर भिरभिरणारा मद्यधुंद वारा ढगांना घुसळतो आहे आणि इथे हा वळवाचा पाऊस आभाळ फाटल्यागत कोसळतो आहे. हा असा उनाड पाऊस...अशांत पाऊस... अधीर पाऊस.... बंजारा पाऊस आडवा पडतो... कधी हा भिरभिरणारा पाऊस तिरपा पडतो...मंद झुळुकांचा खेळ खेळताना हा खूप खूप मस्ती करतो. आणि या मस्तीत सृष्टीला आनंद देतो, नवे जीवन देतो. मेघांच्या कुंभांतून बरसणाऱ्या या अमृतधारांनी आज कित्येक दिवसांची पृथ्वीची तगमग निवत आहे. ऊन-हळदीच्या पानांतून झाडांची तांबूस नवती बाळे आता हा सोहळा पाहण्यासाठी हळूच या दुनियेत डोकावतील...थेंबांचे पदी नुपूर बांधून मयूरपंख हिरव्या वनी नाचतील...या रिमझिमणाऱ्या पावसात अचानक पसरलेल्या उन्हाच्या चादरीवरून सप्तरंगी इंद्रधनुचे पाखरू आकाशी वक्राकार झेपावेल... आता काहीच दिवसांत टक्कल पडलेले डोंगर हिरवी शाल पांघरतील आणि त्यांत वाहणाऱ्या शुभ्र निर्झरांची जरीची नक्षी प्रत्येक मनाला वेड लावेल...वेड लावेल पक्ष्यांची रोज किलबिल करणारी मधुर शाळा...जशी आज फांदीफांदीवर जमली आहे थेंबाथेंबांची शाळा.पागोळ्यांतून माझ्या अंगणात गळणाऱ्या थेंबांना हातावर झेलत मीही त्या मंतरलेल्या कुंजाशेजारी उभी आहे...दूर काळ्याकुट्ट आकाशात झेपावलेल्या  बगळ्यांच्या शुभ्र माळेला पाहत.
कधी रिमझिम झरणारा आला ऋतू आला
कधी टपोर्‍या थेंबांचा आला ऋतू आला
श्रीधर फडकेंच्या शब्दांनी माळलेले हे गीत सुरेश वाडकरांच्या स्वरांत रेडिओवर वाजत होते. आणि या क्षणापासून पृथ्वीवर सुरु झालेला हा जलसोहळा पाहून मनात दाटलेल्या भावनांतून एकाच वेळी कितीतरी गाणी ओठांतून झरू लागली.
-  रुपाली ठोंबरे 

2 comments:

Blogs I follow :