Tuesday, December 11, 2018

सोहळा ६ दिवसांचा

पाच ते दहा... अवघ्या ६ दिवसांचा हा सोहळा. 
पण आयुष्यात किती काही घेऊन आला हा ... आणि किती काही देऊन गेला. 
या सहा दिवसांसाठी किती परिश्रम घेतले , किती तयारी केली हे शब्दांत मांडणे आमच्यापैकी कोणासाठीही कठीणच. कारण या ज्या कलाकृती इथे सादर झाल्या त्या केवळ १ महिना किंवा ६ महिन्यापासून घेतलेल्या परिश्रमाचे फळ नसून गेल्या कित्येक वर्षांपासून सुलेखनाच्या क्षेत्रात शिरल्यानंतर घेतलेल्या मेहनतीसाठीच्या यशाची ही पावती आहे. एका उभ्या रेषेपासून सुरुवात करून आज आम्ही सर्वच इथवर पोहोचलो आहोत याचे श्रेय जाते ते आमच्या अच्युत सरांना... साहजिकच सोबत स्वतःची धीर, चिकाटी ,मेहनत ही होतीच. एक रेष... त्यामागची संकल्पना ... त्या रेषेशेजारी नव्याने निर्माण होणाऱ्या रेषेचे नाते, त्या दोघांमधल्या जागेचे मापन...अक्षरांची मांडणी... रंगांची योजना...या सर्व गोष्टी एका पाठोपाठ एक शिकत गेलो... कधी चुकलो, नंतर सावरलो आणि पुढे चुकता चुकता , प्रसंगी तिखट-गोड मार्गदर्शनासोबत स्वतःला शोधत निरनिराळ्या रचना आमच्या हातून घडत गेल्या. त्यावर सरांच्या दृष्टीचे आणि त्यातल्या समाधानाचे शिक्कामोर्तब झाले आणि ही चित्रे संमतीच्या चौकटींमध्ये बंदिस्त होऊन प्रदर्शनातील भिंतींवर उभी राहण्यासाठी मुक्तपणे सज्ज झाली. 

अर्बन हाट.... बेलापूर स्टेशनपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेला हा गड... हो गडच म्हणावा लागेल याला आता तर.नुसत्या ३-४ फेऱ्या झाल्या तरी माणूस हमखास खाली बसेल असा हा परिसर, पण तरी इथे मोजता येणार नाहीत इतक्या फेऱ्या या १० दिवसांत केल्या सर्वानी. तरी तो थकवा मात्र कधी जाणवला नाही...  याला कॅलिफेस्टची झिंगच म्हणावी लागेल, नाही का ? मस्त निसर्गाच्या कुशीत विसावलेली एक रम्य जागा...आणि त्यावर इतस्ततः पसरलेली अक्षरेच अक्षरे.... आहे ना कलाप्रेमींसाठी एक आनंदाची पर्वणी. आणि खरेच इथे ठरल्याप्रमाणे कलाप्रेमींचा सतत वावर होता. प्रत्येकाला आपले काम वर्णन करणे आणि त्यांची त्यावरची प्रतिक्रिया जाणणे हा एक सुंदर अनुभव. नुसते इतर कलाप्रेमींच नव्हे तर सर्वांचे नातेवाईक , प्रियजन सर्वानी या कलाकृतींना भेट देऊन या प्रदर्शनाची शोभा वाढवली त्या सर्वांचेच मनापासून आभार मानावेसे वाटतात. 


विविध मान्यवर कलाकारांच्या कार्यशाळा आणि प्रात्यक्षिके हाही एक सुंदर कार्यभाग. किती काही शिकायला मिळाले या सर्वांमधून. इतरांचे काम पाहताना आपल्यात नकळत विकास घडत होता. खूप काही नव्याने शिकायला मिळत होते. काय चुकते ते न सांगताच उमगत होते. लेखनापासून ते सुलेखनापर्यंतचा प्रवास नव्याने वेगवेगळ्या पद्धतीने निरनिराळ्या व्यक्तीकडून मनावर घडत होता. ओरिया असो वा बंगाली , मराठी असो व तेलगू .... आम्हा साऱ्यांचेच काम अतिशय उत्तम होते असा शेरा अनेकांकडून मिळाला तेव्हा फार हायसे वाटत होते. कौतुकाचा , मार्गदर्शनाचा पाऊसच पाऊस त्या गडावर कोसळत होता आणि त्या सुंदर सरींमध्ये आमची अक्षरे आणि त्यासोबत आमची मने चिंब होत होती. 



