Wednesday, October 7, 2015

'चिऊताई ' पुन्हा कशी रे आणशील ?

त्या दिवशी बाळाला " चिऊ ये ,काऊ ये "म्हणत एकेक घास भरवताना एका आजीला पहिले आणि  मला माझे बालपण आठवले. मी बराच वेळ गम्मत म्हणून तिथेच उभी राहिली. पण पूर्वीसारखी एकही चिमणी तिथे आली नाही किंवा साधी दृष्टीसही पडली नाही . तेव्हा मनात सहज विचार डोकावून गेला " अरेच्चा ! कुठे गेल्या असतील  चिमण्या ". खरेच आज जर निरीक्षण केले तर चिमणी हा अगदी सामान्य पक्षी आज अतिशय दुर्मिळ होऊ लागला आहे हे कटू सत्य सहज जाणवेल. याबाबत थोडा शोध घेतला आणि त्याचे कारण समोर आले आणि आश्चर्याचा धक्काच बसला.
कारण, याचे कारण होते …. आम्ही _ मानव म्हणून म्हणवणारे आपण सर्वच, भ्रमणध्वनीसाठी पसरलेले अणुकिरणोत्सर्जीत तारांचे महाकाय अदृश्य जाळे ,सिमेंटचे वाढते जंगल , विविध प्रकारच्या प्रदुषणासोबत दिवसेंदिवस वाढणारा इतस्ततः विखुरलेला कचरा…. आणि अशा वेळी आपल्याच जातीतील कावळेही शत्रू होतात.
हे असे काही आपल्यास जेव्हा समजते तेव्हा नकळत मन गहिवरते,स्वतःवर राग येतो, काही अंशी पश्चाताप होतो आणि मग जाणवते दुःखावेगाने आकांत करत आपली व्यथा सांगणारी चिमणी… तिची कहाणी …


जाळ्यात इमारतींच्या
जीव  भिरभिरतो माझा
सैरावैरा धावते इथे तिथे
शत्रू जणू विखुरलेले जिथे तिथे
जाऊ कुठे मी थांबू कुठे
गुदमरत्या जीवास देऊ आसरा कुठे

दूर गावी होता निसर्ग जीवनाचा
तिथे पिल्लांसवे संसार सुखाचा
उंच आभाळी मुक्त आम्ही राजा -राणी
सांजवाटेला पिल्लांसाठी आणू दाणा पाणी
दिवसांमागून दिवस असेच जात गेले
सुखाच्या वाटेवर एकदा दुःख चालून आले

उजाडणारा नवा दिवस क्रांती घेऊन आला
जगाचा पसारा महाजालासंगे वाढतच गेला
अजाण पाखरं आम्ही, शोधत होतो गतकाळ हरवलेला
अणूकिरणांच्या विषतारांत एकदा चिमणा जीवच कोमेजला
बावरलेली चिमणी मी, पिल्लांसंगे दूर उडून इथे आली
पण याही शहरात माझी तीच दैना झाली

झाड दिसेना एक
कुठे शोधू मी आसरा
आणू पिल्लांसी आता
कोठून रोज नवा चारा

सिमेंटच्या जाळ्यात आज
हरवली कापसाची मऊ दुलई
मोकळ्या हवेसाठी सुद्धा
शोधत फिरते दिशा दाही

बदललेलं जग पाहून
जीव जातो रे गोठून
कचराच चारा होऊन
जगवतो भूक शमवून

कावळ्याच्याही जगात
असाच दुष्काळ आला
आमचाच असूनही
आज तोही शत्रू झाला

दिवसांमागून दिवस असेच जातील
नवे बाळ 'चिमणपाखरे' गोष्टीतच पाहील
माणसा, माणूस म्हणून तू खूप मोठा रे होशील
पण बालपणीची 'चिऊताई ' पुन्हा कशी आणशील ?
आज शून्य-मुल्य मी ,उद्या दुर्मिळ होईन
माझ्या साठी मग कधीतरी लाखही मोजशील

- रुपाली ठोंबरे

4 comments:

  1. आपणच जवाबदार आहोत चिऊताई ला नाहीसे करण्याबाबत ...

    ReplyDelete

Blogs I follow :