Friday, April 15, 2016

मी ही होईन मर्यादापुरुषोत्तम

        " अगं आर्या, ते ओटयावर ठेवलेलं औक्षणाचं ताट आण बरे "

नुकतीच आंघोळ करून येणाऱ्या गुटगुटीत रामला पाहून खुर्चीतून उठत पदर सावरत गायत्रीआजीने रामच्या थोरल्या बहिणीला हाक मारली.

आजीनेच आणलेला मोतिया रंगाचा कुर्ता पायजमा घालून राम दुडूदुडू पळत दिवाणघरात पोहोचला. मागे त्याची आई हातात कंगवा घेऊन आली,

         " अरे बाळा, भांग तरी पाडून घे.आता सासूबाई घ्या. तुमच्याच हातून  विंचरून घ्यायचे आहेत याला "
म्हणत तिने कंगवा आजीच्या हातात दिला आणि कोपऱ्यातला पाट जमिनीवर मांडू लागली.आईला फुलवेलींची सुंदर रांगोळी पाटाभोवती काढताना पाहून शहाण्या मुलासारखा आजीसमोर उभा असलेला राम धावतच आईजवळ आला. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवून वाकून राम निरीक्षण करू लागला आणि तसे त्याचे कुतूहल वाढले.

          " ए आई, आज काय आहे गं खास ? मी करू का अशीच नक्षी?"

 म्हणत आपला छोटासा हात पांढऱ्या रांगोळीत घातला. तशी आजी कशीबशी उठत रामपाशी आली आणि प्रेमाने पण ओढतच पुन्हा पूर्वीच्या जागी आली. आपल्या सुरकुत्या हातांमध्ये फणी घेऊन ती पुन्हा आपल्या नातवाचे केस विंचरू लागली. त्यासोबतच तिचे कापरे बोल राम अगदी कुतूहलतेने ऐकून घेत होता.

      " अरे रामा , आज तू ५ वर्षांचा झालास. आता मोठा झालास, शहाण्यासारखं वागायचं.… "
तिच्या उपदेशाला मध्येच तोडत राम हसतच म्हणाला ,

      " अगं आजी , म्हणजे तुला माझा बर्थडे माहितच नाही वाटतं . माझा बर्थडे काही आज नाही . पुढच्या बुधवारी आहे.तेव्हा पार्टी आहे घरी. माझे सर्व मित्र येतील. बाबांनी छान ड्रेस पण आणला आहे .तेव्हा असशील ना तू इथे ?"

यावर सर्वांना क्षणभर हसूच आले. पण मग आजी पुढे बोलू लागली.

       " अरे राम नवमीचा खरा जन्म तुझा. असेल तुझा जन्मदिवस त्या इंग्लिश तारखेला . पण मी तर बाबा तिथीनुसारच मानीन.म्हणूनच तुझं नाव 'राम' ठेवले आहे आम्ही. राम म्हणजे स्वतः आनंदात रममाण असलेला आणि दुसर्‍याना आनंदात रममाण करणारा.शब्द लहानच पण खूप शक्ती आहे 'राम' नामात. तू सेतूपूलाची गोष्ट ऐकलीस ना परवा. आता ऐक, आई औक्षण करेल बाळाचं. छान छान खाऊ देईल.कसली पार्टी-बिर्टी करतात तुम्ही. वाढदिवसादिवशी देवासोबतच सर्व मोठ्यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्यायचे ही आपली खरी संस्कृती. बाबा रे , खूप मोठा हो … अगदी मर्यादापुरुषोत्तम रामासारखा."

         " राम तर मी आहेच की ? पण मर्यादापुरुषोत्तम म्हणजे?"
 रामच्या या त्वरित प्रश्नाला उत्तर देत आजीने रामलाच उलट प्रश्न केला ,

         "  अरे मी प्रभू श्रीरामाबद्दल बोलते आहे. तू सांग तुला काय काय माहित आहे रामाबद्दल ?"

आपल्या स्मरणशक्तीची कसोटीच आजी घेत आहे कि काय आणि आता सचोटीने यात पास व्हायलाच हवे या अविर्भावात राम पूर्वी सांगितलेल्या , ऐकलेल्या , पाहिलेल्या गोष्टींतून उत्तर बनवू लागला .

