Thursday, July 26, 2018

चिमुकला गुरू...




आज सकाळी सकाळी एक डोळा चोळत आणि नंतर दोन्ही हातांनी आळस देत लहानगा ओम उठला.
तक्रारीच्या स्वरात मला उद्देशून म्हणतो कसा?
"आई गं, हा बघ तुझा अलार्म वाजतो आहे मोबाईलवर."
मीसुद्धा धावत पळत त्याच्यापर्यंत पोहोचले आणि पाहते तो काय?
मोबाईलवर शुभेच्छांच्या मेसेजेसची मालिका सुरु होती.
त्याचे एक तीव्र गायन सुरु होते आणि त्यामुळेच आमचा बाळ आज वेळेपूर्वीच उठला होता.
मोबाईल हाती घेऊन त्याला म्हटले,
" बाळा , अलार्म नाही... काल बंद झालेले नेट अचानक सुरु झाले आणि खूप सारे मेसेजेस एकाच वेळी जागे झाले आणि सुरु झाली त्यांची किलबिल...त्या चिवचिवाटाने तुझी मोडली ना ?"
" हम्म्म... ( एक मोठा हुंकार आणि त्यापाठोपाठ त्याचा त्यादिवशीचा पहिला प्रश्न समोर आला.)आज काय तुझा वाढदिवस आहे ? केक मिळणार आज ?"
ते ऐकून हसूच फुटले मला...ते आवरत म्हटले ,
" नाही रे . पण आज गुरुपौर्णिमा आहे ना...आज गुरूचा दिवस... त्याच शुभेच्छांचा हा पाऊस...."
अपेक्षेप्रमाणे भले मोठे प्रश्नचिन्ह त्या निरागस कोवळ्या चेहऱ्यावर उमटले होते...बोबड्या बोलांतून ते माझ्या कानांवर स्थिरावले.
" गुरू... ? म्हणजे ?"
सकाळी सकाळी घाईगडबडीत अवतरलेला हा प्रश्न...पण त्या शंकेचे निरसन करणे तर भागच होते. मनात म्हटले सोप्यात सोपे उत्तर देऊन या प्रश्नाला पूर्णविराम देऊन टाकूया आणि मी आपले काही शब्द घेऊन उत्तर मनाशी गुंफू लागले...आणि पुढे त्याच शब्दांचा आधार घेऊन चिमुरड्याला समजावू लागले,
" गुरु म्हणजे ते ते सर्वजण ज्यांच्याकडून माणूस काहीतरी शिकतो.... तुझ्या शाळेतल्या टीचर... तुझी आजी ... आबा ... तुझी आई , बाबा... असे सर्व ... "
मी आपली जे जे शिक्षक म्हणून माझ्या त्या क्षणी ध्यानात येत होते त्या सर्वांची नावे आठवून सांगत होती...तोही कुतूहलाने ऐकत होता. त्याच्या बालपणातील अशा सर्व गुरूंची लिस्ट केल्यावर आणि ती त्याला पटल्यावर मला वाटले आता प्रश्न मिटला... पण छे ! एक नवा प्रश्न आमच्या दिनचर्येत अडसर निर्माण करत उपस्थित झाला,
" तुझे पण गुरू आहेत? कोण कोण ?"
पुन्हा एकदा तीच नाती माझी या संबोधनाने त्याला सांगावी लागली...आठवून आणखी काही नावे अधिक होत गेली...नकळत का होईना आज ओममुळे आजच्या शुभ दिनी सकाळीसकाळीच माझ्या साऱ्या गुरूंचे नामस्मरण झाले. त्यानंतर बऱ्यापैकी समाधानाची एक लकेर त्याच्या चेहऱ्यावर उठून आली आणि बिछान्यात लोळत पडलेला तो खाली उतरला. चालताचालता तो स्वतःशीच सांगत होता,
" म्हणजे... गुरु म्हणजे ती सर्व माणसे जी आपल्याला काहीतरी शिकवतात.... पण मग ते जे शिकवतात पण माणूस नसतात ते ?... "
झाले... एक नवा प्रश्न आ वासून सामोरी उभा ठाकला.
" आईईई... काल मी त्या पुस्तकातून बघून बघून चित्र काढले ना...?"
"हो, पण मग आता त्याचे काय ?"- आईच्या स्वरांत सकाळची घाई आणि त्यामुळे थोडीशी नाराजी जाणवत होती.
" मी एकटाच होतो...म्हणजे काल मला ते चित्र फक्त त्या पुस्तकाने शिकवले. मग ते पुस्तक पण माझा गुरु आहे  का ? पण ते तर माणूस नाही ना ?"
चिमुरड्याच्या या प्रश्नाने मात्र मी चपापले... एवढ्याश्या मुलाच्या मनात हा किती मोठा विचार... मलाही थोडे कुतूहल वाटले... आणि थोडी मज्जा पण...त्याची अंघोळ घालता घालता त्याच्या अशा कितीतरी प्रश्नांना भरतीचे उधाण आले आणि त्या प्रश्नांची उत्तरे देता देता माझ्याही मनातील विचारांना चांगली चालना मिळाली. आणि मी उत्तर दिले ,
"अरे वाह! किती हुशार. हो हो , पुस्तके ही देखील आपले गुरूच आहेत.आणि हो , ती पुस्तके ज्या लेखकांची देण असते ते सर्व देखील अप्रत्यक्षरित्या आपले गुरूच कारण त्यांच्या विचारांतूनच आपण घडत असतो."
स्वतःचा बालविचार आईलाही पटला हे पाहून छोट्या युवराजाच्या गालावरची कळी खुलली. तो आणखी उत्साहात म्हणाला,
" मी गोष्टी, कविता ,मनाचे श्लोक यातूनही खूप काही शिकतो. ते सर्व पण मला शिकवतात म्हणजे ते पण माझे गुरु , हो ना ?"
मी  हासत होकारार्थी मान हलवली. ओम पुन्हा विचारात गुंतला आणि त्याने लगेच काहीतरी आठवून विचारले ,
" अगं आई , त्यादिवशी तू म्हणालीस बघ ... त्या मुंगीकडून शिकायची ती जिद्द , आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक प्रयत्न करण्याची चिकाटी... म्हणजे ती मुंगी पण ... ?"
यावर मला थोडे हसू येत असले तरी एक वेगळे कौतुक वाटत होते. 
" हो ... प्राणी , पक्षी .. ही झाडे ,आकाश , धरती, सूर्य ,तारे ... हे आपले सर्व निसर्गमित्र आपल्याला सतत काहीतरी शिकवत असतात...त्यामुळे ते सर्वही गुरुच आहेत.त्यामुळे त्यांच्याबद्दल प्रत्येकाने नित कृतज्ञ असावे. तू  ग. दि. माडगूळकरांची ती कविता ऐकली आहेस का ? आणि मी ती कविता गुणगुणू लागले ,
बिन भिंतींची उघडी शाळा 
लाखो इथले गुरू ... 
झाडे,वेली,पशू ,पाखरे 
यांशी गोष्टी करू !" 

