Wednesday, February 14, 2018

तो आणि....ती (भाग २)



तो...घाईघाईतच थेट त्या टर्मिनल मध्ये आत आला.सकाळपासून सामान जमा करताना झालेल्या छोट्याशा गोंधळामुळे त्याला आधीच उशीर झाला होता.साधारण दीड तासांपासून चाललेल्या धावपळीला थोडा स्वल्पविराम मिळाला आणि त्याने आपला कोट अंगापासून विलग केला. त्याच्या एका हातात आता त्याने कोट घेतला होता आणि दुसऱ्या हातात धरली होती ट्रॅव्हेलिंग ट्रॉली बॅग. तीदेखील तो जाईल तिथे त्याच्यापाठोपाठ फिरत होती. पण त्याची नजर सारखी चहू दिशांना फिरत होती. जणू तो काहीतरी शोधत होता.पण त्याला जे हवे होते ते सापडत नव्हते किंवा ते सुस्थितीत नव्हते त्यामुळे तो थोडा हताश होऊन क्षणभर तिथेच थांबला. मनगटावरच्या घड्याळावर एक नजर टाकली आणि एकदम काही आठवल्यासारखे टर्मिनलच्या दुसऱ्या दिशेला जाऊ लागला.

ती... इथे बाहेर तशीच विचारमग्न होऊन बसून राहिली होती.त्याने पाहिले असेल का मला ? कदाचित पाहिलेच नसेल नाहीतर लगेच जवळ आला असता . मी तर समोरच होते ना मग मी कशी बरे दिसली नसेल त्याला ? विसरला असेल का मला भेटायचे ठरले होते ते ? छे छे ! असे कसे विसरू शकतो तो मला ? काही दिवसांपूर्वीच तर प्रपोज केले होते त्याने मला ! पण मी हो कुठे म्हटले ? राग तर आला नसेल ना ? पण इतका राग ? तो का बरे ? फोन करणार होता विमानतळावर पोहोचताच पण आता २ तास होत आले ... काय झाले असेल नक्की ? कुठे अडकला तर नसेल ना ? पण मी पाहिले तेव्हा तर सर्व ठीकच वाटत होते ? मला टाळले असेल का ? पण का ? मीच जाऊन भेटते त्याला... विचारते नक्की काय सुरु आहे . नको , मला खरेच गरज आहे का ? का विचारावे ? पण आता बराच वेळ झाला अर्ध्या तासात इथून निघावे लागेल नि मग सर्वच राहून जाईल. मी जाऊन त्याला भेटते... कमीतकमी माझे मन शांत होईल... अशा असंख्य प्रश्न ,विचारांनी तिचे मन आता गुदमरून गेले होते.

