Wednesday, June 21, 2017

तो येतो आणिक जातो

बरसणाऱ्या पावसाच्या प्रत्येक सरीसोबत एक थेंब या तळहातावर स्पर्श करतो... काही क्षण तिथेच विसावतो...दुसऱ्या थेंबांची चाहूल लागताच हळूच ओघळून जातो एका प्रवाहामध्ये एकरूप होण्यासाठी... पण जाता जाता या हातांना असा काही स्पर्श देऊन जातो ज्यामध्ये हे मन ओले चिंब होऊन जाते. कधीतरी मग या चिंब मनातून डोळ्यांतून पाणी निथळते पण हे पाणावलेले डोळे बरसणाऱ्या धारांत भिजलेल्या गालांवरून ओघळताना मात्र कधी दिसतच नाहीत आणि कित्येकदा कळतही नाहीत. ते फक्त बरसत असतात आतल्या आत खोल मनात...आठवणी बनून.  

 
अशाच आठवणींची सर आज या पावसासोबत पुन्हा एकदा माझ्या मनात धावून आली. आणि बघता बघता आठवांचा पाऊस झरझरु लागला. कित्येकदा माझ्या
मनात एक विचार येतो , कदाचित तुम्हालाही असा प्रश्न पडला असेलही कधीतरी. पाऊस त्याच्या ठरल्या वेळी प्रत्येक वर्षी पडतो , ऊन्हाळाही दरवर्षी या जगतात प्रखर जाणवतो , थंडीसुद्धा दरवर्षी नित्यनेमाने येते पण या सर्वांत फक्त पाऊसच पुन्हा पुन्हा अनुभवुनही  प्रत्येक वेळी नवा का वाटतो? या पावसासोबत सारेच काही नवे होते म्हणून? कि पावसासोबत आठवणींचे एक गॉड नाते अलगद जोडले जाते म्हणून ? काही दिवसांपूर्वी व्हॅट्सऍपवर एक पोस्ट वाचली ' सांग पावसा, तुझे वय काय ?' आणि याला उत्तर होते 'जसा तुम्ही अनुभवू तसा आणि तेच माझे वय '. खरेच अगदी बालपणापासून ते आजपर्यंत कित्येकदा पाऊस पाहिला पण प्रत्येक वेळी सोबत घेऊन यायचा तो नव्या आठवणी. आणि मग पुढे आयुष्यभर या आठवणींच्या सरी मनाला सुखावत असतात. मग आहे कि नाही हा पाऊस... जादुई ?
ढग दाटून येतात , मन वाहुनी नेतात 
ऋतू पावसाळी सोळा थेंब होऊनि गातात 
झिम्मड पाण्याची, अल्लड गाण्याची
सर येते... माझ्यात !
पावसाळा आला कि माझ्याही मनात आठवणींचे पूर वाहू लागतात. पण खरा पाऊस आठवतो तो बालपणीचा. १०० पैकी ९० जणांना बालपणीच्या पावसाची आठवण अधिक प्रिय असेल. बालपणी ' ये रे ये रे पावसा' किंवा 'ये ग ये ग सरी ' म्हणत येणारा पाऊस अजूनही हृदयाच्या एका कप्प्यात कोसळत असतो. त्यात कधीतरी सोडलेली इवलीशी नाव आजही मनाच्या तरंगांत तशीच हेलकावे खात पुढे जात असते.त्याकाळचा पावसाळा काही औरच असायचा. कारण तेव्हा या पावसाळ्यात शाळा नव्याने सुरु होत एका मोठ्या सुट्टीनंतर, त्याआधी ३ महिने ना कोणता क्लास ना अभ्यास आणि एक वैशिष्ट्य म्हणजे जुनेच सखे सोबती तेव्हा नव्याने भेटत. आता सारखे कुठलेही संवादाचे माध्यम तेव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीत उपलब्ध नसे, ना तंत्रज्ञानाच्या हव्याहव्याशा वाटणाऱ्या इतर निरर्थक गोष्टी आणि म्हणून या मोठ्या सुट्टीनंतर रिमझिमणाऱ्या पावसात होणारी अशी ही भेट सर्वानाच लाखमोलाची वाटे जी आजच्या युगात तर दुर्मिळच झाली आहे. गडगडणारा पाऊस असो वा थांबत थांबत येणारा रिमझिम पाऊस...बाल्यातला तो एक अनोखा आणि प्रिय छंद प्रत्येकासाठीच. पाऊस आणि शाळा सुरु होताच मातीच्या सुगंधासोबत आणखी एक गंध आम्हां बालमनांना भारावून टाकत असे... तो म्हणजे नव्या करकरीत पुस्तकांचा एक वेगळाच हवाहवासा वाटणारा नवा सुवास. आजही आठवते मराठीच्या पाठयपुस्तकातली ती पहिली कविता पावसाची ' गवताचे पाते , वाऱ्यावर डोलते' किंवा ' श्रावण मासी हर्ष मानसी '... आणि तीसोबतच मोठ्या जोमाने सुरु होणारा आमचा नवा अभ्यासक्रम.खूप सुंदर आणि हवेहवेसे ते सारे दिवस...आठवणींच्या खाणींमध्ये आजपर्यंत दडवून ठेवलेले. पण त्यावेळचे एक अजूनही न उलगडलेले कोडे म्हणजे कितीतरी वेळ आकाशात दडून बसलेला हा पाऊस नेमका आमची शाळा भरण्याची किंवा सुटण्याची वेळ झाली कि कसा अचानक प्रकट व्हायचा कोण जाणे? कदाचित आम्हां बालमनांना रिझवण्यासाठी... ते बाल्यातले दिवस चिंब चिंब भिजवण्यासाठी.त्या भिजण्यात आजारी पडण्याची भीतीही नसे आणि कोणाची ओरड खाण्याची तमाही नसे. आपल्याच मस्तीत धुंद करत असे तो पाऊस आणि आम्हीसुद्धा बेधडक स्वतःला त्याच्यात सामील करण्यासाठी सदा तत्पर असायचो. आजही रेनकोट घातलेल्या लहान मुलांना ओढत शाळेत घेऊन जाणाऱ्या आयांना पाहिले कि मला मी, माझी आई आणि माझा भाऊ समोर पावसात चालताना दिसतात...निळ्या-गुलाबी रेनकोटमधले बहीणभाऊ उगाच पावसाच्या पाण्याने भरलेल्या छोट्या छोट्या तळ्यांमध्ये उड्या मारणारे... आईची छत्री पागोळ्यांतून येणाऱ्या पाऊसधारेत गर्र्कन फिरवणारे...गरम गरम भजी खात घरासमोर साचलेल्या कमरेपर्यंतच्या पाण्यात लोकांची होणारी मज्जा पाहणारे...फणस घरी आणले कि भर पावसासोबत त्यातील गरे काढून खाणारे...जरा नेहमीपेक्षा जास्त पाणी साचले कि सुट्टीसाठी आतुरलेले. अशा एक ना हजार बालआठवणी...आणि त्यांत मीही आज भिजते आहे...समोरच्या रिमझिम पावसाला एकटक पाहत...अनावधानाने कानांवर येणारे एफ एम वरचे नव्या पिढीचे पावसाळी बालगीत ऐकत,
अग्गोबाई ढग्गोबाई  लागली कळ
ढगाला उन्हाची केवढी झळ
थोडी न थोडकी लागली फार
डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार.... 

