Tuesday, September 22, 2015

त्याशिवाय माणसा, नको मागू पाऊस

यावर्षी गणपती आला आणि त्यासोबत पावसाचेही अगदी समाधानकारक आगमन झाले. आणि आपण पुन्हा निसर्गाला गृहीत धरू लागू. पण हे किती वर्षे सुरु राहील. इमारतींच्या जाळ्यांमुळे आणि झाड-वनांच्या कमतरतेमुळे कधीतरी हा आनंदाचा क्षण दुर्मिळ होऊ शकतो. आणि त्यावेळी जीवनासाठी गणपतीपुढे कितीही साकडे घातले तरी तो शेवटी हतबल होऊ शकतो . ही वेळ येण्यापुर्वीच त्याच्या प्रसन्नतेला आपण वाट करून द्यायला नको का ?
पण आपण त्यालाही दहा दिवस थाटात घरी आणून जाताना चुकून का होईना पण त्याची अवस्था केविलवाणी करतो. अनंत चतुर्दशीनंतर चौपाटीवर गेल्यास माझ्या बोलण्यातले तथ्य तुमच्या ध्यानात येईल. त्यामुळे प्रेमाने , भक्तिभावाने आणलेली मूर्ती पूर्णपणे जलाशयात विलीन होईल याची काळजी प्रत्येक गणेशभक्ताने घेतलीच पाहिजे.नाहीतर तुम्हीच विचार करा जर  इथेतिथे अस्ताव्यस्त पडलेले आपले अवशेष पाहून पुढच्या वर्षी यायचे वचन त्याने पाळलेच नाही तर ?


असा नटूनथटून ,लगबगीने
कुठे निघाला तू असा ऐटीत
शिव-सती पुसे बाळासी
कुठे निघाला तू असा ऐटीत

बाळ गणेश वदे लडिवाळपणे
"वर्ष झाले पृथ्वीवर आता जाऊन
पुढच्या वर्षी नक्की येण्याचे वचन
भाद्रपदात येतो आता पूर्ण करून

मूषक आहे सोबतीला संगे
चिंता नसावी माते,
आपल्या माणसांतच जातो
खूप विश्वासाचे आहे नाते

खात्री देऊन  सांगतो मी
बाळ तुझा राहणार नाही उपाशी
आवडीचे सर्व सर्व घेऊन
जमतील भक्त माझ्याच पाशी

या वर्षी विचार करतो
घेऊन जातो वरूणदेवालाही सोबत
आतुरले त्याच्यासाठीही सर्व
कराया मोठ्या मनाने स्वागत

तो ही येण्या तयार झाला लगेच
घेऊन ढगांचा ढोल आणि बिजलीचा ताशा
म्हणे , "माग तुझ्या भक्तांसी
निसर्ग जपण्याचे शेवटचे वचन, एक आशा 

जीवनाचे मोल आता तरी कळेल
अशा आशेने देतो पुन्हा मोठा पाऊस
घोषणा करीन यावर्षी, झाडे लावा भरपूर
त्याशिवाय माणसा, नको मागू पाऊस"

असे निघून इथून सरळ जाऊ पृथ्वीवर
आनंदतील सारेच, पाहून लाडका बाप्पा
येताना आलो जर संपूर्ण शरीरासंगत
खरे सांगतो माते, मारू खूप खूप गप्पा "- रुपाली ठोंबरे

3 comments:

  1. Good one. Nice message everyone should read and spread. Nature is God and we should take care of it. Nice Rupali.

    ReplyDelete
  2. Khup chan atishay bodh purvak ani Khup chan kavita ahe. ..

    ReplyDelete

Blogs I follow :