ती तशीच ताडकन  उठली आणि त्या टर्मिनलमध्ये आली. तिच्या नजरेची भिरभिर क्षणभरही थांबली नाही. काही अंतरावर तिला तीच आकृती पाठमोरी उभी दिसली. ती जवळ आली आणि त्याच्या खांद्यावर अलगद आपला तळवा ठेवला,
 " तू... ? विसरलास ना मला ? मला वाटलेच होते हे असेच होईल. "
तिचा आवाज आता भरला होता.त्याने तो स्पर्श ओळखला आणि तिच्या दिशेने वळला ... तो तिला पाहतच राहिला. तिचे डोळे अश्रूंनी भरलेले होते. अबोली रंगाच्या कुर्त्यांवरच्या गडद रंगाच्या जॅकेटमुळे तिचा गोरा रंग विमानतळावरच्या लाइटांच्या लखलखाटात अधिक गोरा भासत होता. तिचे कुरळे केस वाहत नसलेल्या वाऱ्यावरसुद्धा उडत होते...
" अरे , मी काय बोलते आहे ? लक्षच नाही आहे माझ्याकडे तुझे. चल मी जाते मग ."
माघारी फिरणाऱ्या तिचा हात त्याने लगेच हातात घेऊन तिला तिथेच थांबवले
"अगं , वेडी आहेस का ? मी तुला कसे विसरेन बरं ? बघ मी इथे तुलाच शोधत होतो."
" हो का ? मग मला पाहूनसुद्धा तू माझ्या समोरून निघून गेलास. याला काही उत्तर? तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती..... "
आणि हे बोलताना आता तिच्या डोळ्यांच्या अश्रूंचा बांध शेवटी भावना रोखून धरू शकला नाही.
" हे बघ , तू म्हणतेस तसे खरेच मी तुला पाहिले नाही. तुला फोन करायचे असे ठरले होते ना आपले. तोच करण्यासाठी इथे आलो होतो मी. हे बघ, सुट्टे पैसे अजून हातात तसेच घेऊन आहे मी."
त्याने त्याच्या हातातील खणखणणारी नाणी मूठ उघडून तिच्यासमोर धरली.ते पाहून आणि नाईलाजानेच तिने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि तिच्या चेहऱ्यावरचे भाव अगदी क्षणात पालटले.
"इतकी सारी नाणी... ? ती खुद्कन हसली.
तो आणि ती ... आता मघाशीच्याच तिच्या जागेवर जाऊन बसले.... तीच पहिली रांग आणि पहिलीच खुर्ची.
ती आता फार शांत झाली होती... तासाभरापासून चाललेली तिच्या मनातली अस्थिरता जरा आता स्थिर होऊ लागली होती.इतका वेळ सभोवतालच्या ज्या हालचालींकडे तिने लक्षही दिले नव्हते त्याच ती आता उगाचच पाहण्याचा अट्टहास करत होती. पण त्याचे लक्ष होते फक्त तिच्याकडेच. घड्याळाचा काटा प्रत्येक सेकंदाने पुढे पुढे सरकत होता. असा बराच काळ उलटला. मग त्यानेच त्याच्या मते अर्धवट सुटलेल्या विषयाला हात घातला .
" काय मग, तू काय विचार केला आहेस ?"
 " मी ? विचार ?कशाबद्दल रे ...? तिच्याकडून अगदीच अपेक्षित प्रतिसाद होता हा. 
त्याने पुढे होऊन तिचा हात आपल्या हातात घेतला. त्या स्पर्शाने एक नाजूक शिरशिरी तिच्या नखशिखान्त निर्माण झाली. पण दोघांच्याही चेहऱ्यावर एक वेगळेच स्मित होते.
" अगं , तुझ्याबद्दल...माझ्याबद्दल ...आपल्याबद्दल ... !"
काही क्षण तसेच सरले. हातात घेतलेला हात तसाच होता आणि आणि आश्चर्य म्हणजे तिने तो मागेही घेतला नाही किंवा सोडवण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही. हे पाहून त्याची हिम्मत आणखी वाढली. त्याने लगेच आपला दुसरा हात तिच्या खांद्यावर नेला.
आणि आता मात्र ती बिचकली. तिने लगेच खांद्यावरचा हात झटकून दिला.
" काय हे ! तुला आधीच सांगितले आहे ना मी कि ते शक्य नाही. आपल्या दोघांमध्ये जातीची एक खूप उंच भिंत आहे ती कशी रे तुला दिसत नाही. माझ्या घरी हे अजिबात चालणार नाही आणि मी त्यांना दुखावू शकत नाही."
" स्वतःला दुखावलेले चालते तुला? तुझ्या मनात काही वेगळेच आहे आणि ओठांवर काही वेगळेच. आज बघ , तुझे डोळे तुझीच फितुरी करत आहेत."
क्षणापुर्वी भडकलेली ती पुन्हा शांत झाली. तिच्या मनात विचारांची चक्रे अगदी वेगात सुरु झाली. हा विषय बदलण्यासाठी ती काहीतरी नवीन शोधत होती . तो मात्र तिच्या पुढच्या उत्तराची अपेक्षा करत तिच्याकडेच पाहत राहिला.
" अरे तुझ्या कविता काय म्हणताहेत ? यावेळी तुझ्या कविता ऐकवल्याच नाहीस तू ?
ती हे सर्व इतके सहज बोलत होती हे पाहून त्याला तिचा किंचित राग आला.
"नाही... मी नाही लिहीत आता कविता वैगरे . ते सर्व सोडले मी "
"पण का ?  पूर्वी तर किती छान लिहायचास तू .अगदी मी वैतागेपर्यंत ऐकवत राहायचास मग मी नाईलाजानेच तुझी एखादी कविता खूप छान म्हणायची आणि मग कुठे थांबायचास तू . तुला आठवते हे सर्व ?"
ती एकटीच सांगता सांगता हसत होती , बोलत होती.
"असे काही करू नकोस. पुन्हा लिहायला सुरुवात कर. छान लिहितोस खरेच. मी वाचते ना नेहमी. मला आवडतात फार ."
ती ओघात बोलतच होती. पण पूर्वीच्याच विषयावर अडखळून राहिलेल्या त्याला या नवीन विषयात अजिबात रुची नव्हती. एरव्ही त्याच्या कवितेची स्तुती त्याला खूप आनंदी करायची पण आज तो त्या स्तुतीपासूनही पाठ फिरवू पाहत होता.
" तुला काय फक्त माझ्या कविताच आवडतात. मी तर नाही ना ? मग काय उपयोग या सर्वाचा. माझ्या शब्दांना तुझ्या सुरांची साथ हवी आहे . त्यानंतरच त्याचे एक सुंदर संगीत निर्माण होईल जे माझे स्वप्न आहे. तुझ्याशिवाय ते सारे शब्द फक्तच कागदावर रेखाटलेली, एकटी पडलेली अक्षरे.... "
तिला यावर काय बोलावे सुचेना. इतक्यात त्याच्या विमानाची घोषणा सुरु झाली. पण त्याचे मात्र त्याकडेही लक्ष नव्हते. तिनेच त्याचे लक्ष त्या सूचनेकडे वळवले.
" मला वाटते तुझ्याच विमानाची सूचना आहे ही."
" हो " 
तो इतर काहीही न बोलता तिथून उठला आणि जड पावलांनी चालू लागला. त्याच्या पाठोपाठ ती जात राहिली. अगदी शेवटच्या फाटकाजवळ ते दोघे आले आणि तो तिच्याकडे वळला. त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे एक स्मित होते . ते पाहून तिला आश्चर्य वाटले. पण ती मात्र स्तब्ध होती.
" तुला आठवते , मी तुला म्हणालो होतो त्या दिवशी कि माझी एक ईच्छा आहे - या वेळी तू मला निरोप देण्यासाठी विमानतळापर्यंत यावेस. तू निश्चितच बोल्ड अक्षरांत 'नाही' असेच म्हणाली होतीस. पण आता बघ , नियतीने कसा डाव मांडला आहे. तू मला अगदी शेवटच्या फाटकापर्यंत सोबत देते आहेस.तू सुद्धा एकदा या दृष्टिकोनातून आपला विचार करून बघ जरा . माझी ही इच्छा पूर्ण झालीच आहे ... इतरही नक्कीच पूर्ण होतील यात आता मला कोणतीच शंका नाही . "
तो इतके बोलला आणि त्याचे पाय विमानाच्या दिशेने चालू लागले. पण कितीतरी वेळ त्याची नजर तिलाच पाहत राहिली . आणि ती सुद्धा तिथेच थांबून होती अगदी तो अदृश्य होईपर्यंत.

