Monday, April 4, 2016

पुढे चालत राहणे… हेच आहे जीवन

आज ऑफिसला येत असताना लोकलला नेहमीसारखीच गर्दी होती. नेहमीसारखेच अनेक बायकांचे आवाज त्या फर्स्ट क्लासच्या एवढ्याश्या डब्यात घुमत होते. पण नकळता माझे लक्ष बाजूलाच बसलेल्या मुलींच्या संभाषणाकडे नकळत वेधले गेले. त्यातली एक जण नुकत्याच काल-परवा झालेल्या तिच्या एका सहकाऱ्याच्या लोकलच्या अपघाताबद्दल सांगत होती. खरे पाहता पूर्ण चूक त्याचीही नाही. जे नेहमी करत आला आणि जे प्रसंगी सर्वच करतात तेच तो करत होता…घाईघाईत ट्रेन पकडण्याचा त्याचा निष्फळ प्रयत्न फसला आणि त्या तरणाताठया युवकाने कायमचा जीव गमावला.गाडीची चाके कमी-जास्त वेगात पुढे धावत होती त्या गत क्षणांच्या आठवणीसोबत. त्या घटनेच्या प्रत्येक शब्दासोबत…. माझ्याही मनात विचारांची अनेक चक्रे एकाच वेळी घुमू लागली.

कसे असते न प्रत्येकाचे आयुष्य. या क्षणाला आहे तर पुढच्या क्षणाला असेल की नाही याची शाश्वती कोणालाच देता येणार नाही. तरी माणूस सतत धावत असतो…. एका वेगळ्याच मृगजळाकडे.मृगजळच ते…. सुख सुख म्हणून पाठलाग करतो नात्यांचा , पैशाचा , प्रसिद्धीचा अशा विविध गोष्टींचा…. पण जेव्हा ते खरोखर समोर येते… अनुभवयास मिळते तेव्हा ते सुख क्षुल्लक वाटते आणि पुन्हा पळतो एका नव्या सुखाकडे. मग जे समोर असूनही मन तृप्त होत नाही ते मृगजळच ना ?

पण सुखाचा शोध न घेता फक्त त्याची अपेक्षा करत राहणेही योग्य नाही.… एका ठिकाणीच स्तब्ध राहून जबाबदाऱ्यापासून दूर पळणेही योग्य नाही. नाती, पैसा हे सर्वच काही नसले तरी जगण्याला आवश्यक असेच आहे. अशा काही इच्छापूर्तीतूनच पुढे सुखाचा उगम होतो. त्यामुळे त्यांचा पाठलाग आवश्यकच आहे.

आता तुम्ही म्हणाल पळायचे नाही ,थांबायचे नाही…. मग माणसाने करायचे तरी काय ?
अगदी सध्या शब्दांत सांगायचे झाले तर… चालत राहा… अगदी अखंड चालत राहा.…गेलेला काळ कधीच पुन्हा तसाच येणार नाही हे सत्य उमगून मागे जराही वळून न पाहता फक्त भविष्याच्या दिशेने वर्तमानाच्या रस्त्यावर चालत राहा.उगाचच अतिहव्यासापायी धावत राहण्यापेक्षा स्वतःची सत्सतविवेकबुद्धी जागृत ठेवून ठरवलेले ध्येय आणि शेवटी यश मिळवणे यातच जगण्याचा खरा आनंद.

