Tuesday, March 10, 2015

हेमांगीच्या स्पर्शात निखिल झालेली तू माझीच सावली … माझी निर्वी ।।

( एका मैत्रिणीच्या सोनुलीसाठी लिहिलेली एक पाळणारुपी कविता )

मऊ-मऊ बिछान्यावरी
पहुडलेली इवली परी
पाहता ही निर्वी ।

वाटे झाली सारी
स्वप्ने आता पुरी
पाहिलेली आम्ही पूर्वी ।।

पाळणा छान सोनेरी
त्याला किनार रुपेरी
सजला पहा साऱ्या फुलांनी ।

झेंडू-गुलाबाच्या पाकळ्यांनी
मोगऱ्याच्या सुगंधी गजऱ्यानी
हालविते त्याला निशिगंधाची शुभ्र दोरी ।।

मधातल्या बोटावानी गोड, हसरी-गोजिरी
आली अशी तू या घरी
पुससि सारे कोण ही पाहुणी गोरी ।

पाहण्यास तिला गर्दी आली भारी
घेण्या गं तिला आतुरली सारी
नजर न लागो दृष्ट काढा गं सोनुलीची ।।

आणत या घरा दिवाळी
आली का तू परत सीतामाई ।
तुला पाहता म्हणे आजी
लक्ष्मी आलिया गं दारी ।।

रुक्मिणी का तू कुठे तुझी कान्हाई
कि आहे तू ज्ञानोबाची मुक्ताई ।
घर झाले आज गोकुळ
आहे का तू राधा कृष्णाची ।।

सौंदर्याचे रूप तुझ्या ठायी
घेवून आली का तू विद्येची शिदोरी ।
सर्व संकट निवारी
तू आहे का महिषासुरमर्दिनी ।।

पाळण्यात जो-जो हालवीत वदे बाळाची आई ,

" भाग्य उजळले, आणि तू आली माझ्या घरी
  धन्य झाले मी आज, तुला मिळवून खरी ।

  अमुच्या प्रीतीच्या अंबरी,  नक्षत्र तू रुपेरी
  कुटुंबाच्या भव्य सागरी, मोती तू या शिंपली ।

  आम्ही दोघे राजा-राणी, तू आमची राजकुमारी
  संसाराच्या वेलीवरी उमललेली तू रातराणी ।

  आनंदले मी खूप आज, उन्हात सांडल्या सुखाच्या सरी
  स्वप्नातले जग सारे हातात पाहून उसळल्या आनंदलहरी ।

  जीवनाच्या पानांत शब्द अमुचे घेवून, जन्मलेली कादंबरी
   हेमांगीच्या स्पर्शात निखिल झालेली तू माझीच सावली … माझी निर्वी ।। "


- रुपाली

No comments:

Post a Comment

Blogs I follow :