Friday, August 10, 2018

दीपस्तंभ
'दीपस्तंभ' पुस्तक हाती घेतले आणि सर्वप्रथम नजर खिळली ती 'षांताराम पवार' या नावातल्या ष या अक्षरावर. आजपर्यंत हे नाव अशाप्रकारे लिहिलेले मी कधीच पाहिले नव्हते त्यामुळे हे जरा विचित्रच वाटले आणि कुतूहलही. मी लगेच उद्गारले ,
" अरेच्चा ! हा तर दुसरा ष वापरला ? असे कसे ? वेगळेच वाटते ना जरा ?"
आणि उत्तर आले,
"षांताराम सर त्यांचे नाव अशाच प्रकारे लिहितात.नावाप्रमाणेच त्यांचे वेगळेपण त्यांच्या स्वभावामध्ये  ,व्यक्तिमत्त्वामध्ये , कलेमध्ये , काम करण्याच्या प्रक्रियेमध्ये आणि विद्यार्थ्यांकडून योग्य काम करून घेण्याच्या उचित पद्धतीमध्ये देखील आहे.खूप भारी कलाकार आहे. हे पुस्तक घे... त्यातील डिझाईन्स , त्यात केलेले काम बघ... खूप मार्गदर्शक ठरेल तुझ्या कलेच्या प्रवासात...खूप काही शिकायला मिळेल.... "
मीसुद्धा क्षणाचाही विलंब न लावता ते पुस्तक घेतले...एक दिवस बराच वेळ पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत चित्रे पाहिली... काही कळाली तर काहींना समजण्यासाठीची माझी कलादृष्टी कमी पडत होती. पण एक वेगळीच उत्सुकता मनाला लागली. असे अनेकदा चित्रे पाहिल्यानंतर मी त्यातील शब्दांकडे वळले. आणि अगदी कमी वेळात त्या शब्दांनी मला आपलेसे करून घेतले. त्यात चितारलेले षांताराम सरांचे व्यक्तिमत्त्व तर अगदी मनात कोरले गेले. आणि त्या क्षणापासून या पुस्तकातील शब्द न शब्द ग्रहण करून त्या महान गुरूकडून अप्रत्यक्षरीत्या विद्या मिळवण्याचा एक नवा ध्यास माझ्यासारख्या आधुनिक जगातल्या या एकलव्यास जडला. 

'षांताराम दर्शन' वाचताना षांताराम सर हे फक्त ४ वर्षे शिक्षणाचे धडे देऊन आपल्यावरची जबाबदारी पूर्ण झाली असे मानणारे एक प्राध्यापक नसून त्या चार वर्षांनंतरही विद्यार्थ्यांच्या उत्तरायुष्यात महत्त्वाची भूमिका बजावून कायम मार्गदर्शन करणारा तो एक प्रखर दीपस्तंभ होता हे प्रकर्षाने जाणवले. ते स्वतः तर उत्तम कवी ,चित्रकार ,लेखाचित्रकार , रंगभूमीवर नेपथ्य साकारणारे ,जाहिरातक्षेत्रातील संकल्पनकार तर होतेच पण त्यासोबतच त्यांनी प्रत्येकातील गुण शोधून त्याला पैलू पाडून अनेक कवी,कलाशिक्षक ,चित्रकार निर्माण केले आहेत. या सर्वांवर पडलेला त्यांचा प्रभाव हा दूरगामी आहे. त्यांच्यापैकीच अनेकांनी या पुस्तकात व्यक्तीदर्शनपर लेखन केले आहे आणि माझ्या डोळ्यांसमोर सरांची एक उत्कृष्ट प्रतिमा उभी राहिली आहे. त्यांचा कडक स्वभाव , त्या उंच काळ्यासावळ्या चेहऱ्याआड लपलेला त्यांच्यातील भावनात्मक कलाकार, कोणतेही काम पूर्णत्वास नेण्यासाठी योजलेली प्रक्रिया, त्यांची शिस्त हे सर्व जणू मी स्वतः अनुभवत होते असे वाटत होते.पुस्तकाच्या  प्रत्येक पानासोबत मी त्यांना नव्याने भेटत होते...खूप काही शिकत होते... 

त्यांनी केलेली मुखपृष्ठे आणि लेखाचित्रे सोबत कविता हे सर्वच त्या बहुरंगी आणि बहुढंगी व्यक्तिमत्त्वाचे प्रतिक होते. 'बलुतं ' पुस्तकाच्या प्रथम आवृत्तीचे मुखपृष्ठ पुस्तकवाचन केल्यानंतर त्यांना अपूर्ण वाटत राहिले ... ते त्यांनी बोलूनही दाखवले आणि जेव्हा पुन्हा संधी मिळाली तेव्हा त्यात शब्दांतील भाव ओतून अगदी मनासारखे मुखपृष्ठ झाल्यावर खरे समाधान त्यांना मिळाले. मेडीमिक्स च्या जाहिरातीतील घराघरात पोहोचलेली अनेक भाषांत व्यक्त झालेली ओळ -' छत्तीस गुणी आयुर्वेदिक स्नानासाठी ' ही त्यांचीच देण... 'आदिमाया' चे मुखपृष्ठ हा सुद्धा एक उत्तम कलेचा नमुनाच... अशा अनेक कलाकृतींनी जगाला 'अद्भुत' बोलायला भाग पाडणारा हा अवलिया.... कोणी त्यास विक्षिप्त म्हणे तर कोणी महाखडूस.... पण कलेच्या क्षेत्रात मात्र त्याचे एक निढळ स्थान होते... ध्रुवताऱ्यासारखे.

