Thursday, August 31, 2017

पावसातील छत्र

दुपारचे ३. १५ वाजले होते. समोर हा मुसळधार पाऊस कोसळत होता. मी विक्रोळीच्या एका बस थांब्यावर मोठ्या आशेने बसची वाट पाहत उभी. मुंबईत पावसाचा हाहाकार म्हणून सर्वच ऑफिसेस ,शाळा लवकर सुटत होत्या त्या दिवशी. आमचे ऑफिस देखील त्याला अपवाद नव्हते. ३ वाजता आम्ही सर्वच बाहेर  होतो. दिवसा दुपारी देखील काळ्या कुट्ट अंधाराने आकाशाला पांघरले होते. वारा सो सो करून सैरावैरा धावत होता. आणि त्याच्या सोबत पावसाच्या या सरी आवेगाने धरणीकडे झेपावत होत्या. समोरचे सर्वच धूसर झाले होते. जिथे पाहू तिथे फक्त पाणीच पाणी. मुंबईत पावसाचा पहिला जबरदस्त फटका बसतो तो मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलला. त्यामुळेच दररोज ट्रेनने प्रवास करणारी मी आज अशी बस स्टॉपवर उभी होते. मला अगदीच बसने अर्ध्या तासावर असलेल्या ठिकाणी जायचे असल्याने फारशी काळजी वाटत नव्हती. शिवाय बस नाही तर रिक्षा, ओला ,उबेर असतीलच गरज पडली तर ऐन वेळी म्हणून वरवरचे मन जरी निश्चित असले तरी मनाच्या एका कोपऱ्यात काळजीचे खोल काहूर होते.

