कोऱ्या कागदावर ... कोऱ्या पाटीवर... कोऱ्या आभाळावर...
कल्पनेच्या चंद्रकोरीपरी कलेकलेने अक्षरे आकार घेऊ लागली
... कधी टुमदार गोलाकार...तर कधी रेषांच्या कोनाकोनांतून...
अक्षरांची माळा अनोख्या रचनांची साक्ष देण्यास आतुर झाली
कोऱ्या मनावर...भावनांच्या आसमंतामध्ये... झंकारला एक स्वर...
त्या हातात वसलेल्या सरस्वतीने जणू वीणेची रंगीत तार छेडली
... आणि लाखो रंग उधळले...एकमेकांत मिसळले...दिशादिशांतून...
अक्षरे रंगांत...रंग अक्षरांत आणि मने तयांत एकरूप होण्यास आतुर झाली
कोऱ्या पाऊलवाटेवर...रंगाक्षरांच्या बागेमध्ये... उमलले एक जीवनफूल...
दिवस-मास-वर्षे...नात्यांच्या रंगसंगतीत आयुष्याची प्रत्येक पाकळी फुलली
...भाव रंगले...डाव मांडले...रंग सांडले...प्रकटली अक्षरे चित्राचित्रांतून...
घननिळ्या सागरापरी शुभेच्छा तव दिर्घायूच्या...
देण्यास तुला, कलम ही माझी...आज आतुर झाली
- रुपाली ठोंबरे.
No comments:
Post a Comment