पुस्तक वाचता वाचता कधी कोण जाणे मनात सारखे येऊ लागले कि इतक्या साऱ्या कलाकारांना त्यांच्यातील सुप्तगुण जागृत करून घडवणारा तो हात एकदातरी आपल्याही डोक्यावरून फिरावा... ते व्यक्तिमत्व एकदातरी प्रत्यक्ष अनुभवावे...त्यांच्याशी बोलावे... आणि असा विचार मी पुढे बोलूनही दाखवला.आणि माझे हे स्वप्न शक्य होऊ शकेल असा विश्वास जेव्हा मिळाला तेव्हा तर एक वेगळाच आनंद आणि उत्साह अंगी संचारला.दीपस्तंभ वाचन तोपर्यंत सुरूच होते. ते संपवूनच षांताराम सरांना भेटूया असे मनाशीच ठरले. त्यासोबत वाचनाचा वेगही वाढला.भेटल्यावर काय बोलायचे? ते काय विचारतील ? आपले काही काम दाखवायचे का ?दाखवले तर ते काय म्हणतील?.... असे नाना विचार मनाच्या अंगणात थयथय नाचत होते. केलेले चित्र त्या नजरेत चुकीचे ठरल्यास चूक निदर्शनास आणून स्वतःच्या हातांनी फाडायला लावणाऱ्या व्यक्तीकडे आपले काम घेऊन जाण्याची तयारी करणे हेसुद्धा मला त्याक्षणी खूप धीटपणाचे वाटत होते. शेवटी एक विचार पक्का केला कि काही झाले तरी एकदा तरी भेटूया आणि काम दाखवून मार्गदर्शनाची एक अमूल्य शिदोरी मिळवूया.

'षांताराम पवार ' यांच्यासारख्या व्यक्तीशी संवाद साधण्याची संधी मिळणे हे एक स्वप्न होते जे काही दिवसांपूर्वीच निर्माण झाले. कसे असते ना, एखाद्या व्यक्तीला आपण ओळखतही नाहीत, दूरदूरपर्यंत तेथपर्यंत पोहोचणे सहज शक्य होणार नसते पण व्यक्ती भेटली नाही तरी तिचे विचार आपल्यापर्यंत सहज पोहोचू शकतात... पुस्तकांच्या माध्यमातून. आणि असेच काहीतरी माझ्या जीवनात काही दिवसांपूर्वी घडून आले... दीपस्तंभ वाचण्यास सुरुवात केल्यापासून. काही दिवसांपूर्वी 'षांताराम' हे नावही मला नीटसे माहितही नव्हते पण जेव्हा ते नाव जीवनात आले एक मोठा बदल घडवून गेले. त्यावेळी अशीही जाणीव झाली कि षांताराम सरांसारखे असे अनेक सहजासहजी न आढळणारे सूर्य या जगतात आहेत ज्यांच्या किरणांतील प्रकाशात काहीतरी उत्तम घडवण्याची ताकद असते.असा गुरु मिळणे म्हणजे एक खूप मोठे भाग्य असेल. 

कालही मी ऑफिसला जात असताना दीपस्तंभाची शेवटची काही पाने वाचण्यात गुंग होते आणि एक मनाला धक्का देणारी एक बातमी कानांवर आली. जिथे मी या महान गुरूला भेटण्याचे स्वप्न पाहत होते तिथेच नियतीने तिचा निराळा खेळ दृष्टीस आणला. माझ्या पुस्तकाची उरलेली पाने संपवण्यापूर्वीच षांताराम सरांच्या जीवनातील पाने आज संपली होती. ही बातमी काळजात चर्रर्रर्र करून शिरली आणि मनोमन खूप वाईट वाटले... माझे एक स्वप्न तुटले म्हणूनच नव्हे तर असा एक ध्रुवतारा कायमचा या जगातून निखळला या जाणिवेने...मी त्यांना कधीही भेटले नाही पण दीपस्तंभातून एवढा निष्कर्ष मात्र नक्कीच काढता आला कि... षांताराम सर हे नक्कीच या कलेच्या क्षेत्रातला एक ध्रुवतारा असतील...हा ध्रुवतारा ज्यांच्या प्रत्यक्ष दृष्टीक्षेपात आला, ज्यांना त्या मार्गावर एक नवी दिशा गवसली ते खरेच भाग्यवंत असतील....आणि माझ्यासारख्या असंख्य एकलव्यांसाठी या दीपस्तंभाच्या रूपात त्यांचा मार्गदर्शनपर आशीर्वाद सदा सोबत असेलच... त्यातूनच उद्याच्या नव्या सूर्यांना कलेचे , मार्गदर्शनाचे , शिस्तीचे रवितेज प्राप्त होईल. आणि दीपस्तंभातून जन्मणाऱ्या अशा अगणित ज्योतींना पाहून स्वर्गातल्या त्या ज्योतीला नक्कीच शांती लाभेल...आणि तीच षांताराम सरांसाठी खरी भावपूर्ण श्रद्धांजली असेल.. 

- रुपाली ठोंबरे.

No comments:

Post a Comment

Blogs I follow :