Thursday, March 5, 2015

देत शुभेच्छा होळीच्या रंगांत न्हाऊ द्या आज नात्यांना ।।


( होळी हा एक  महत्वाचा सण… रंग आणि पाणी यांचा मेळ घालून संगीताच्या तालात नाचत बेधुंद होऊन सर्वाना आनंदात एकत्र आणणारा….  )

पौर्णिमेचा चंद्र रंग रुपेरी उधळतो नभात ।
इंद्रधनुही अवतरले खाली उधळीत रंग विश्वात ।।

होळीच्या धगधगत्या अग्नीचा
आज स्पर्श व्हावा अनिष्टाना ।
जाळून सारे, नाश व्हावा अशुभांचा
शुभ पसरावे चोहीकडे उधळीत सुख आनंदात ।।

जग झाले गोकुळ आणि खेळ रंगला गोकुळात
कृष्ण राधा होऊन सारेच न्हातात नवरंगात ।
पाण्यात रंग आणि पाणी रंगांत
उधळीत सारे फेर धरतात तालात ।।

फुले रंगीत आज मुले रंगीत
घर-दार, रस्ते सारे गुलालाने गंधित ।
झाडे-वेली जग सारेच आहे धुंदीत
गात आनंदात बेधुंद रंग-गीत ।।

रंगली आज धरा आणि ती वियोना
होळी घेवून आली रंगांची नवी कल्पना ।
नवे रंग हे जीवनात मिसळून अर्थ द्या जन्मांना
 देत शुभेच्छा होळीच्या रंगांत न्हाऊ द्या आज नात्यांना ।।



- रुपाली ठोंबरे

2 comments:

Blogs I follow :