निराशेचे काळे मेघ जरी कधी दाटले तरी नव्या आशाकिरणाची आस न सोडता सतत प्रयत्नरत राहिले पाहिजे. वर्तमानपत्र हाती घेतले तरी कितीतरी उदाहरणे समोर येतात ज्यांनी परिस्थितीला कंटाळून चुकीचा मार्ग निवडला आणि स्वतः सोबतच अनेकांचे आयुष्य अंधारात ढकलले. इथे कमी पडतो तो विश्वास.… स्वतःच्या कर्तुत्वावरचा आणि देवावरचाही. आपल्याला इतके सुंदर जीवन देणारा तो नक्कीच इतका क्रूर नाही हे सदैव लक्षात असावे.जीवनात एखादया प्रसंगी जरी १० मार्ग बंद झालेत तरी एखादा मार्ग खुला असतोच. गरज आहे ती फक्त धीराची आणि प्रयत्नांची. कधीतरी प्रयत्नांच्या स्पर्शाने स्वप्नांचे ढग हकिकतेचे रूप घेऊन या जीवनात आनंदाचा वर्षाव करतीलच. गरज आहे ती फक्त योग्य दिशेने वाटचाल करत राहण्याची.

जीवन-मरणाचा फेरा अगदी देवालाही चुकला नाही. जन्मप्रसंगीच सटीदेवीद्वारे आपली मृत्युरेषाही तळहातावर कोरली जाते. कितीही प्रयत्न केला तरी मरण टळणार नाही हे माहित असतानाही जन्म-मृत्यू दरम्यानचा काळ फुकट घालवणाऱ्याला खरेच 'जीवन म्हणजे काय' हे कळले नाही असेच म्हणायला हवे. म्हणूनच नियतीने बहाल केलेल्या आयुष्यात कुठेही ,कोणत्याही कारणामुळे न थांबता निरंतर चालत राहावे.उद्या जेव्हा खरोखर थांबण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही तेव्हा जीवनात ' हे करता आले नाही , ते करायचे राहून गेले ' अशाप्रकारचे सल मनात राहणार नाही… आणि कोणतीही खंत न बाळगता समाधानाने  पुढच्या प्रवासासाठी जाता येणे हेच जीवनाचे खरे सार्थक.

- रुपाली ठोंबरे

2 comments:

