Tuesday, October 30, 2018

जाणीव.





चाळीच्या खचलेल्या पायऱ्या चढत सुहास वर आला. चाळ आता बरीच जुनी झाली होती. अनेक कोपरे ढासळले होते. कितीतरी घरांना कुलुपे लागली होती. उजव्या दिशेला तिसऱ्या घरापाशी तो येऊन थांबला. गणपतरावांचे म्हणजे सुहासच्या बाबांचेच घर होते ते. जे विकण्यासाठीच आज तो इथे आला होता. घरापाशी येईस्तोवर बालपणीच्या कितीतरी आठवणी अलगद तरळून गेल्या ...मनातल्या मनातच.
तो क्षणभर थबकला. तीन महिन्यांपूर्वीच सुहासची चांगली नोकरी गेली होती. पूर्वीच्या साठवणीवर आणि प्रियाच्या जेमतेम पगारावर घर कसेबसे चालत होते. पण इतर खर्च अंगावर येण्यापूर्वी नवे उत्पन्न सुरु होईस्तोवर काहीतरी मार्ग काढणे भाग होते. त्यासाठीच प्रियाने सुचवलेला हा मार्ग सुहासने स्वीकारला होता. चाळीतले घर जुने असले तरी ती आईची एक सुखद आठवण होती. ती आठवण ही अशाप्रकारे काढून टाकणे बाबांसाठी अशक्य होते पण त्याचाही नाईलाज होता. सुहासलाही वाईट वाटतच होते.पण किरकोळ भाडे देणारे हे घर आता त्याला नको होते. असे नाममात्र भाडे देणाऱ्या त्या भाडेकरूला तो आज खोली खाली करण्यास सांगणार होता. या सर्व विचारांत गुंतलेला असतानाच त्याने दारावर थाप मारली.आणि हलकेच लावलेलं दार पुढच्याच क्षणी उघडलं गेलं.

समोर पाहिले आणि सुहासला धक्काच बसला.बाबांचे एक परिचित काही वर्षांपासून भाडेकरू म्हणून राहत होते हे त्यास ठाऊक होते पण ते सुधीरसर असतील असे त्याला स्वप्नातदेखील कधी वाटले नव्हते. तो त्यांच्याकडे पाहतच राहिला. ते मात्र कित्येक वर्षांनी त्याला पाहून आनंदित झाले होते. मोडकळीस आलेल्या खुर्चीवर बसण्याचा इशारा करून ते आत जाऊन त्याच्यासाठी पाणी घेऊन आले. समोर अभ्यास करत बसलेल्या चाळीतल्या मुलांना त्यांनी आता घरी जाण्यास सांगितले.
"सर, तुम्ही? आणि इथे? अजूनही शिकवता?"
त्या मुलांना पाहून त्याने अडखळत विचारले. त्यावर ते हसत म्हणाले,
"अरे शिक्षक ना मी? मग शिकवणे काही दूर जात नाही बघ. मला आवडते मुलांमध्ये वेळ घालवायला. असेही एकट्याला घर खायला उठते. आणि तेवढाच म्हातारपणात आधार"
सुहास प्रश्नार्थक मुद्रेने त्यांच्याकडे पाहत तसाच उभा होता... भूतकाळ आणि वर्तमानकाळातील घटनांचा मेळ घालत.
सुधीरसर म्हणजे जित्याचे बाबा आणि चाळीतील सर्व लहानथोरांचे आवडते सर. संपूर्ण चाळीतल्या मुलांवर त्यांचा चांगलाच दरारा असायचा.सुहाससुद्धा त्यांच्याकडेच शिकवणीसाठी जायचा. जित्या म्हणजेच जितीन... सर्व मुलांमध्ये एकदम हुशार आणि सुहास मात्र काठावर कसाबसा पास होणारा सामान्य मुलगा. म्हणूनच त्यांची मैत्री कधी घट्ट अशी जमली नाही. पण गणपतराव आणि सुधीरसर मात्र अगदी जिवाभावाचे मित्र. जित्या खूप शिकला. सरांनी पुढच्या शिक्षणासाठी त्याला अमेरिकेतसुद्धा पाठवले. काही वर्षांपूर्वी त्याच्या लग्नाला भेटलो होतो ते एकदाच. त्यानंतर ते सर्वजण परदेशात स्थायिक झाले असेच माहित होते आतापर्यंत. पण आता सर इथे राहतात आणि तेही भाड्याने? आपल्या घरात? अशा अनेक प्रश्नांनी घेरले होते त्याला. शेवटी न राहवून त्याने विचारले,
"सर, तुम्ही तर जित्याकडे गेला होतात ना?"
सुहासचा प्रश्न ऐकून सुधीरसर फक्त हसले आणि म्हणाले,
"अरे, ती मायानगरी पाहायची एक हौस होती. ती फिटली आणि आलो पुन्हा परत.खरंतर आमचे विचार पटत नाहीत रे तुमच्या पिढीला.आम्हां म्हाताऱ्यांना मुलांना समजावत राहण्याची भारी हौस. आमची माया असते रे ती, पण तुम्हाला ते ओझं वाटतं. मग खूप ओढाताण व्हायची माझी आणि बहुतेक त्यांचीही. मग मीच एकदा म्हटले, "राहा तुम्ही राजाराणी सुखात, मी जातो आपल्या चाळीत". कधी वाटले भेटावेसे तर घर तुमचंच आहे. पण आज 4 वर्षे उलटली अजूनतरी तो कधी आला नाही. आता काय? कधीतरी अधूनमधून फोन येतो त्यातच समाधान मानायचं. तिकडून येणाऱ्या पैशाचंही अगदी तसंचमागे पावसाळ्यात आमच्या घराचं छत कोसळलं तेव्हा तर अडचणींचा डोंगरच कोसळला होता.पण तेव्हा तुझ्या बाबांनीच पाठीशी उभं राहून आधार दिला होता."

हे ऐकून सुहास पार हादरला. मनोमन त्याला खूप चीड येत होती. जित्याची नव्हे तर स्वतःचीच कारण तोही आज तेच करायला जाणार होता. सुहासला असे विचारांत हरवलेले पाहून सुधीरसरांनी एकदम विचारले,
"तू सांग. तू आज इथे कसा? अचानक?"
त्या आवाजाने सुहास भानावर आला आणि स्वतःच्या नकळत बोलून गेला ,
"मी? सहजच. जुन्या आठवणी घेऊन आल्यात आज इथे. मी काय म्हणतो, घर फारच खराब झालं आहे ना? पुढच्या आठवड्यात येऊन थोडी दुरुस्ती करून देईन म्हणतो."
त्याची नजर त्या जीर्ण घराच्या भिंतींवर फिरत होती. अचानक त्याला सरांचा हात खांद्यावर जाणवला आणि पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा त्याने पुसून काढल्या.

- रुपाली ठोंबरे.

3 comments:

  1. भावना किती अनावर होतात काय सांगु

    ReplyDelete
  2. currently true situation everywhere... nicely rendered... Awesome Rupali...

    ReplyDelete

Blogs I follow :