Wednesday, July 8, 2015

"Are you still carrying her ? "


कालच झी मराठी या वाहिनीवर सध्या गाजत असलेली " जुळून येती रेशीमगाठी " ही मालिका पाहण्यात आली . कालच्या भागात या मालिकेतील अतिशय अनुभवी आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व असलेल्या नाना या पात्राच्या तोंडी ऐकलेली एक झेन कथा आज इथे सांगावीशी वाटते . एकाग्रता आणि निर्विचार होवून घटनांकडे पाहण्याची क्षमता, या २ तत्वांच्या आधारे केलेले ध्यान आपल्याला मर्माकडे घेवून जाते . आणि झेन गोष्टी अशा अचूक अनुभवांचे मर्म सांगणाऱ्या गोष्टी. 

तर ती कथा अशी होती कि ,

एकदा दोन झेन साधक आपली दिलेली जबाबदारीची कामे संपवून  मठाकडे निघालेली असतात. बरेच अंतर कापायचे असते आणि  चालत जायचे असते . ते आपले मजल दरमजल करत  डोंगर-दऱ्या,रान-वने पार करत चालत असतात . एका ठिकाणी त्यांना आडवी येते नदी . आता ही पार करून पार करून जावे लागेल . त्यात दिवस पावसाचे असतात . पाऊस वाढला तर पार करणे अशक्य होईल म्हणून ते लगेच नदीत उतरतात .

इतक्यात त्यांना एका मुलीची हाक ऐकू येते . ते मागे वळून पाहतात .
एक सुंदर मुलगी  येते आणि म्हणते ,

               " हे बघा , मला नदीच्या त्या पलीकडे जायचे आहे.  पण मला एकटीला काही हे जमणार नाही .शिवाय पावसाचा वेग वाढला तर नदीचा जोर वाढेल आणि मला इथेच थांबावे लागेल .तर मला तुम्ही उचलून त्या पलीकडे न्याल का ?"

त्या दोघांपैकी एक मोठा साधक क्षणाचाही विलंब न करता तिला लगेच आपल्या खांद्यावर उचलून घेतो आणि दुसरऱ्या  साधकाला मागे येण्याचा इशारा करतो. आणि अशाप्रकारे ते तिघे ती नदी पार करून पलिकडे येतात . तिथे तो साधक तिला खाली उतरवतो आणि ती अतिशय नम्रतेने खाली मान लववून अभिवादन करून धन्यवाद मानून तिथून निघून जाते . हे दोघे साधकही आपला मुळचा प्रवास करत मठाच्या दिशेने चालू लागतात.बराच वेळ असाच गप्प गप्प जातो .

मग जसा आश्रम जवळ येतो तसा तो छोटा साधक मोठ्या साधकाला विचारतो ,
              " मठात तू ही गोष्ट  सांगणार आहेस का ?"
मोठा साधक साधक विचारतो ,
               " कोणती गोष्ट ?"
 तेव्हा छोटा साधक त्याला म्हणतो ,
             " अरे हेच जे तू काही वेळापूर्वी केलेस . आपल्याला स्त्रियांना स्पर्श करणे व्यर्ज्य आहे ना . "
तेव्हा तो मोठा साधक स्मित करत उत्तरतो ,
            " अरे, मी तर त्या मुलीला कधीच त्या दुसऱ्या काठावर उतरवलं पण तू मात्र अजूनही तिला खांद्यावर घेतलेलं दिसतंय ."

या गोष्टीचे दोन साधे सरळ अर्थ आहेत .
एक म्हणजे गोष्टी कधीच संपून गेलेल्या असतात पण आपण उगीचच त्या गोष्टीचं ओझं मनावर बाळगत  असतो .
आणि दुसरा अर्थ म्हणजे साध्या सरळ गोष्टींकडे आपले मन ढगाळलेल्या नजरेने पाहत असते . आणि आपल्याला त्या गोष्टी गढूळ वाटतात .

खरेच प्रत्येकाला विचार करायला लावणारी सुंदर गोष्ट आहे . आपल्या सोबतही बरेचदा असेच होते . पूर्वी घडून गेलेल्या घटनांना आठवून  किंवा त्यांचे सल मनात बाळगून आपण आपले आणि इतरांचेही वर्तमान बिघडवत असतो. आणि कित्येकदा पाहण्याच्या चुकीच्या दृष्टिकोनामुळे आपल्याला जगही चुकीचे भासते आणि यातूनच पुढे बरेचदा होत्याचे नव्हते करून बसतो .

 तेव्हा प्रत्येकाने थोडा वेळ काढून एकदा विचार करून पहा

                         "Are  you still carrying her? "

No comments:

Post a Comment

Blogs I follow :