Monday, December 7, 2015

तो मला आणि मी त्याला पाहत उभे


रात्रीचे ११ वाजले. काळोखाची चादर नक्षत्रांची रुपेरी नक्षी घेऊन जगावर पांघरली जात होती . अंगाशी बिलगून जाणाऱ्या गारव्यासंगे येणाऱ्या दारावरच्या मधुमालतीचा सुगंध मनाला नेहमीसारखाच धुंद करत होता….जणू तो झोपी जाण्याचा नियमित संदेश देत होता . रातकिड्यांच्या किरकिरीतही एक मुग्ध शांततेचा आभास होत होता. एव्हाना आमच्या घरातही आवारावर सुरु झाली होती . हळूहळू सारे घरच निद्रेच्या अधीन झाले . आणि मग मीही बाळ झोपी गेल्याची शाश्वती करून घेत हळूच त्या खोलीत शिरले. खोलीत पसरलेला अंधार खिडकीतून आत डोकावू पाहणाऱ्या चांदण्या कवडश्याला अगदी आनंदाने सामावून घेत होता. मी लाईट लावला आणि क्षणात त्या दोघांचे अस्तित्वच नष्ट झाले . आता लख्ख प्रकाशात सर्व भिंती चमकत होत्या. सगळीकडे सर्व काही अस्ताव्यस्त दिसत असले तरी एक विचित्र रचनेत असलेली ती खोली मला नित्य प्रिय होती.

मी मनाशी ठरवल्याप्रमाणे जास्त वेळ न दवडता थेट त्याच्या समोर जाऊन थांबले. तो त्याचा पांढराफटक चेहरा घेऊन तिथेच ऐटीत उभा होता. काल घरी आल्यापासून त्याच्याकडे लक्ष द्यायला मुळी वेळच न मिळाल्याची मनाला कालपासून डसलेली अस्वस्थ खंत आता धुसर होत होती.क्षण…मिनिट… जवळजवळ कितीतरी वेळ तो मला आणि मी त्याला नुसते पाहतच होतो. दोघांच्याही चेहऱ्यावर एक वेगळीच उत्सुकता जाणवत होती. माझ्या मनात येईल त्या दिशेला त्याला वळवून त्याच्या विविध मुद्रा पाहण्यात मी गुंग झाले. तो ही निमुटपणे माझ्या हालचालींना न्याहाळत मख्खासारखा उभा होता. एकदम पेटून उठलेल्या मोहोळाप्रमाणे मनात कितीतरी विचार त्याक्षणी घोंगावत असले तरी माझ्या अचूक भावनांना वाट मोकळी करण्यास का कुणास ठाऊक मन पुढे धजावत नव्हते. स्वतःला व्यक्त करण्यात मला खूप वेळ लागत होता. त्याच्यावरची नजर जराही न हलवता त्याला पाहता पाहताच एक दोन पुस्तके चाळली…मोबाईलवरच इंटरनेटच्या फाइली डोळ्यांसमोरून नेल्या आणि काहीसे गवसल्यागत मी पुन्हा त्याच्याकडे धावून आले.

त्याच्याकडे पाहताना कधी असे वाटे कि तोही माझ्याइतकाच फार उत्सुक आहे तर कधी वाटे थोडा घाबरलेला असेल… पण आता त्याचे भविष्य खरेच माझ्याच हाती आहे ही जाणीव मनाला पुन्हा एकदा झाली आणि मीही नव्या उमेदीने पुढे सरसावले . त्याच्या त्या निर्विकार चेहऱ्यावरून हळूच हात फिरवत असताना त्याने इथपर्यंत येण्यासाठी किती यातना भोगल्या असतील याची जाणीव सहज मनाला स्पर्शून गेली. खरेतर मी कोणी मोठी चित्रकार नाही पण तरी आज मी याला नवे अस्तित्व देणार होते , नवे रंग ,नवे रूप… सर्वच अगदी निराळे,जगावेगळे देणार होते.