बराच वेळ झाला तरी नेहमी ५-५ मिनिटांवर येणारी एकही बस नजरेस पडत नव्हती. समोर होता तो फक्त एक कोलाहल- गाड्यांच्या हॉर्नचा , लोकांचा आणि या चवताळलेल्या पावसाचा. जवळजवळ अर्ध्या तासाने एक बस आली ती गच्च भरूनच. बसच्या अगदी खालच्या पायरीवर देखील २ जण कसेबसे उभे होते. हे पाहून क्षणभर बसला पाहून तिच्याकडे धावलेली माझी पावले तिथेच अडखळली . बस तशीच पुढे जात गेली न मी आता नव्या बसच्या वाटेकडे डोळे लावून उभी होते. पुढे १-२... ४ बसेस आल्या पण सर्वांची तीच स्थिती. अजिबात चढायला वाव नाही. शेवटी वैतागून मी माझा मोर्चा रिक्षाकडे वळवला. एका हातात छत्री आणि दुसऱ्या हाताने थांबण्याचे इशारे करीत गेला तासभर तिष्ठत उभ्या असणाऱ्या लोकांमध्ये मी पण सामील झाले. पण बहुतेक रिक्षा भरून येत. आणि ज्या १-२ रिकाम्या मिळत त्यांना माझ्या मार्गावर येण्यात रस नसे. रस म्हणण्यापेक्षा त्यांना आज नको ते भाडे घेऊन पुढे अडकण्यापेक्षा सुरक्षित जागी जाऊन उभे राहणे सोयीस्कर वाटे. अंदाजे १५ -२० रिक्षांकडून नकार ऐकल्यावर मात्र मी माझे नवे अस्त्र बाहेर काढण्याचे ठरवले. पण छे ! ओला , उबेर यापैकी काहीच त्या समयी उपलब्ध नव्हते. तेव्हा मात्र काळजीचे सावट चेहऱ्यावर झळकू लागले. नुसत्या पावलांना भिजवणाऱ्या पाण्याची पातळी आता गुडघ्यापर्यंत पोहोचली होती. इथे तिथे फक्त पाणीच पाणी आणि त्या पाण्यात वाहत येणारा कचरा मनाला अस्वस्थ करत होता खरा पण या अस्वस्थतेपेक्षा समोर आलेले संकट कितीतरी मोठे भासत होते. जवळजवळ दिड तास हा असाच घालवल्यानंतर मी पुन्हा एकदा त्या पाण्यात उतरले. पुन्हा रिक्षा शोध सुरु झाला. डोक्यावरची छत्री आता केवळ नाममात्र उरली होती. त्या कोसळणाऱ्या पावसात चिंब भिजून आता थंडी देखील जाणवू लागली. एकवार मोबाईल पहिला आणि एक नवे टेन्शन सुरु झाले. फोनचा चार्ज केवळ १८ %. ... झाले. आता काय करावे काही सुचेनासे झाले. जाण्यासाठी एक वाहन नाही आणि क्षणाक्षणाला वाढणारा हा पाऊस मनाचे धैर्य खचवू लागला. पुन्हा माघारी ऑफिसमध्ये जायचे का? कि घराच्या दिशेने चालायचे ?या दुहेरी प्रश्नात मन थोडेसे अडखळले पण लगेच त्याने  निर्णय घेतला होता आणि पाऊले घराच्या दिशेने चालू लागली. पाण्याचे रान सपासप उडवत याच वेगाने घराकडे निघाले तर २.५-३ तासांत घर नक्कीच गाठेन असे वाटत असले तरी ते इतके सोपे नाही हे देखील मला ठाऊक होते. चालता-चालता भांडुप कडे जाणारी रिक्षा शोधणे मात्र मी अजिबात थांबवले नाही. जेव्हा रिकामी रिक्षा नकार देई तेव्हा एक प्रचंड कळ मस्तकात जाई. आज नाही तर पुन्हा केव्हा हे लोक गरजूना मदत करतील असे न राहवून सारखे वाटत होते आणि तेच नकळत तोंडावाटे निघे. पण कुणावरही त्याचा काहीच परिणाम नाही. मी आपली पुन्हा चालू लागले पुढे पुढे .... काही अंतर पार केल्यावर एक रिक्षा अचानक थांबली. 'भांडुप?...तिथे जायचे असेल तर या. ही रिक्षा भांडुपलाच जातेय.'त्याक्षणी जो काही आनंद मी,मला झाला तो काय वर्णू मी . मी त्वरेने रिक्षात शिरले. ओले चिंब झालेले अंग थरथरत होते पण एक खूप मोठा दिलासा मिळाला.मी तिला सारखे 'धन्यवाद' म्हणू लागले तसे तिने तिची कहाणी सांगण्यास सुरुवात केली. तीदेखील जवळजवळ १ तास रिक्षासाठी उभी होती तेव्हाच हा भांडुपलाच राहणारा रिक्षावाला तिला भेटला आणि तिचा हा प्रवास सुरु झाला होता. त्यामुळेच ती माझी व्यथा नक्कीच समजू शकली असेल आणि तिने मला लिफ्ट दिली असेल. पुढे तिच्या स्टॉपवर तिला निरोप दिल्यानंतर त्या रिक्षावाल्याने देखील खूप मदत केली. जिथवर त्याच्यासाठी शक्य असेल त्याने मला घराच्या जवळपर्यंत सोडण्याचा प्रयत्न केला.

त्या दिवशी वाटले खरेच संकटात कधीकधी चांगले कर्म असेल तर देव भेटतो असे म्हणतात ते खोटे नाही. ती मुलगी किंवा तो रिक्षावाला त्यांपैकीच तर एक नसतील ना? जीवनात बरेचदा असे प्रसंग घडतात जिथे मन सुन्न होते आणि मार्ग सापडत नाही आणि एखादा तिसराच अनोळखी तुमच्यासाठी नवा मार्ग दाखवणारा दिवा घेऊन येतो अशा सर्वांसाठी कृतकृत्य असायलाच हवे. म्हणूनच म्हणतात कि चांगली कर्मे करा, कोण जाणे पुढे कोणत्या स्वरूपात देव येऊन तुम्हाला भेटेल.

- रुपाली ठोंबरे.

No comments:

Post a Comment

Blogs I follow :