Tuesday, March 22, 2016

साजरी करू…ही पुष्पपंचमी


काल मुलाची डायरी उघडली आणि आजच्या नव्या पानावर त्याच्या शिक्षिकेच्या टपोऱ्या अक्षरांत लिहिलेली  एक सूचना डोळ्यांसमोर आली ," Kindly send colourful flower petals for holi celebration". बघता क्षणी 'होळी आणि फूले' हे समीकरण थोडे विचित्रच वाटले. पण आणखी काही क्षण विचार केला तेव्हा हे माझ्याही बुद्धीस पटले आणि ही कल्पनाही आवडली.



होळी हा सण सर्वांचाच अगदी आवडीचा. वाईट प्रवृत्तींवर चांगल्या गोष्टींचा विजय होतो या दिवशी . गेल्या वर्षीचे सर्व वाईट गोष्टींचे होलिकादहन होते.आणि दुसरा दिवस नव्याने आनंद घेऊन येतो . म्हणून तोही तितक्याच आनंदाने साजरा करायला हवा… पण कुणालाही अपायकारक ठरणार नाही अशा तऱ्हेने.

गेल्या कित्येक वर्षांपासून हा दिवस रंग,फुगे ,पाणी आदी वापरून साजरा केला जातो .खरेच आपल्यासोबतच मांजर-कुत्र्यासारख्या मूक प्राण्यांवर उधळलेल्या रासायनिक रंगामुळे त्यांना नंतर होणारा त्रास क्वचितच एखाद्याच्या ध्यानात येतो. हल्ली रासायनिक रंगांच्या आड गुलालाचा तो गुलाबी रंग कुठेतरी हरवलेला दिसतो. एखाद्याच्या जीवावर बेतेल अशा फुग्यांचा ,रासायनिक रंगांचा वापर टाळून नवे काहीतरी कोणालाही न बाधणारे तरी सर्वाना आनंद देणारे असे काही शोधायला हवे.यावरूनच गेल्या वर्षी घडलेला एक प्रशंसनीय प्रसंग आठवला.

आमचे कुटुंब तसे धुलीवंदनाच्या दिवशी दरवाजे बंद करून घरात बसणारे .… रंग -पाण्यापासून अलिप्त राहणारे. आणि अचानक दरवाजावर थाप ऐकू आली . शेवटी नाही-हो करता करता दरवाजा उघडला तर समोर वरच्या मजल्यावर राहणारे गृहस्थ आपल्या समस्त परिवारासोबत हजर.… हातात रंगीबेरंगी रंगानी भरलेली थाळी … मिठाईचा मोठा पुडा आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रसन्नतेचा भाव घेऊन. सुरुवातीला काही कळलेच नाही . त्यांच्या हातातले रंग पाहून आमचे अर्धे कुटुंबीय तर आत लपून होते .पण पुढच्याच क्षणी "होळीच्या खूप खूप शुभेच्छा " अशा शुभेच्छा देत प्रत्येक रंगाचे बोट चेहऱ्यावर लावत एकदम गळ्यातच पडले. आम्हाला नंतर समजले कि त्या थाळीत कोणतेही बाजारी मिळणारे रंग नसून गुलाल,चंदन ,हळद इत्यादी निसर्गाची खरी देण होती. अशा नैसर्गिक रंगानी खेळलेली होळी खरेच खूप आनंददायी आणि अविस्मरणीय ठरली. 

जे फुगे,रंगांबाबत तेच पाण्याच्या अपव्ययाबद्दल. सध्याची परिस्थिती जिथे प्यायलाही कित्येकदा पाणी उपलब्ध नाही तिथे हा फुलांच्या पाकळ्यांचा पर्याय खूपच सुंदर आहे .शिवाय अशा उपक्रमाने फुलांच्या शेतीस आणि अंतिमतः शेतकऱ्यालाच फायदा होतील, जी आजची एक गरज आहे . इतक्या वर्षांपासूनची जुनी प्रथा सोडून कधी हेही नवे काही करून पहावयास हरकत नाही. हे थोडे खर्चिक नक्कीच असेल पण आज पाणी हे जीवन आहे आणि हे जीवन खरेच अनमोल आहे.त्यालाही वाचवण्याचा आटापिटा दाखवला पाहिजे आणि ते वाचवलेच पाहिजे . तेव्हा या वर्षी साजरी करून पाहूया ही रंगपंचमी…पुष्पपंचमी…फुलांच्या मोहक रंगानी रंगलेली.… फुलांच्या मंद गंधाने दरवळलेली .

- रुपाली ठोंबरे

No comments:

Post a Comment

Blogs I follow :