  1. आयुष्य असेच चालत राहते? नव्हे आपण असेच चालत राहतो. सर्व काही समजते पण उमजत नाही. खरंच आपण पुढेच चालत असतो कां? मार्ग बदलायचे बरेच chances होते, आहेत आणि असतीलही. पण आपण सरळ, साधा, सोप्पा मार्ग अनुसरतो. किंवा त्यातच जीवनाचे सार्थक झाले असे समजतो. मार्ग बदलायला काय हरकत आहे. ज्यात आनंद आहे असे जीवन आपणच झिडकारतो, कारण तो वेगळा असतो, सर्वमान्य नसतो, आणि आहे त्यात सुख मानण्यात आपली इतिश्री समजतो. त्या गर्दीच्या लोकल मध्ये जाण्या ऐवजी जरा लवकर निघून आरामात प्रवास करणे आपणच नाकारतो ना!
    पूर्वी मी Vice-President असलेल्या कंपनीत एक Architect मुलगी वजा स्त्री होती. तिचा रिक्षा ड्रायव्हर नवरा तिला रोज पोहोचवायला यायचा आणि संध्याकाळी घ्यायलाही. किती प्रेम आहे दोघांचे एकमेकांवर असे वाटायचे. अजाण वयात चालीत राहाताना प्रेम झालं. मुलगा चांगला, त्याचे आईवडील स्वभावाने चांगले, मुलगी डोळ्यासमोरच सुखी संसार करील म्हणून गरीब आईवडीलानी लग्न हि करून दिनम. म्मुलाचे वडील गिरणी कामगार होते. गिरण्या संप झाल्यामुळं बंद पडल्या. खाण्यापिण्याचे हाल झाले. मुलाने शिक्षण सोडून शेजारील वयस्कर रिक्षाचालकाची रिक्षा रात्री चालवू लागल, दिवसा शिक्षण. फॉर्म फी भरायला नाही म्हणून इंटर-सायन्स म्हणजे आताची १२ वी च्या परीक्षेला बसू शकला नाही, शिक्षण थांबलं. रात्रंदिवस रिक्षा चालवत घर चालवत त्त्यानं बायकोचे शिक्षण मात्र सुरु ठेवले आणि ती एका बाळाची आई आणि पदवीधर Architect झाली, Scholarship मिळाली, M. Arch. झाली गरिबीतून वर आलेली असल्याने मेहनतीने कंपनीत Senior Architect पदी वयाची तिशी ओलांडेपर्यंत आणखी एक मुलगी आणि ८ वर्षात २ promotion ही मिळवली. एके दिवशी office मधून बाहेर निघताना रस्त्यावर गर्दी बघितली, बघितले तर तिचा नवरा तिला खूप मारत होता आणि रिक्षात कोंबून घेऊन गेला. office मध्ये चौकशी केली तर समजले हे नेहमीचेच आहे. काल ऑफिसमधून उतरताना बॉस बरोबर बोलत बोलत लिफ्ट मधुन बाहेर पडली हे त्याला दिसले. दुसर्या दिवशी तो office मध्ये दारापर्यंत पोहोचवून गेला, आणि संध्याकाळी परत नेण्यासाठी लवकर office मध्ये येवून बसला. तिला सोबतच्या assistant ला सूचना देत असताना त्याने पाहिले, आणि त्याची पुनरावृत्ती लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात झाली. office मधील बाकी सहकार्यांनी थोदेपर मारून त्यास थांबविण्याचा प्रयत्न केला आणि Security ला बोलाविले. तोपर्यंत ती सर्वांच्या पाया पडत होती, सोडा हो त्यांना, ते माझ्या मुलाबाळांचे वडील आहेत. आता आईवडीलही नाहीत सासू सासरेही नाहीत. आणि महत्वाचे म्हणजे त्यांचे माझ्यावर खूपखूप प्रेम आहे, त्यांच्यामुळेच मी शिकले आणि इथपर्यंत पोहोचले. त्याला सोडून देण्यातच सर्वांनी तिची भलावण समजली. त्या दिवसानंतर 3-४ वर्ष ती दिसलीच नाही नीने राजीनामा दिल्याचे समजले होते. एक दिवस पतीसह एक दिवस office मध्ये आली. खूप चांगल्या कपड्यांमध्ये ती होती, नवराही सुटाबुटात होता ११-१२ वारशाच मुलगा, गोड ७-८ वर्षाची मुलगी सर्वजण आमच्या ऐशीतील वयस्कर मालकाला भेटायला आले होते. समजले, मालकांनी तिला एक छोटेसे office भाड्याने दिले होते, आणि काही कामेही मिळवून दिली होती. आणि ती दोघं आज मेहेनतीने स्वत:च्या पायावर उभी होती. तिचे स्वत:चे office होते २०-१५ जन कामाला होती, आणि तोही रिक्षा सोडून बांधकाम व्यवसायात स्थिरावत होता. बंगला होता खूप मोठी नाही पण त्या काळी मारुती एस्टीम गाडी होती. आणि महत्वाचे म्हणजे सुखी संसार होता. आणि हे सर्व फलित झाले वेगळा मार्ग स्वीकारल्यामुळे, मेहेनतीमुळे आणि आमच्या मालकाने त्याची कल्पना स्वीकारल्यामुळं. तिचा नवरा ४-५ वर्ष नोकरी झाल्यापासुनच स्वत:चा धंदा सुरु करण्याचा तिच्या मागे धोशा लावून होता पण तिच्या निम्नमध्यमवर्गीय मनाला ते उमजत नव्हते. पण जे तिला उमजत नव्हते ते आमच्या मालकाने बरोबर हेरले आणि त्यांना सन्मार्गी लावले कारण मालक स्वत: ५ भावांबरोबर अतिगरीबीतून वर आलेले गुजराती businessman होते. फक्त वेगळा मार्ग चालायची ईच्चा हवी, मदत, साथ मिळतेच. प्रथम २-४ पावलं तर चला.

    ReplyDelete
  2. अरे छान म्हणायचं तर मी विसरूनच गेली.

    ReplyDelete

Blogs I follow :