" प्रभू श्रीराम म्हणजे अयोध्येचा राजा.त्यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी या तिथीला झाला होता.रामाचा जन्म सूर्यवंशात झाला. त्याचा जन्म दुपारी १२ वाजता झाला, तरी त्याला रामभानु अशा तर्‍हेचे नावात सूर्य असलेले नाव दिले नाही. पुढे रामाने चंद्राचा हट्ट केल्याच्या प्रसंगावरून त्याला रामचंद्र हे नाव पडले असावे. राजा दशरथ आणि कौसल्या राणीचा लाडका मुलगा. जसा मी , आईपप्पांचा.सीतेबरोबर त्यांचे लग्न झाले . मग कैकेयी नावाच्या दुष्ट काकूमुळे ते दोघे दूर जंगलात फिरायला जातात.पण तिथे रावण नावाचा राक्षस येतो आणि तो सीतेला पळवून त्याच्या गावी नेतो .त्याचे गाव अं …आठवले श्रीलंका. तिथे सीता नेहमी झाडाखाली रडत बसायची. तिला आठवण येत असेल ना रामाची ? मग रामाचा आवडता भक्त येतो… हनुमान. मला हनुमान खूप आवडतो, आजी. माझ्या रूम मध्ये पाहिलेस का हनुमानाचे मोठ्ठे चित्र आहे. मग वानरांची सेना , राम ,लक्ष्मण दूर रावणाच्या त्या समुद्रातल्या गावी जातात… 'राम'नाम लिहिलेल्या दगडांच्या सेतुपूलावरून . तिथे खूप मोठे युद्ध होते. इथून एक बाण येतो मग तिथून एक बाण , मग दोघांची टक्कर… आणि शेवटी रावण बाण लागून मरून जातो. मग सीता आणि राम आपल्या घरी येतात.दुष्ट रावणाचा वध करून आणि लंका जिंकून घेतल्यानंतर, म्हणजे स्वतःचे भगवंतपण दाखविल्यानंतर राम जेव्हा सीतेसह अयोध्येला परतला, तेव्हा सर्व अयोध्यावासी त्याला ‘श्रीराम’ म्हणू लागले. बघ मला माहित आहे सर्व. टी वी वर पाहिलेय मी. अजून त्यांना लव आणि कुश नावाची मुलेपण होती हे पण माहित आहे मला .

           " हो रे हो . हुश्शार माझा बाळ "

 म्हणत आजी रामला कुशीत घेत पापे घेतच पुढे म्हणते ,

         " तुला तर सर्वच माहित आहे की. पण कैकेयी ही रामाची काकू नाही बरे का . रामाची सावत्र आई . दशरथाला ३ पत्नी होत्या. आणि हो राम आणि सीता काही फिरायला नव्हते गेले तिथे. ते वनवासात होते. वडिलांच्या वचनाचा अपमान होऊ नये म्हणून. राम हा एक मनुष्य म्हणून एक खूप मोठे व्यक्तिमत्त्व होते… कितीतरी गुणांनी समृद्ध जे एका आदर्श महापुरुषाचेच लक्षण आहे. राम नेहमी कोणत्याही परिस्थितीत त्याच्या वचनांशी एकनिष्ठ राहिला. पित्याचे वचन पूर्ण व्हावे यासाठी तो पत्नीसोबत १४ वर्षे वनवासात राहिला. एका वचनपूर्तीसाठी त्याने सर्वात प्रिय अशा बंधू लक्ष्मणालाही माफ केले नाही. "

आजी वेळ रामाबद्दल सांगत होती आणि राम समोर बसून ऐकत होता. आता आर्यादेखील त्याला सामील झाली होती. मध्येच आजीचे बोलणे काही क्षणांसाठी थांबले आणि मघापासून काहीतरी विचारायचे म्हणून प्रयत्नरत असलेल्या आर्याने आजीसमोर नवा प्रश्न उपस्थित केला,

         " अगं आजी , त्या काळात तर कितीतरी राजे एकापेक्षा अधिक बायकांशी लग्न करायचे ना ?
ही एक सामान्य गोष्ट होती. दशरथ राजानेही केले होते , आता तूच म्हणाली बघ. मग रामाने कधीच असा विचार केला नसेल का ?"