मनाशी काहीसा विचार करत मी हलक्या हाताने त्याच्यावर काही रेखाटले. पण तत्क्षणी त्याचा तो पडलेला, उदास चेहरा लगेच माझ्या ध्यानी  आला…. काहीतरी चूक झाली हातून . म्हणून थांबले...सावरले थोडे ... त्यालाही आणि मला स्वतःलाही. पुन्हा नव्याने नवे आकार काढू लागले तसे त्याची गालावरची खुललेली खळी हलकेच मला जाणवली आणि ती पाहून माझ्याही चेहऱ्यावर एक स्मित हलकेच उमलले. लाल ,केशरी ,पिवळ्या ,निळ्या जांभळ्या अशा नाना रंगाचा कुंचला त्याला जसजसा स्पर्शून जात होता तसतसा तो आणखी टवटवीत दिसत होता.त्या मध्यरात्री जेव्हा अवघी अवनी निद्रेच्या खोल डोहात शिरून स्वप्नांच्या दुनियेत शिरत होती पण मी मात्र जागेच होते एखाद्या रातराणीपरी … माझ्या स्वप्नातल्या दुनियेला इथे जगासमोर दिलखुलासपणे मांडण्यासाठी, मनातल्या भावना मुग्धपणे त्याला सांगत मी या रंगसोहळ्यात अगदी तल्लीन झाले होते. सोहळाच तो … जणू होळीच… रंगांची , नव्या कल्पनांची ,गडद-पुसट छटांची,आनंदाची,स्वप्नांची,भावनांची….  मी मला आवडतील त्या रंगांची त्याच्यावर अगदी मुक्तपणे उधळण करत होते आणि तो ती अचूक झेलून घेत दुपटीने माझ्यावर आनंदाची उधळण करत होता.

शेजारच्या माशिदीतून येणाऱ्या अझानचे ते पहिले स्वर कानी पडले तसे रात्रीच्या या रंगलेल्या खेळातून बाहेर पडण्याची वेळ आली असे प्रकर्षाने जाणवले. सहज खिडकीतून बाहेर डोकावले आणि त्या पूर्वेकडून पार डोंगराडून येणाऱ्या सुर्यनारायणाचे दर्शन या नेत्रांस घडले तसे झोपेचे अस्तित्वच आता नष्ट झाले ही चाहूलही मनास लगेच लागली. प्राजक्त अंगणात आता सांडला होता … त्याचा तो मंद सुगंध आता रात्रीच्या रातराणीलाही लाजवेल अशा अविर्भावात चोहीकडे पसरत होता. पक्ष्यांची किलबिल एक नवा उत्साह निर्माण करत आकाशी झेपावत होती. आकाश… सप्तरंगांत न्हाणारे … जसे माझे चित्र… कॅनवासवरचे.… काल रात्री काढलेले… पांढऱ्या रंगावर मात करत उमेदीने  नव्या रंगांमध्ये नटलेले…उगवणाऱ्या नव्या पहाटेची किरणे अंगावर पांघरून अधिकाधिक नवे वाटणारे …

आजही तो असा ऐटीत पण आत्मविश्वासाने समोर उभा आहे… मुग्धपणे एक संवाद नव्याने साधत. त्या अडगळीच्या खोलीतून थेट दिवाणघरात प्रवेश मिळाल्याने स्वारी भारीच खुश आहे. असे आनंदाचे उधाण यायलाच हवे कारण आता तो मख्खपणे उभा राहणारा नुसता निस्तेज कॅनवास नाही तर येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेणारे ,एक गूढ सदा नव्याने सांगणारे अर्थपूर्ण चित्र आहे.

क्षण… मिनिट… जवळजवळ तासभर तो मला आणि मी त्याला पाहत आहे. पण या नजरेत आता एक कृतज्ञता, समाधान, प्रसन्नता दडली आहे आणि ती मला सहज जाणवते आणि कदाचित त्यालाही.

- रुपाली ठोंबरे

8 comments:

 1. खुपच छान.... पोस्ट मधले सारेच शब्द मनाला मुग्ध करणारे आहेत...बहुतेक अप्रतिम शब्द ही अपुरा पडावा ह्या पोस्ट बद्दल लिहताना

  ReplyDelete
 2. Khoopach chaan lekh aani Surekh shabda rachana.

  ReplyDelete
 3. अप्रतिम.................

  ReplyDelete
 4. सुंदर, प्राजक्ताचा सडा पडावा तसे शब्द शब्द पडलेत एका सुंदर रचनेत.

  ReplyDelete
 5. फार सुंदर रचना,अप्रतिम

  ReplyDelete
 6. तुझे शब्द वाक्यात रंग भरतात आणि तुझे रंग शब्द बनून बोलतात

  ReplyDelete

Blogs I follow :