Monday, December 17, 2018

वडिलांना ७५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा- मुलीकडून

(एका मैत्रिणीसाठी तिच्या बाबांच्या ७५ व्या वाढदिवसासाठी शुभेच्छा देणारे केलेले लेखन.... )

थोर जीवनाचा वटवृक्ष तू  
ज्याच्या सावलीत मी कणकण वाढली 
तुझ्या मायेच्या पारंब्यांसवे सुखाचे झोके घेत 
तुझी ही लाडाची लेक प्रत्येक ऋतूत बहरत गेली 
तूच जीवनदाता , तूच शिल्पकार... या जीवनाचा, या मनाचा 
वेळप्रसंगी सावरणारा सखासोबतीही तूच... तूच मार्गदर्शक दिवा 
तुझ्यासवे आयुष्याची कितीतरी पाने नव्याने लिहिली 
तुमची शिस्त आणि संस्कारांची देणं अजूनही शिदोरीत जपून ठेवली 
आठवतात ते सारे क्षण...ते खेळ...त्या जुन्या आठवणी 
ज्या अधिकच  दाट झाल्या जेव्हा केलीस तू माझी पाठवणी 
प्रत्येक प्रसंगी जरी नसशील तू प्रत्यक्ष सोबत,
तरी खरे सांगते मी, बाबा
तुमचे विचार, तुमचे संस्कार , तुमची प्रत्येक आठवण खूप आहे जगण्याला 
पण तरी 
तुमचे प्रत्यक्ष सामोरी असणे ही खरेच आनंदाची एक पर्वणी 
आणि याच पर्वणीचा आनंद हवा आहे मला सोबत, वर्षानुवर्षे...अनंत युगे 
अरे, काय म्हणालात?
आज ७५ वर्षे पूर्ण जाहली ? काया ही वृद्धत्वाकडे झुकली?
छे! छे! अजिबात नाही ! 
मी तर म्हणेन,
आज १८ वर्षे पूर्ण होऊन तुम्ही नवतारुण्यात शिरलात.... 
सोबत ५७ वर्षांचा आयुष्याचा सखोल अनुभव घेऊन. 
मग चला तर ,
नव्या उमेदीने , नव्या जोशात आयुष्याला आणखी एक नवा आकार देऊ 
धावपळीत लुप्त झालेल्या इच्छा-आकांक्षा... छंद... स्वप्ने... सर्वाना नवी वाट दाखवू 
कधीतरी कुठेतरी राहून गेलेले सर्व शोधून पुन्हा जोपासायला सुरुवात करू 
असा निश्चय मनाशी करून तुम्ही पुढच्या प्रवासासाठी नवे पाऊल पुढे टाका 
माझ्या शुभेच्छा आणि साथ आहेच की सोबत तुमच्या प्रत्येक घडीला.... 


- रुपाली ठोंबरे.

4 comments:

Blogs I follow :