पहाटेची थंड दुलई,
झोंबणारा गारवा
रोज भासतो नवा,
वाटतो तो हवा हवा
दिशदिशांत विहरल्या,
गार त्या हजार लाटा
हरवल्या धुक्यात साऱ्या,
दिशांतल्या पाऊलवाटा
माळरानी पानोपानी बहरले,
सोहळे हिरवे नवे
फूलपान नटले सारे आज,
सप्तरंगी अनंत दवांसवे
पावलांस स्पर्श दवबिंदूंचा,
मनात दाटे मृदू ओलावा
शिळ घालीत येई वारा ,
दूर जणू वाजे हरीचा पावा
अशा गारव्यातही
ऊन कोवळे वाटे हवे
रोजचेच असूनही सारे
रोज वाटावे जग नवे
- रुपाली ठोंबरे .
वाटतो तो हवा हवा .. nice one
ReplyDeleteखुप सुन्दर....
ReplyDelete