आयुष्यात कितीही कष्ट असतील तरी चेहऱ्यावर एक निरागस स्मित घेऊन वावरणारी एक चिमुकली.
खरेतर १०-१२ वर्षांची ही मुलगी.
तिचे हे वय खेळण्याबागडण्याचे, हवा तो खाऊ खाण्याचे,छान छान कपडे घालून खुश होण्याचे.
पण यांपैकी एकही गोष्ट पूर्णपणे तिच्या नशिबात नाही.
गरीब शेतकऱ्याची मुलगी.आई-वडील दोघे दिवसभर शेतात राब राब राबतात.
त्यांनाच हातभार लावण्याची धडपड करणारी ही चिमुरडी सकाळीच आईने दिलेला हिरव्यागार भाज्यांचा ताटवा घेऊन बाजारात जाणारी... ५ रुपये जुडी , ३ रुपये वाटा करत गावभर हिंडणारी....संध्याकाळी थकूनभागून घरी परतणारी...बाबांच्या हातावर दिवसाचे पैसे ठेवत त्यांच्या डोळ्यांत पाणी आणणारी.
या वयात असे जगणे... पण चेहरा मात्र प्रसन्न... कुठलीही चिंता नाही... उलट एखादे भाव दिसलेच तर ते असतील समाधानाचे,आनंदाचे....या जगण्यातूनही जे हवे ते मिळवत असण्याचे समाधान.
टोपलीत हिरव्यागार ताज्या भाज्यामधून डोकावणारी २ पुस्तके तिची खरी आवड दर्शवतात. गिऱ्हाईकांची गर्दी ओसरल्यावर जेव्हा जेव्हा वेळ मिळेल ती त्या पुस्तकांमध्ये दडलेल्या ज्ञानाची चव घेण्यास आतुर असे. पुस्तकांबद्दल असलेल्या आपुलकीसमोर तिला खेळणे,खाऊ ,कपडे अशा गोष्टी नगण्य वाटत होत्या. आणि हेच कारण होते या परिस्थितीतही चेहऱ्यावर पसरलेल्या आनंदाच्या लहरींचे. आपल्या वयाच्या इतर मुलांना जे काही मिळते त्याबद्दल ना कोणता हेवा आणि आपल्या नशिबात ते सुख नाही त्याबद्दल ना कोणती खंत. पण जी शिदोरी नेहमी तिच्यासोबत आहे ती कदाचित इतरांना सहज उपलब्ध असूनही त्यांना त्याची किंमत नसेल.पण या पुस्तकांतूनच माझे उद्याचे भविष्य उज्ज्वल होईल हे मात्र त्या चिमुरडीला लहान वयातच उमगले असेल आणि ज्ञानाची असलेली हीच भूक तिला उदयाला यशस्वी करेल. एखाद्या गोष्टीची मनापासून आस ठेवली कि तो घेतलेला ध्यास स्वतःच्या इच्छाशक्तीच्या जोरावर पूर्ण होईलच हे मात्र सत्य.
चालता चालता बाजारात दिसलेले एक दृश्य...एका चित्रकाराने कागदावर टिपलेले हे चित्र खरंच किती काही बोलून जाते... आपल्यासारख्यांना किती काही शिकवून जाते, नाही का ?
- रुपाली ठोंबरे.
चित्रसौजन्य : हेमंत भोर.
No comments:
Post a Comment