माझ्यासोबत ओमसुद्धा हे नवे गाणे आवडीने गाऊ लागला. गाणे म्हणता म्हणता मी स्वतःशीच म्हटले ,
"खरेच या जगात प्रत्येकजणच कोणाचा तरी गुरु असतो आणि कोणाचातरी शिष्य असतो. ही दोन्ही नाती एखाद्या स्फटिकाप्रमाणे निर्मळ असतात.... "
माझे असे स्वतःशीच पुटपुटणे जिज्ञासू ओमसाठी एका नव्या प्रश्नाचा स्रोत होते ,
"म्हणजे मी पण कुणाचा तरी गुरू ?.... वाहव्वा ! कुणाचा ?"
मी हसले आणि म्हटले ,
" हो आहे ना... माझा बाळ माझाच गुरू आहे."
"तुझा ?" - ओम . 
" हो.... मग काय तर!  किती काही शिकते मी तुझ्याकडून आणि तुझ्यामुळे.... अगदी प्रत्येक क्षणाला. प्रत्येक आई ही जशी प्रत्येक मुलाची प्रथम गुरू असते... अगदी तसेच येणारे मूल हे त्या आईसाठी एक नवा, खूप काही शिकवणारा चिमुकला गुरू असतो... फक्त या लहानग्यांकडून शिकण्याची कला आपणा मोठ्यांमध्ये असली पाहिजे... " 
हे बोलणे ऐकून ओम खुद्कन हसला...एक वेगळाच आनंद त्याच्या चेहऱ्यावर विराजमान दिसत होता.आनंदाने उड्या मारत त्याने मघाशी अर्ध्यावर विरलेली माडगूळकरांची कविता पुन्हा तेथूनच गुणगुणण्यास सुरुवात केली.... 

बघू बंगला या मुंग्यांचा, सूर ऐकुया या भुंग्यांचा
फुलाफुलांचे रंग दाखवील फिरते फुलपाखरू

सुगरण बांधी उलटा वाडा, पाण्यावरती चाले घोडा
मासोळीसम बिनपायांचे बेडकिचे लेकरू

कसा जोंधळा रानी रुजतो, उंदीरमामा कोठे निजतो
खबदाडातील खजिना त्याचा फस्त खाऊनी करू

भल्या सकाळी उन्हात न्हाऊ, कड्या दुपारी पर्‍ह्यात पोहू
मिळेल तेथून घेउन विद्या अखंड साठा करु 


- रुपाली ठोंबरे.
 

6 comments:

  1. Khupach chan rupa👍👍👍👍👍👍

    ReplyDelete
  2. खूप खूप छान. लहानगा गुरु.

    ReplyDelete
  3. खुप सुंदर निरागस छोटा गुरू आवडला मला👌🙏

    ReplyDelete

Blogs I follow :