पण हे सर्व मिळवण्यासाठी आधी सांगितले तसे खरेच कितीतरी मोठी तपश्चर्या आम्ही प्रत्येकानेच केली आहे. मूळ कॅलिफेस्टच्या कामाला जवळजवळ ६ महिन्यांपूर्वी कशी सुरुवात झाली हे अजूनही आठवते. कॅलिफेस्टसाठी नियोजित केलेल्या मिटींग्स...त्यासाठी दुरदुरून प्रत्येकाचे बेलापूरला येणे ... त्यात झालेल्या चर्चा... तेव्हा पडलेले कामासाठी आणि भाषांचे ग्रुप्स ... नवीन लिपी शिकण्याची जिद्द ... त्या नव्या अक्षरांत स्वतःच्या कल्पनांनी नवे रंग भरण्याचे प्रत्येकाचे कसब... कुठल्याही प्रकारच्या चढाओढीशिवाय उत्तम काम करून आणणारे सारेजण... प्रायोजक मिळवण्यासाठीची सरांचे आणि इतरांचे प्रयत्न...बदलत पण चांगल्या पद्धतीने साध्य होत जाणारे नवनवे प्लॅन्स... कधी हताश झालेले... कधी नव्या उमेदीने उत्साही झालेले सारे सारे चेहरे आठवतात. ही सर्व दहा दिवसांपूर्वीची तयारी. पण कॅलिफेस्टच्या मूळ कामाला जोर आला तो १ तारखेपासून. जमतील तितके आणि जमेल तितके प्रत्येकाने त्या एवढ्या मोठ्या गडाला श्रुंगारण्याचे कार्य सर्वानी अगदी आनंदाने पार पाडले. त्यात मेहनत होतीच पण त्याहीपेक्षा कित्येक पटींनी जास्त मज्जा होती... उत्साह होता, आनंद होता, समाधान होते. दगड , झाडे,पायऱ्या, भिंती जे दिसेल तिथे अक्षरांचा पाऊस पडला. प्रदर्शनाच्या २ दिवस आधीच आपापल्या भाषेचे नवे घर त्या निसर्गाच्या सानिध्यात प्रत्येकाने उभारण्यास सुरुवात केली. तेव्हा एकमेकांची सोबत घेऊन मोठमोठ्या शीट्स वर आपली कामे लावून नंतर ती भिंतींवर विराजमान करणे... बघायला सोपे वाटत असले तरी खूप मोठे काम आहे ते. आपले घर कसे सुंदर दिसेल यासाठीचा प्रत्येकाचा आटापिटा आणि नंतर ते सुंदररित्या कलाप्रेमींच्या स्वागतासाठी सुसज्ज करणे... खूप मोठा आणि सुंदर अनुभव. 

या दहा दिवसांत सकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत सर्व एकत्र... मग गप्पागोष्टी... चिडवाचिडवी... मज्जाच मज्जा! या अशा प्रदर्शनामुळे आणि सरांच्या सानिध्यात राहून असे उपक्रम केल्याने फक्त सुलेखन क्षेत्रातच नव्हे तर एक माणूस म्हणून घडण्यासही खूप मदत होते हे प्रकर्षाने जाणवते. काय नसते यात ? कला... मेहनत... चिकाटी... चुकले तरी त्या समजून घेण्याची मानसिकता... उत्तम घरगुती चवीचे जेवण... नाचगाणी...फोटोंचा तर अगदी पाऊसच... धम्माल एकदम ... मज्जाच मज्जा... आनंद...मदत करण्याची वृत्ती... नवी-जुनी  नाती... सारेच वृद्धिंगत होत जाते म्हणून मला इथे येण्यास फार फार आवडते. आणि माझ्यासारखेच मत आम्हा सर्वांचेच असेल यात मला तरी शंका वाटत नाही. 


काल हा सोहळा संपला आणि जितक्या परिश्रमांनी या कलाकृती उभ्या राहिल्या होत्या तितक्याच जड अंतःकरणाने त्या सर्वाना खाली उतरवण्याचे काम सुरु झाले. पण त्यातही एक वेगळी मज्जा असते. पुन्हा एकदा सर्वाना सोबत घेऊन हे कार्यही पार पडते आणि मग समोर दिसतात त्या भकास भिंती ज्या कालपर्यंत मोठ्या दिमाखात नटूनथटून उभ्या होत्या. पण हे नेहमीचेच म्हणून आता त्यासाठी वाईट वाटणे कमी झाले आहे. पण तरी एक विशिष्ट पोकळी निर्माण होते मनात, जी प्रखरतेने जाणवते ती दुसऱ्या दिवशी. गेले दहा दिवस जे घडत होते ते सर्व अचानक संपून जाते आणि पुन्हा दहा दिवसांपूर्वीची दिनचर्या आयुष्यात पुन्हा हजर होते आणि तिला कवटाळावे लागते. गेल्या काही दिवसांतल्या आठवणींचे मनात असे काही कोंदण झालेले असते कि त्या दिवसभर मनात एखाद्या सुखद झुळुकेप्रमाणे नकळत येत जात राहतात. हळूहळू या आठवणींवर काळाचे पापुद्रे चढू लागतील पण तरी आयुष्याच्या एका पानावर कोरला गेलेला हा 'कॅलिफेस्ट २०१८' मात्र कधीच आठवणींच्या पसाऱ्यांतून पुसला जाणार नाही... निदान माझ्यातरी मनातून तो कधी जाणार नाही. आणि या कवडश्यातूनच अशाच एखाद्या पुढच्या उपक्रमाची ओढ निर्माण होईल आणि त्यासाठीचे नवे प्रयत्न नव्या उत्साहाने सुरु होतील, हो कि नाही?




- रुपाली  ठोंबरे. 

3 comments:

  1. पुन्हा एकदा सुंदर अनुभव...

    ReplyDelete
  2. Saglyanchya manatle, achuk shabdat mandale😊👍

    ReplyDelete
  3. Itake divas pratyaksha anubhavlele sagale tuzya likhanatun parat dolyasamor ubhe rahile

    ReplyDelete

Blogs I follow :