Tuesday, March 17, 2015

या सुट्टीत नक्की जाऊया अशाच एका गावाला

( आपल्या लहानपणी आपल्याला जे सहज मिळाले ते कदाचित आजच्या मुलांसाठी स्वप्नच असेल. आजच्या गगनचुंबी इमारतीतील घरांमध्ये आता पूर्ण मोठ्या कुटुंबासाठी जागाच नसते. अशा वेळी आजची घरे लहान कि मन लहान होत चालले हि भावना आल्यावाचून राहत नाही . प्रत्येक सण  म्हणजे अगदी सामाजिक एकतेचे प्रतिक असायचा . गल्लीतला गणपती म्हणजे आपल्या घरातच मोठा उत्सव असे वाटायचे. दिवाळीला १ महिना अवकाश असल्या पासूनच घराघरांतून फराळांच्या तळणीचा घमघमाट असायचा . आता दिवाळी म्हणजे चायनीज दिवाबत्तीने घर उजळायचे, ठसे उमटवत ५ मिनिटांत एखादी रांगोळी उरकावावी , मॉलमध्ये लागलेल्या सेलमधुन मोठ्ठी खरेदी आणि फराळ म्हणून बाजारात मिळणारी मिठाई आहेच  . आणि शुभेच्छा म्हणाल तर अगदी शेकडो मिळतात फेसबुक ,व्होट्सअपवर पण दूर गावावरून फक्त आपल्यासाठी आलेलं पत्रं मात्र आज हरवलंय. स्पर्धा ,संगणक ,मोबाईल,इंटरनेटच्या या जगात आज  मुलांचं तर खरं जीवनच हरवलंय. संध्याकाळी देवापुढे 'शुभं करोति' म्हणणारा चिंटू आता क्वचितच पाहायला मिळेल. सुट्टी म्हणजे नेमके काय हे कदाचित त्यांना आपण कळूनच देत नाहीत.आपल्या लहानपणी मिळून आणलेल्या खाऊच्या चवथ्या भागातही जे सुख मिळायचे ते त्यांना अख्ख्या पिझ्झातुनही मिळत असेल का ? मोठ्या कुटुंबात वाढलेली तनया आज आजी-आजोबांच्या प्रेमालाच काय तर आजच्या धकाधकीच्या जीवनात चिमुकलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी सतत बाहेर असलेल्या आई-वडिलांच्या प्रेमालाही पारखी झाली आहे. आणि मग तेव्हा भरपूर सुख सोयी असून सुद्धा असले एखादे स्वप्नं हळूच त्या चिमुकल्याच्या गाढ झोपेत डोकावून जाते . )


आई , मला काल पडलं एक स्वप्न ।
गेलो मी कुठेतरी, जिथं नव्हतं कोणी आपलं ।।

ओळख नाही तरी सांगतो, झाले नाहीत हाल ।
खुप मज्जा केली मी, तिथं आहे सर्व छान छान ।।

तिथं नव्हतं इथल्यासारखं इमारतीचं जाळं ।
जो-तो तिथं म्हणतो घरच माझी चाळ ।।

एवढ्याशा चौकोनात राहतात, आजी आजोबा आणि  भावंडही  दोन ।
कोणी नाही ,करमत नाही ,एकटा म्हणून कोणी करत नाही फोन ।।

तिथल्या मुलांना माहितच नाही मोबाईलवरचा गेम ।
पण लगोरी ,गोटया खेळताना चुकत नाही त्यांचा नेम ।।

भली मोठ्ठी असते गं आई त्यांची उन्हाळ्याची सुट्टी ।
नाही तेव्हा क्लासेस , असते ती फक्त मज्जा करण्यासाठी   ।।

पिझ्झा -नुडल्सची चव कदाचित माहित नसेल कुणाला।
पण  "वदनी कवळ घेता" म्हणत घेतलेला घास मला आवडला  ।।

दिवाळी असो वा होळी साजरी करतात सर्वच एकत्र ।
आता का नाही येत शुभेच्छेसाठी तसे एखादे पत्र ।।

गाव कोणते ते नाव मला नाही ठाऊक ।
पण तिथल्या आपुलकीने झालो मी पुरता भावुक  ।।

आई , अगदी खरं खरं सांगतो मी तुला ।
खूपच छान आहे तिथं, जायचंय मला पुन्हा ।।

तुला पण आवडेल नक्की ,खात्री आहे मला ।
या सुट्टीत नक्की जाऊया अशाच  एका गावाला ।।

- रुपाली ठोंबरे

1 comment:

Blogs I follow :