त्याच्या शेवटच्या वाक्याने तिच्या मनातील विचारांच्या भरतीला उधाण आणले होते. वेगवेगळ्या भावनांच्या लाटा तिच्या चित्तहृदयावर येऊन धडकून मागे सरत होत्या. तिच्याही विमानाची आता वेळ झाली होती. ती आपल्याच स्वप्नांच्या दुनियेत होती.  विमानात शिरतानाचे सारे उपचार अगदी यंत्रवत घडत होते. विमानातल्या खिडकीजवळच्या आसनावर ती बसली होती. एरव्ही विमान , त्यातील रचना , TV या सर्वांचे विशेष आकर्षण वाटणारी ती आज या सर्वापासून अलिप्त होती. कितीतरी वेळ तिने असाच घालवला. काही वेळाने तिने समोरच्या आसनाशी बांधलेला हेडफोन मोकळा करून तो कानाला लावला. नेहमी सर्व चॅनेल्स ची कितीदातरी सैर करणारी ती आज मात्र जॅकबॉक्सच्या एका गाण्यापाशी थांबली-" तेरा होने लगा हूँ...खोने लगा हूँ ... जबसे मिला हूँ..... "
 कोणता चित्रपट ? कोणावर चित्रित ?... या सर्वांशी आज तिला देणेघेणे उरले नव्हते. पण त्या शब्दांनी मात्र तिच्या मनाचा आता अचूक ठाव घेतला होता. त्या गीताच्या ओळींमध्ये तिला तिचे उत्तर गवसत होते. कुठेतरी तिचे मन थांबून तिला एक गोड इशारा देत होते.
' तो क्यू ना मैं भी
 कह दूँ कह दूँ
हुआ मुझे भी प्यार हुआ.... ' 
आकाशातली तिची ही आजची भरारी आज तिच्या आनंदाच्या परमोच्च बिंदूच्या समोर ठेंगणी वाटत होती कारण या दोन तासांच्या प्रवासातील या तीन ओळींसोबत उद्याच्या भविष्यात तिच्या वाट्याला येणारे गोड क्षण कितीदा तरी ती स्वप्नवत अनुभवत होती .

छायाचित्रसौजन्य -निखिल देशपांडे
- रुपाली ठोंबरे .

6 comments:

  1. Khup chhan. 👍👍
    Asha ajun Katha wachayala aawadel. Keep writing.

    ReplyDelete
  2. Ata pudhe kay hoil he vachnyachi utsukta vadhli ahe...khupach mast lihiley

    ReplyDelete
  3. खुप मस्तं. आता भाग ३.

    ReplyDelete
  4. शब्दरचना खूप सुंदर आहे रुपाली प्रत्यक्ष समोर असल्यासारखे भासते, प्रेमाचे नाते हे समजून घेण्यासाठी प्रेमाने लिहिलेले शब्द वाचताना प्रेम जाणवते अशी शब्द रचना आणि भाव यात रुतले आहेत ....

    ReplyDelete
  5. Khup sundar.. vachatana swata aapoaap tyat guntat jaato..

    ReplyDelete

Blogs I follow :