Monday, August 24, 2015

मानसपूजा

२-३ दिवसांपूर्वी मानसोपचार तज्ञ, डॉक्टर मंगेश जोशींचे "स्वसंमोहन " या  विषयावरचे व्याख्यान ऐकण्याचा योग चालून आला आणि जीवनात एका नव्या गोष्टीची अनुभूती आली .तीच आज इथे सांगावीशी वाटते. 

आजच्या धकाधकीच्या काळात खूपच दुर्लभ मनुष्य असा दिसेल जो "मला टेन्शन नाही "असे बोलताना आढळेल. चौथी-पाचवीच्या इयत्तेतील लहानग्यांपासून ते ८० वर्षांच्या वृद्धांपर्यंत प्रत्येकजण  कोणत्या न कोणत्या टेन्शनमध्ये जखडलेला असतो. मग कारण काहीही असो .मानसिक आणि शारीरिक शक्ती क्षीण झाल्यानंतरही हा टेन्शनरुपी राक्षस सतत माणसाचा पाठलाग करत असतो. मग त्यावेळी यातून मुक्त होण्याचा साधा सोपा माणसाने शोधलेला मार्ग म्हणजे कायम देव-देव करणे. रोज देवपूजा ,आठवड्यातून २-३ उपवास ,दूरदूर तीर्थस्थानांची वारी. पण खरेच हे इतके गरजेचे आहे ?यापासून खरी मनःशांती मिळेल ? संतानीही वेळोवेळी हेच सांगितले आहे कि देव हा देवळात नाही तर माणसातच तो वसलेला आहे.
                                                    शोधिसी मानवा राऊळीं, मंदिरीं
                                                     नांदतो देव हा आपुल्या अंतरी।।
'वंदना विटणकर' यांच्या याच गीतबोलांशी निगडीत असा एक नवीन विषय या व्याख्यानाच्या माध्यमातून जाणून घेण्याचे भाग्य लाभले. तोच आज इथे मांडण्याचा प्रयत्न मी करते आहे. आणि तो विषय म्हणजे एक ध्यानाचा क्वचितच माहित असलेला प्रकार - मानसपूजा.

आपण प्रत्येकजण थोडेबहुत आस्तिक आहोतच. पण बहुतेक जण तुम्हाला असे आढळतील जे सतत देव देव करत असतात .अगदी अभिमानाने सांगत असतात , 'मी देवपूजा केल्याशिवाय घराबाहेर पाऊलही ठेवत नाही ','मी सकाळचा पहिला चहा देवासमोर दिवा लावल्यानंतरच घेते.'अगदी आपल्याही घरी रोज सकाळी चांगली साजरेसंगीत पूजा केली जाते. पण ती करताना आपण खुपदा ते एक दिवसाचे काम म्हणून करत असतो. ही पूजा करत असताना लक्ष घरातल्या दहा ठिकाणी एकवटलेले असते. आरती करत असताना मध्येच एखादा फोन आला कि "मी थोड्या वेळाने फोन करतो' हे सांगण्यासाठी तरी निदान सेकंद दोन सेकंद खर्च करतो . पूजा करत असताना अचानक गृहिणीला आठवते 'अरेच्चा ! कूकर लावले आहे आणि ३ शिट्ट्या झाल्या कि लगेच एखाद्या जबाबदार गृहिणीप्रमाणे ती कुणालातरी गैस बंद करण्याची ऑर्डर सोडते. ९:१० ची लोकल पकडायची आहे असा विचार मनात घोळवत सुरु असलेल्या पूजेत देवापेक्षा घड्याळाचे दर्शन अधिक वेळा घेतले जाते. आता तुम्हीच सांगा या अशा देवपूजेत तुम्ही तुमच्या देवाशी किती एकरूप असता? हे कित्येकदा केवळ एक प्रदर्शनच, असे वाटत नाही का ?

हे तर प्रत्येकाला ज्ञात आहे कि माणसाची दोन मने असतात - बहिर्मन आणि अंतर्मन. मग ईश्वर म्हणजे आपले अंतर्मनच. ज्या शक्तीमुळे आपले जीवन सुरळीत चालले आहे तिच्या ठायी स्वतःला पूर्णपणे समर्पित होऊन नतमस्तक होणे म्हणजे खरी देवपूजा. स्वतःलाच शोधून समजून घेतले कि जीवनातील कितीतरी अडचणी कमी होतील यात शंकाच नाही. आणि हीच खरी ईश्वरसेवा.

खरे पहाता मंदिरातील किंवा देव्हाऱ्यातील मूर्ती म्हणजे निव्वळ एक धातूचा ठोकळा आहे. मूर्तिकाराच्या कल्पनेतून साकारलेले एक रूप ज्याला आपण उद्या जावून देव म्हणतो. मूर्तीकाराला वाटले या ठोकळ्यापासून दत्ताची निर्मिती करावी आणि दत्ताची मूर्ती निर्माण होते. हे सर्व आणि त्या मूर्तीची पूजा हे मानसिक समाधानासाठीच असते. पण असे खरे मानसिक समाधान हे कोणतीही मूर्ती समोर नसताना , कोणत्याही मंदिरात किंवा तीर्थस्थानी न जाताही मिळवता येते. ते कसे ?तर मानसपूजेच्या माध्यमातून.…आपण कुठूनही ,कधीही देवाची पूजा करू शकतो.

