Tuesday, October 16, 2018

नवी जागा...नवे क्षण...नव्या आठवणी

आज मुंबईत जिथे चांगली जागा नजरेस पडेल तिथे एखादा भलामोठा टॉवर काही वर्षांतच जन्माला येतो आणि तो तयार झाल्यानंतर अगदी वर्षभरातच तो अनेक कुटुंबांना स्वतःत सामावून घेतो. अतिशय पॉश अशा या टॉवर्समध्ये सहसा नवरा-बायको दोघेही नोकरीला जाणारे असतात.आयुष्याची कितीतरी वर्षे एकत्र कुटुंबांमध्ये जगलेली वृद्ध मंडळी या नव्या लाईफ स्टाईलला सुरुवातीला कंटाळतात. पण पुढे तेही करमणुकीचे नवे मार्ग शोधून या नव्या जीवनशैलीमध्ये साचेबद्ध होण्याचा एक प्रयत्न करतात. शेकडो कुटुंबे एकत्र राहत असूनही एक वेगळीच शांतता चोहीकडे पसरलेली असते. फार फार तर रोज सायंकाळी होणारा चिमुरड्यांचा किलबिलाट सुखावून जातो. पण तोही कलकलाट होता कामा नये कारण त्यावरही आक्षेप घेणारे एखाददुसरे जण तिथे वस्तीला असतात. या किलबिलाटाव्यतिरिक्त गाड्यांचे कधीतरी वाजणारे हॉर्न, लिफ्टची ये जा करतानाचे होणारे किंचित आवाज, कुठेतरी एक दोघांमध्ये सुरु असलेली कुजबुज, काम करणाऱ्या बायकांची शांतपणे चालणारी लगबग हे एवढेच ध्वनी दबल्या आवाजात त्या परिसरात संचारत असतात.

अशा परिसरात राहताना नकळत आठवतात ते बालपणीचे दिवस... जेव्हा परिसरातील सारे एकत्र मिळून मिसळून राहत आणि त्याचा कुणाला त्रासही व्हायचा नाही. सणांमध्ये तर एक वेगळीच धुमधाम असायची.रोषणाई ,संगीत , उत्साह , आनंद, खेळ , हसणे ,नटणे , जेवणाच्या पंगती ,गप्पागोष्टी या सर्वांमध्ये तो सण आणि तो साजरा करणारे आम्ही अगदी न्हाऊन जायचो.

आम्ही या नव्या टॉवरमध्ये राहायला आलो तेव्हा वाटले होते कि आता अशा सर्व गोष्टी फक्त आठवणींमध्येच राहतील.असे एकीतून उत्पन्न होणाऱ्या आनंदाचे ते सर्व क्षण आपल्या मुलांसाठी अनुभवणे कधीतरी शक्य होईल का ? पण आज असे वाटते आहे कि दोन दिवसांसाठी काही तासांसाठी का होईना पण ते वातावरण आसपास निर्माण झाले ज्यामध्ये आम्ही सर्व लहानाचे मोठे झालो. नव्या इमारतींतील नवे चेहरे...नवा उत्साह अंगी संचारून...काहीतरी नवे घडवण्याच्या आशेने एकत्रित आले. निश्चितच सुरुवात केली ती काही मोजक्या उत्साही मंडळींनी आणि त्याला साथ दिली साऱ्यांनी आणि तीही  आनंदाने. हीच तर एकी ना ?

सोसायटीत एकत्र साजरा होणारा हा पहिलाच कार्यक्रम. एरव्ही शेजारच्या घरातही डोकावून न पाहणारे सर्व त्यासाठी एकत्र आले...अगदी महिन्याभरापासून. मग त्या कार्यक्रमासंदर्भात होणाऱ्या मिटींग्स , सरावांमध्ये दुरदुरून कधीतरी येताजाता नजरानजर झालेले अनोळखी रहिवासी ओळखीचे भासू लागले. कुठे कुठे घट्ट मैत्र अगदी सहज जन्माला आले तर कुठे नात्यांची वीण हळूहळू आकार घेऊ लागली.पहिल्या कार्यक्रमासाठी शोधलेला सणही मोठ्या उत्साहाचा...नवरात्रीचा. शनिवार आणि रविवार या दोन रात्री आमच्या सोसायटीचा परिसर रोषणाईने झगमगलेला होता. त्यात भर होती सुरेल सूरांची आणि अबालवुद्धांपासून सर्वांच्या हजेरीची. देवीच्या सुरेख तसबिरीची स्थापना आणि त्यानंतर पूजा-आरती मोठ्या भक्तिभावाने पार पडली. आणि त्यानंतर खेळ रंगला तो रासगरब्याचा. सारे एकत्र येऊन सहभागी झाले. बच्चेकंपनीची निराळीच मौजमस्ती सुरु होती. त्यांना पाहिले आणि मला २०-२५ वर्षांपूर्वीचे माझे बालपण आठवले. किती मज्जा करायचो ना आम्ही तेव्हा. व्हिडिओ गेम आणि मोबाइलपासून काही तासतरी सारे आज दूर झाले होते. मौजमजा होती पण तीही शिस्तीतच त्यामुळे त्या प्रसंगाला कसलेही गालबोट लागले नाही. जेवणाची तयारी म्हणाल तर उत्तमच. अगदी पाण्याची केलेली सोयदेखील मनाला आवडेल अशी. रात्री ठरल्या वेळी गाणी बंद झाली तरी संगीत खुर्ची,डम्ब चरेड्स सारख्या छोट्या छोट्या खेळांतूनही लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांनी कितीतरी वेळ आनंद लुटला. दुसरा दिवसही असाच आनंददायी. महिलावर्ग नटूनथटून खास तयार झालेला. लहानग्यांची तर मज्जाच मज्जा. कार्यक्रमात केलेल्या नृत्यांचे विशेष कौतुक झाले.तेही एक प्रकारचे प्रोत्साहनच. जोडयांनी सादर केलेले नृत्य तीही एक सुंदर आठवण. 

नव्या ओळखी, नवे बेत ,पुढच्या कार्यक्रमांची आखणी असे बरेच काही आणि अशा अनेक गोष्टी घडून आल्या ज्या या कार्यक्रमाअभावी त्या टॉवरमध्ये सहजासहजी शक्य झाल्या नसत्या. ज्यांनी पुढाकार घेऊन इतका सुंदर कार्यक्रम आमच्या जीवनात सामील केला त्यांचे खरेच आभार मानावेसे वाटतात. प्रत्येक नव्या ठिकाणी अशा उमेदीची आवश्यकता असतेच. त्या पाठोपाठ अशा उत्सवांना उत्सुकतेने आणि उत्साहाने साथ देणारे अनेजण आसपासच असतात... गरज असते ती फक्त सुरुवात करण्याची जी आता सुरु झाली आहे. एकदा का अशी सुरुवात झाली कि अशा सुरेख क्षणांची मालिकाच आयुष्यात निर्माण होऊ शकते आणि तेच क्षण मनाच्या कोंदणात सुखद आठवणी बनून निरंतर साथ देत राहतात.

- रुपाली ठोंबरे.

6 comments:

  1. Wow... khup chaan lihilas ... kharach mast hote tee 2 divas... khup chaan vatale...barayach lokanchi olakh zhali...Samarth Gardens family vatayala lagli...many more events to come in future..n we will rock...

    ReplyDelete
  2. Very touchy written ,enjoy the program lot

    ReplyDelete

Blogs I follow :