बालपणीचा पाऊस हा असा बोलका तर तरुणपणी अनुभवलेला पाऊस आमच्याइतकाच तरणा आणि खट्याळ वाटतो. आणि का नाही वाटणार ? तेव्हा तो प्रीतीचे नवे रंग आमच्या जीवनात घेऊन येतो. त्याच्या मोत्याच्या दागिन्यांमध्ये भिजून सजलेले आपल्या प्रेयसीचे रूप सोन्याने मढलेल्या अप्सरेपेक्षा प्रिय. रिमझिमणारा व्याकुळ घन प्रीतीचे रंग असा काही उधळतो कि रोमरोमी स्वप्नांचे इवले इवले पंख जन्मास येतात आणि एखाद्या फुलपाखरापरी ते सृष्टीच्या पानोपानी बागडतात.या पावसात चिंब होऊन रस्त्याच्या शेजारी उभे राहून मित्र-मैत्रिणींच्या संगतीत टपरीवरचा गरमागरम कटिंग चहा पिणे म्हणजे पावसातली एक पार्टीच. या पार्टीत मोठी भर पडते जेव्हा जवळच विस्तवाच्या आगीत एखादे मक्याचे कणीस मस्तपैकी भाजले जात असेल. मक्याचे ते कमी-अधिक छान भाजलेले मोत्यासारखे टपोरे दाणे...त्यावर लिंबू आणि तिखटमिठाचा एक स्पर्श... अहाहा ! ऐकूनच तोंडाला पाणी सुटते ना ? हा गरम मका खाण्याची अस्सल मज्जा ही या रिमझिमणाऱ्या पाऊसधारांतच. खासकरून जर या पाऊसधारा पिकनिकसाठी गेलेल्या वनराईतल्या किंवा एखाद्या शुभ्र खळखळणाऱ्या धबधब्याशेजारी असतील तर तो स्वाद काही औरच वाटतो.मला आजही आमची लोहगडची पिकनिक आठवते. त्या हिरवळीत, हळदीच्या उन्हात कोसळणारे दूध अंग अंग भिजवत होते आणि आम्ही धुंद होऊन त्या निसरड्या पाऊलवाटेवरूनही सृष्टीचे एक अनोखे तराणे अनुभवत होतो.अशा क्षणी न राहवून अशोक पत्कींनी संगीतबद्ध केलेले अनुराधा पौडवाल यांच्या स्वरांतले  नांदगावकरांचे प्रीतीचे हे मधुर शब्द आणि गीत सहजपणे मनात गुणगुणले जाते... 
अनुरागाचें थेंब झेलती प्रीत-लतेची पाने 
तुझ्या नि माझ्या भेटीमधुनी फुलते धुंद तराणे
असा हा कधी टप टप थेंब वाजवत, कधी धो धो कोसळणारा पाऊस घराघरांवर, कौलारांवर, पानांवर बरसतो आणि मनामनांत एक नवे वेगळेच नाते वसवतो. जुन्या आठवणींना आठवतो आणि नव्या आठवणींना घडवतो... असा हा आबालवृद्धांच्या जीवाभावाचा लाडका पाऊस... 
तो येतो आणिक जातो 
येताना कधी ओलेती आठवण आणितो
अन जाताना नवती आठवण देऊन जातो...

-  रुपाली ठोंबरे .

1 comment:

Blogs I follow :