मानसपूजा म्हणजे स्वतःच्या मनःचक्षुंनी केलेली पूजा. मनः चक्षू म्हणजे मनाचे डोळे. आपल्या मनातील डोळ्यांनी आपल्याला हव्या त्या देवाची हव्या तशा पद्धतीने पूजा करणे आणि समाधानरूपी आशीर्वाद मिळवणे, हेच मानसपूजेचे स्वरूप.

हा प्रयोग करून पहायला काहीच हरकत नाही. तर यासाठी काय करावे लागते हे समजून घ्या आणि करून पहा. प्रथम डोळे मिटून शांत बसा. जागा ,वेळ यांतील कशाचेच बंधन नाही. आता डोळ्यांसमोर तुमच्या घरातला देव्हारा आणा. त्या देवांच्या मूर्ती पहा. आता जशी तुम्ही खरोखर पूजा करता तशीच पूजा करत आहात  अशी कल्पना करत स्वतःच्या मनातील डोळ्यांनी ती करत असताना स्वतःला पहा. देव्हारा पुसून घेणे ,कालची फूले निर्माल्यात ठेवून देणे हे सर्व केल्यावर नित्याप्रमाणे देवमूर्तीना ताम्हणात घ्या आणि मग पाण्याचा ,दुधाचा पुन्हा पाण्याचा अभिषेक करून त्यांचे स्नान करा ,स्वच्छ कपड्याने पुसून घ्या , पुन्हा देव्हाऱ्यात मूर्ती आसनाधीन करा. गंध ,हळद, कुंकू ,फूले आदी वाहून पूजा करा. दिवा ,उदबत्ती लावून वातावरण सुगंधी आणि  प्रसन्न होवू द्या. आरत्यांच्या सहवासात स्वतःला तल्लीन करून घ्या. तुमच्या देवाशी अगदी आपल्या मात्यापित्याप्रमाणे सर्व सांगा. मनापासून जशी हवी तशी पूजा केल्यानंतर आता तुमचे डोळे उघडा आणि आता स्वतःच या पूजेतील रहस्य अनुभवा. रोजच्या देवासमोर उभे राहून केलेल्या पूजेपेक्षा कितीतरी अधिक समाधान मिळाल्याचा प्रसन्न भाव तुमच्या ठायी नकळत जन्म घेतो. आणि हे करत असताना तुम्ही आणि तुमचा देव यामध्ये दुसरे कोणीही नसते.तुम्ही पूर्णपणे देवाशी एकरूप असतात , त्यामुळे त्यातून मिळणारा आनंदही खूप मोठा असतो. आणि हाच मानसपूजेतून मिळणारा समाधानरूपी गोड आशीर्वाद. 

अशाप्रकारे, फक्त देव्हाऱ्यातील देवाचीच नव्हे तर सबंध पृथ्वीतलावरील कुठल्याही धार्मिक क्षेत्रातील देवतेचे दर्शन तुम्ही कधीही आणि कुठूनही घेवू शकता. तुम्हाला वाटले कि शिरडीला जावून साईना भेटावे ,तुम्हाला वाटले कि समर्थांचे  दर्शन घेण्यासाठी अक्कलकोटला जावे किंवा तुमच्या कुलदेवतेची पूजा करावी . मानसपूजेतून हे सर्व कधीही आणि कुठूनही सहज शक्य आहे. इतके दूर पायपीट करत जाऊन ,रांगांत तासनतास उभे राहून मिनिटभरही प्रत्यक्ष दर्शन घेता येत नाही हा अनुभव तर सर्वानीच घेतला असेल. पण तुम्ही मानसपूजा करून या हातही न लावता येणाऱ्या देवाला स्वतः अभिषेक करून स्वतःच्या आवडीचे वस्त्र परिधान करू शकतात. हवी तेवढी त्यांची सेवा करू शकतात. अगदी देवाचे  लेकरू ,म्हणून त्याच्या मांडीवर बसू शकतात. आपल्या आई वडिलांवर जसा हक्क दाखवतो तसे हक्काने जे हवे ते सांगू शकता. तेव्हा देवाची भीती उरत नाही. तिचा हात स्वतः आपल्या डोक्यावर घेऊन जेव्हा आशीर्वाद घेता तेव्हा एक सकारात्मकता आपल्या शरिरात प्रवेशते. आणि हा अनुभव म्हणजे खरेच अवर्णनीय असतो. याचा आस्वाद घेण्याचा एकदा तरी प्रयत्न करा आणि याची अनुभूती तुम्ही स्वतःच घ्याल यात शंकाच नाही.

अशाप्रकारे, धारणा, ध्यान आणि समाधी हे मुख्य ३ प्रकार. त्यातली समाधी अवस्था ध्यानाच्या विविध टप्याटप्यात प्रवास करत शेवटी प्राप्त होते. आणि ही समाधी अवस्था स्वसंमोहनाच्या माध्यमातून लगेच मिळवता येते . पण यासाठीही कठोर साधना अवश्यक असते.


-रुपाली ठोंबरे

No comments:

Post a Comment

Blogs I follow :