Thursday, August 18, 2016

जेव्हा मी त्या मनगटावर सजलोजेव्हा मी जन्मलो 
तेव्हा पाहून स्वतःसच 
नशिबावर खूप रुसलो 
एक साधा सुधा मी धागा 
त्यातही नाही उच्च कुळातला 
त्याच क्षणी समजून चुकलो माझी जागा 

एखाद्या साध्याच वस्त्रात 
मी विणून पडणार आयुष्यभर 
शोधत राहीन स्वतःसच मळक्या कापडांत
कधी मळणार कधी तुटणार कधी बेरंग होणार 
प्रत्येक दिवशीच राहून पाण्यात मार खाणार
अल्पायुष्यातच नवे जीवन असे व्यर्थ जाणार


असे भविष्य उराशी बाळगून हिम्मतीने जगत होतो 
एके दिवशी अचानक अपरीत काही स्वप्नवत घडले 
आणि सुंदर रंगांत घेऊन डुबकी, रेशीमधाग्यांत मी उभा होतो
भोवताली चमकदार मण्यांची आरास सजली होती 
खंबीरपणामुळे त्या रेशीमगाठीत मला वेगळाच मान होता 
बघता बघता साध्या धाग्याची बनून राखी मी आज मलमलीवर सजलो होतो


एका चिमुरडीने लाडक्या दादासाठी माझी निवड केली 
आणि त्याच क्षणी वाटले हा जन्म अजोड धन्यतेने सार्थकी लागला
तसूभर किंमत नसलेल्या मला आज मणभर प्रीती लाभली 
आज मी त्या बहीण-भावाच्या अतूट नात्याचे प्रतीक होतो
रक्षणाचे आश्वासन देणारे विश्वासाचे पवित्र बंधन बनलो होतो 
दोन निरागस मनांमधला आनंदाचा सेतू बनून जन्मलो होतो 

जेव्हा मी त्या मनगटावर सजलो 
तेव्हा पाहून स्वतःसच 
नशिबावर खूप आनंदलो 
एक साधासुधा असूनही मी धागा 
रक्षाबंधनादिवशी लाभले राखीचे रूप 
त्याच क्षणी जाणवली त्या दो मनी....  ध्रुवस्थळी माझी दुर्मिळ जागा 

- रुपाली ठोंबरे .7 comments:

 1. Fantastic!! Way to go dear :-)

  ReplyDelete
 2. अप्रतिम! धाग्याचं नशिब फक्त आजच खुलतं, आज अगोदरच खुललं.

  मी एक तुच्छ धागा,
  पण आहे मी नशीबवान,
  कधी विणला जातो संत कबीराचे हातून,
  तर कधी चरख्यावर कातला जातो महात्मा गांधीच्या हातून,
  कधी त्यांच्या शिष्यांच्या हातून तकलीवर कातला जातो,
  कधी माझा भगवा झेंडा बनतो,
  तर कधी माझा तिरंगा बनतो,
  कधी मी देशसाठी बलिदान देणाऱ्या शूर सैनिकास लपेटतो,
  तर कधी मी मृतांचे कफन बनतो,
  कधी माझा पंचा बनतो,
  तर कधी मी धोतरात विणलेला असतो,
  कधी बनारसी,
  कधी कांजीवरम,
  कधी नारायण पेठी,
  कधी पैठणीत.
  कधी रेशमी मलमलीत,
  कधी काश्मिरी शालीत
  मी विणला जातो,
  कधी मी माता यशोदेला कृष्णाला खांबाला बांधून ठेवण्यास मदत करतो,
  तर कधी मी कृष्णाहाती लगाम बनून रथाचे घोड्यांचे दिशादर्शन करतो,
  कधी मी कृष्णाने नेसलेल्या पितांबरात असतो,
  तर कधी मी पितांबर बनून द्रौपदीची लाज राखतो,
  कधी मी लग्नात नववधूचा शालू बनतो,
  तर कधी मी बहिणीच्या प्रेमाच्या रेशमी धाग्याने भावाला बांधून ठेवतो,
  रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!!!

  ReplyDelete

Blogs I follow :