Friday, March 18, 2016

कॉफीची एक वेगळीच अदा


समोर होता चॉकलेटी रंगात थोडे वेगळेपण घेऊन आलेला कॉफी रंग.  आणि त्यासोबत घरभर पसरत होता याच कॉफीचा मनाला एक प्रकारचा तजेला देणारा सुगंध . कमी अधिक प्रमाणात पाण्याची सोबत घेऊन कॉफीपासून तयार झालेल्या गडद-फिकट रंगछटा मनसोक्तपणे त्या पांढऱ्या कँनव्हासवर उधळल्या जात होत्या. एका मैत्रिणीला तिच्या निरोपसमारंभात दिल्या जाणाऱ्या एका सुंदर भेटीसाठी.

जेव्हापासून ती जात असल्याची चाहूल लागली, मनास काही तरी हरवून जाईल असे वाटू लागले होते . निदान तिच्या आठवणींत आपण कुठेतरी असावे म्हणून काहीतरी कलात्मक देण्याचे ठरवले . खास मैत्रीण म्हणून आता चित्रातही काहीतरी खास करावेसे वाटत होते. आणि त्याच क्षणी कधीतरी ऐकिवात आलेली "कॉफी पेंटिंग " ची कल्पना सुचली. आणि झाले… इंटरनेट ,पुस्तके असे इथे तिथे शोधाशोध सुरु केली आणि नेस्कॅफे कॉफी , एक-दोन ब्रश आणि कँनव्हास घेऊन मी लगेच सुरुवात केली … काही वेगळे निर्माण करण्यास .

पहिला प्रयत्नच तो. छोट्या-मोठया चुकांमधून वाट काढत शेवटी हव्या त्या ठिकाणी येऊन पोहोचले . जशी उगवत्या सूर्याच्या प्रत्येक किरणासोबत या सृष्टीत रंगबिरंगी फूले उमलत जातात, अगदी  तसेच विविध कॉफी-छटांमध्ये माखलेला तो कुंचला जसजसा कँनव्हासला स्पर्शत गेला, तशी एकाच रंगाची पण विविध मोहक रंगछटांमध्ये भावनांची फूले त्या कँनव्हासवर उमटत गेली. एकेक करत ही फुले इतकी जमा झाली कि त्यांना एका परडीची गरज निर्माण झाली आणि या निकडीतूनच एक परडी इथे समाविष्ट झाली . चित्रकारासमोर जितका वेळ चित्र आणि ब्रश, रंग आदी उपलब्ध असतात , ते चित्र पूर्ण झालेले नसते . तो सतत नवनवीन बदल घडवून आणत त्याच्या कलात्मकतेच्या नजराण्याला अधिकाधिक नवेपण देण्याच्या प्रयत्नात असतो . तसेच काहीसे माझे होत होते. सभोवतालची नक्षी , कोपऱ्यातला पडदा ,धवल रंगाच्या काही दिलफेक छटा हे सर्व त्याचाच सुंदर परिणाम … सुंदरच, कारण या सर्वांतून सुमारे दीड तासाच्या अवधीत " ALL THE BEST " शुभेच्छेसहित निर्माण झालेले हे चित्र पाहून मैत्रिणीने " अप्रतिम" हाच शब्द उद्गारला . . . सोबतीला होता तोच कॉफीचा हवाहवासा वाटणारा मंद गंध, भावनांच्या आणि रंगांच्या निरनिराळ्या छटा घेऊन . 

-  रुपाली ठोंबरे

3 comments:

 1. Nice painting rupali ... really a different approach ...

  ReplyDelete
 2. Thank you so much Rupali :D
  Its such a beautiful painting and so is this blog :)

  ReplyDelete
 3. कॉफ़ी पेंटिंग...पहिल्यांदाच हां पेंटिंग चा प्रकार समजला...खुप छान...पेंटिंग मधल्या रंगा पासून ते पोस्ट मधील शब्द ही सुरेख

  ReplyDelete

Blogs I follow :