प्राध्यापक,लेखक, कवी
'प्रवीण दवणे' यांचे "जेथे जातो
तेथे " हे वाचण्यासाठी हातात घेतलेले पुस्तक
म्हणजे २६
छोट्या छोट्या रोजच्या जीवनातील
कथांची गुंफलेली नाजूक माळच.
या माळेच्या प्रत्येक
फुलात एक वेगळाच
गंध आहे , नात्यांचा
ओला स्पर्श आहे.प्रत्येक चिंतन मालिका
वाचताना त्यातले हवेहवेशे शब्द
वेचताना ,आशयाचे मर्म मनात
कोरताना आपण नकळत
त्या कथेत स्वतःला
पाहतो, जणू हे
माझ्यासोबतही झालेच की . प्रत्येक
कथा म्हणजे जीवनाचे
एक व्यवहारज्ञान शिकवताना
सोप्या शब्दांत मांडलेली एक
सुरेख आरास.
थोडक्यात, हा
कथासंग्रह म्हणजे
- " त्या तिथे पलीकडे " च्या जुन्या आठवणींत डोकावताना आजच्या पिढीशी तुलना करताना शाळा सुटल्यावर अनेक वर्षांनी भेटलेले पन्नाशीतले मित्र-मैत्रिणींचे गेट-टुगेदर.
- सतत गोंगाटात राहणारा आणि शांततेचे नुसते स्वप्न पाहणाऱ्याला जेव्हा खरोखर अशी "शांती " प्राप्त होते तेव्हा "तुझ्या एका हाकेसाठी" आतुरलेला तो.
- एका ठिकाणी अन्नावाचून जीवनाशी लढणारा जीव आणि दुसरीकडे या "पुर्णब्रम्हाचा कडेलोट "करणाऱ्यांची ऐट. असे कालानुरूप बदलत जाणाऱ्या मानसिकतेमुळे आणि परिस्थितीमुळे दोन विभिन्न जगांत विभागलेले आजचे जग .
- निराधार वृद्धांमध्ये स्वतःचे आईवडील शोधणारा एक "सहजीवनाचा महोत्सव "
- मृत्यूनंतरही स्मशानापर्यंत सोबत असणारे "देवाचे हात "
- नाती जपताना ज्या धीराच्या रियाजाची गरज आहे तो म्हणजे "आपला विश्वासू " म्हणताना वाटणारा खरा विश्वास.
- " कसे करू स्वागता?" या विचाराने लेखकाने अनुभवलेल्या स्वागताच्या विविध गमतीशीर तऱ्हा
- जीवनात येणाऱ्या प्रत्येक कठीण परीक्षेपूर्वी " आनंदाची पूर्वतयारी " केली कि जीवन कसे सुखमय होते याची गुरुकिल्ली .
- दहावीचा तो कृतज्ञतेच्या अश्रूंत भिजलेला " संवेदनांचा निरोप समारंभ "
- आयुष्याच्या शेवटपर्यंत रडगाणे गात राहण्यापेक्षा अनुभवांचा दिवा हाती घेत इतराना रुपेरी भविष्यासाठी मार्गदर्शन करणारे "डौल"दार ज्येष्ठपण.
- " त्याच वेळी … "जर केले असते तर … अशी कुरकुर दुःखात असताना नेहमी करणारा तेव्हा अपेक्षित पण ईश्वरकृपेने न घडलेल्या घटनांना आणि त्या थांबवणाऱ्याला निश्चितच विसरतो. अनेक अनोळखी संकटांपासून वाचवणाऱ्या या शक्तीचे स्मरण आणि आभार .
- आपल्या पुढच्या पिढीने समोर ठेवलेले आदर्श आणि त्यांच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा यांतील विसंगतीमुळे गुरफटून गेलेला एक विद्यार्थी शेवटी पत्र लिहून विचारतो " सर , चुकतोय का मी ?". मुलांबद्दल नेहमी विचार करणाऱ्यांना विचार करायला लावणारे एक पत्र.
- " नऊ म्हणजे साडेनऊ " असे गणित आखून एखादी पूर्वतयारी करणाऱ्यांच्या हातून होणारा वेळेचा अपव्यय दाखवून देणारे आणि वेळेची जाणीव करून देणारे काट्याविरहित एक अदृश्य घडयाळ .
- वयाचे ४० वर्षे एखादा चांगुलपणा जोपासणाऱ्याकडून कधी कधी हा " चांगुलपणाचा दर्प" जेव्हा इतराना नकोसा वाटतो तेव्हा त्यातूनही शिकायला मिळालेलं काहीतरी.
- " मनातल्या मनात " उमललेलं अव्यक्त जेव्हा हकीकतेत व्यक्त होतं तेव्हा त्यातून मिळणारं सूख किती लाख मोलाचं असतं याची जाणीव .
- आजच्या जगात काळाच्या ओघात हरवलेली सुट्टीतील खरी मज्जा अनुभवास आणणारी " सुट्टीतील पाळणाघरं "
- खरेतर जीवन म्हणजे जीवनाच्या प्रवासातील "ज्याचा त्याचा टाईमपास" च. तो कसा असावा आणि कसा असू नये याची सुरेख गुंफण.
- जागरूक मुलगा किंवा मुलगी असे “घराघरातले अर्जुन” कधी कधी चुकणाऱ्या पालकांनाही घडवू शकतात. हेही एक कटू सत्य दाखवणारा एक आरसा.
- " स्वानंदासाठी वणवण " करण्यापेक्षा स्वतःतच ते दडले आहे हे कित्येकदा माणूस विसरतो. त्याला गवसणी घालण्यासाठी चाललेली धडपड .
- मनात योग्य भावना ,दृढ निश्चय आणि उत्कंठता असेल तर "वाळवंटातही हिरवळ" निर्माण करता येते ही आशा .
- नवरा आणि मुलगा यांच्याशी एकसमान नात्याच्या धाग्याने बांधले गेलेले "आईचे सॅंडविच " प्रत्येक घरी बघायला मिळते. अशा माऊलीचे अचूक चित्रण.
- ५० वर्षांतील "भांडणातील पन्नाशी" उलटताना आलेल्या सांसारिक अनुभवातून आजच्या तरुण पिढीला दिलेले मार्गदर्शन .
- आयुष्याच्या व्यवहारात " खर्चातील जमा " मिळवणेही किती महत्त्वाचे याची सुंदर उदाहरणे .
- " सजण दारी उभा " म्हणत वाट पाहत तिष्ठत उभे मन वेडे आणि आपल्या हाकेला साद देत येणारा सुसाट ,विराट ,भन्नाट ,देखणा पण खराखुरा पाऊस.
- प्रत्येकाच्या आयुष्यात घडलेल्या घटना आणि त्यातून उद्भवलेली " आयुष्याची प्रश्नपत्रिका "
- " तू माझा सांगाती " म्हणत निखळ प्रेम , विश्वास आणि उसासा व्यक्त करणाऱ्या मैत्रीपूर्ण खांद्यासाठी आसुसलेल्या समाजाचा लेखकाने घेतलेला निरोप.
सर्वांनी वाचावे, समजून
योग्य बोध घ्यावा,आचरणात आणावे असेच एक हलके-फुलके पण वास्तववादी आरसा दाखवणारे जीवन
विकासाचे ध्येय साधणारे एक पुस्तक.
- रुपाली ठोंबरे
No comments:
Post a Comment