         " आर्या, म्हणूनच तर श्री रामाला मर्यादापुरुषोत्तम ही उपाधी दिली आहे. राम नेहमी एकपत्नीनिष्ठ राहिला. वाल्मिकींच्या रामायणातील बालकांडात असे म्हटले आहे कि राम आणि सीता सदैव एकमेकांच्या हृदयात राहायचे. परंतू प्रसंगी एका प्रजादक्ष राजाप्रमाणे त्याने व्ययक्तिक सुखासही अधिक थारा दिला नाही. असा कर्तव्यदक्ष ,नेहमी मर्यादेत राहणारा प्रजापिता 'न भूतो न भविष्यति ' असाच आहे. त्याने मैत्रीतही जे बरोबर त्याची नेहमी साथ दिली… मग तो मित्र विभिषणासारखा राक्षस कुळातला असो वा सुग्रीवासारखा वानर कुळातला. नेहमी दर्शनासाठी आसुसलेल्या प्रत्येक भक्तासाठी त्याच प्रेमाने वागला… मग ती शापित अहिल्या असो वा उष्टी बोरे देणारी शबरी असो.रावण जेव्हा सर्व हरला होता तेव्हा रामाने शांतीने युद्ध संपवण्याची तयारी दर्शवली होती. पण रावणच… मानला नाही आणि अखेर जीव गमावला. पण श्रीराम हा आदर्श शत्रूसुद्धा होता. रावणाच्या मृत्यूनंतर अग्निसंस्कार करायला त्याचा भाऊ बिभीषण नकार देतो, तेव्हा राम त्याला सांगतो, ‘‘मरणाबरोबर वैर संपते. तू जर रावणाचा अंत्यसंस्कार करणार नसलास, तर मी करीन. तो माझाही भाऊच आहे.’’ श्रीराम आदर्श पुत्र होता. रामाने आईवडिलांच्या आज्ञांचे सदैव पालन केले. आदर्श अशा बंधुप्रेमाला अजूनही राम-लक्ष्मणाचीच उपमा देतात. श्रीराम एकपत्‍नीव्रती व राजधर्माचे पालन करण्यात तत्पर आदर्श राजा होता. प्रजेने सीतेबाबत संशय व्यक्‍त केल्यावर त्याने आपल्या वैयक्‍तिक सुखाचा विचार न करता, राजधर्म म्हणून आपल्या धर्मपत्‍नीचा त्याग केला.श्रीरामाने धर्माच्या सर्व मर्यादा पाळल्या; म्हणूनच त्याला ‘मर्यादापुरुषोत्तम’ म्हणतात."

आजीचे हे बोलणे ऐकून छोटया रामने टुणकन उडी मारली.
       
           "तर आजी मलाही आवडेल असे बनायला. मी ही होईन मर्यादापुरुषोत्तम "

आई आपल्या मुलाच्या चांगल्या बढाया ऐकत स्मित करतच म्हणाली ,

           " चल आता , लवकर पाटावर बस. तुझे औक्षण करू. आणि मग तू सर्वांचा आशीर्वाद घे. "

अशाप्रकारे रामचा जन्मदिवसाचा छोटा कार्यक्रम संपला. तसे रामने लगेच आजीपुढे हात पुढे केला ,
  
          " आजी, माझे गिफ्ट ?"

आजीने हसत हसतच रामरक्षेचे छोटेसे पुस्तक त्या चिमुकल्या तळातांवर ठेवले.

          " ही घे रामरक्षा. तुझ्या रक्षणासाठी.राम करेल तुझे रक्षण नेहमी. पण स्वतःचे प्रयत्न सदा चालू ठेवायचे. खरे रामराज्य निर्माण करायचे. पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, मन, चित्त, बुद्धि आणि अहंकार यांच्यावर हृदयातील रामाचे (आत्मारामाचे) राज्य असणे, हे खरे रामराज्य होय, असे संतांचे सांगणे असते ."


- रुपाली ठोंबरे .

   2 comments:

Blogs I follow :