प्रत्येकामध्ये स्थिर व शाश्वत स्थायी भावना असतात . हे सर्व स्थायी भाव कमीअधिक प्रमाणात प्रत्येकाच्या ठिकाणी असतात. हे स्थायीभाव चाळविले जाऊन नऊ प्रकारचे रस निर्माण होतात.जणू प्रत्येकामध्ये या नऊ रसांत चढाओढ सुरु असते. आणि यात विजय प्राप्त करणारा भाव चेहऱ्यारूपी सिंहासनावर विराजमान होतो. शरीराच्या पेशी न पेशी या भावनेच्या अधीन होवून जाते. आणि या रसात फक्त व्यक्तीच नाही तर पूर्ण सभोवताल न्हावून निघतो. जीवनात स्वतः केंद्र असू तर आजूबाजूचा परिसर हा या वलयाचा परिघ. आणि नवरसांवर नियंत्रण मिळवून आपण स्वतःतच नव्हे तर इतरांतही योग्य बदल घडवून आणू शकतो.आनंदाचा दरवळ चहूकडे पसरवू शकतो.
प्रेमात मनाचा शृंगार सुंदर
आनंदाचे ओहोळ सबंध अंगावर
हास्य खळाळते वाहते शुभ्र निर्झर
ओसंडणाऱ्या आनंदाचे पूर अंगभर
अजाण सत्य उभे राहून समोर
अदभूत होई मन भाव विभोर
विचारकल्लोळ चित्त अस्वस्थ
समाधीत भाव खरे शांत नेमस्त
राग तप्त मनाच्या विसंगतेत
जीवन उद्ध्वस्त कधी रुद्र भावनेत
संयम शरीर मनावर, न कधी हरे वीर
अभिमान नसनसांत ,कधी न खचे धीर
करुण होई मन दीर्घ होता वेदना
आसवांत विराव्या सौम्य संवेदना
मन ढगाळ सावळे भय-रूपच आगळे
अंतर्मनावर विजयी भीती कशी ना कळे
असमाधानी मनाचे रूप करी विमनस्क
किळसवाणी मुद्रा आणी भाव विभत्स
नवरसांचे चाले मनात संगर
विजयीश्रीची ध्वज लहर चेहऱ्यावर
भाव मनीचे थुईथुई नाचती अंगभर
ओसंडलेला रस सांडतो क्षणात जगभर
स्व-रसात डुंबून हरवतो तोही परीघ-परिसर
जीवनवलयाचे केंद्र-परीघ अबलंबून नवरसांवर
- रुपाली ठोंबरे.
Amazing - Navras.
ReplyDelete