Monday, March 7, 2016

एक अर्थपूर्ण दर्शन

आज महाशिवरात्री. सर्व भक्तजनांच्या भोळ्या शंकराचा खास दिवस .पहाटेच उठून जवळच्याच शंकराच्या मंदिरात गेले . हातात फूल-बेलपत्रांचे ताट आणि दूध घेऊन शेकडो लोक रांगेत उभे होते .मंदिर फुलांच्या माळांनी छान सजले होते. वातावरण फुलांच्या सुगंधाने आणि शिवस्तुतिच्या मधूर संगीताने प्रसन्न झाले होते. दीर्घ प्रतिक्षेनंतर फूल,बेलपाने आणि दूधाचा सततचा अभिषेक स्विकारत प्रसन्न शिवपिंड पाहिली आणि मनास हायसे वाटले.

 पण माझे लक्ष माझ्या पुढे उभ्या असलेल्या एका तरुणाकडे नकळत वेधले गेले … ते त्याने केलेल्या एका कृतीमुळे . दर्शन तर सारेजण घेत होते पण हा तरुण शिवपिंडीसमोर असलेल्या नंदीच्या उजव्या अंगाला बसून नंदीची दोन्ही शिंगे आणि त्यांवर ठेवलेली तर्जनी आणि अंगठा अशी दोन बोटे, यांच्यामधील पोकळीतून शिवलिंग न्याहाळत दर्शन घेत होता. मला हे दृश्य पूर्वी एका हिंदी मालिकेच्या शिर्षक गीतात पाहिल्यासारखे जाणवले. मी त्याला न राहवून त्याबद्दल लगेच विचारले आणि त्याने उत्तर दिले- शृंगदर्शन.

माझा प्रश्नार्थक चेहरा पाहताच तो हसतच मला म्हणाला ,
" ताई, शिवाच्या पिंडीतून प्रक्षेपित होणारे तेज हे सर्वसामान्य पूजकाला पेलवणारे नसते, त्यामुळे शिवपिंडीचे दर्शन घेतांना ते नंदीच्या दोन्ही शिंगातून घ्यावे असे शास्त्र सांगते. नंदीच्या उजव्या अंगाला बसून किंवा उभे राहून डावा हात नंदीच्या वृषणावर ठेवावा. उजव्या हाताची तर्जनी (अंगठ्याच्या जवळचे बोट) आणि अंगठा नंदीच्या दोन शिंगांवर ठेवावे. दोन्ही शिंगे आणि त्यांवर ठेवलेली दोन बोटे यांच्यामधील पोकळीतून शिवलिंग न्याहाळावे.नंदीच्या वृषणाला हात लावणे म्हणजे, कामवासनेवर नियंत्रण ठेवण्यास शिकणे. शिंग हे अहंकार, पौरुष आणि क्रोध यांचे प्रतीक आहे. शिंगांना हात लावणे म्हणजे अहंकार, पौरुष आणि क्रोध यांवर नियंत्रण ठेवायला शिकणे. 

आता तुम्ही म्हणाल, याचा काय फायदा? 
तर शिवाच्या पिंडीतून प्रक्षेपित होणारे तेज सहसा सर्वसामान्य व्यक्‍त‍ीला न पेलवणारे असते. नंदीच्या शिंगांतून प्रक्षेपित होणार्‍या शिवतत्त्वाच्या सगुण मारक लहरींमुळे व्यक्‍त‍ीच्या शरिरातील रज-तम कणांचे विघटन होऊन व्यक्‍त‍ीची सात्त्विकता वाढण्यास साहाय्य होते. त्यामुळे शिवाच्या पिंडीतून बाहेर पडणार्‍या शक्‍त‍ीशाली लहरी पेलवणे व्यक्‍त‍ीला शक्य होते.शिवाय उजव्या हाताची तर्जनी आणि अंगठा नंदीदेवाच्या शिंगांवर टेकवल्याने निर्माण होणार्‍या मुद्रेमुळे भाविकांना आध्यात्मिक स्तरावर अधिक लाभ होतो.
अशा प्रकारे केलेल्या मुद्रेमुळे शक्‍त‍ीची स्पंदने संपूर्ण शरिरात पसरतात.सामान्य व्यक्तीने शृंगदर्शनाविना दर्शन घेतल्यास तिच्यावर शारीरिक,मानसिक आणि अध्यात्मिक दुष्परिणाम होण्याचा संभव असतो."

ही नवी माहिती ऐकत ऐकत जेव्हा नंदीपाशी मी पोहोचले तेव्हा मीही आज शृंगदर्शनाचा अनुभव घेतला. दोन्ही शिंगे आणि बोटांच्या पोकळीतून शिवपिंडीचे दर्शन घेताना एक वेगळेच समाधान मिळत होते. 

इतक्यात तो तरुण नंदीसमोर बसलेल्या एका लहान मुलीला उठवू लागला. 
"बाळा , असे पिंडीचे दर्शन घेत असताना नंदी आणि पिंडीच्या मध्ये बसू अथवा उभे राहू नये.पिंडी अन् नंदी यांना जोडणार्‍या रेषेच्या शेजारी इथे उभी राहा " म्हणत त्याने त्या मुलीला बाजूला उभे केले. 

"शिवाकडून येणार्‍या शक्‍त‍ीशाली सात्त्विक लहरी प्रथम नंदीकडे आकृष्ट होऊन नंतर नंदीकडून वातावरणात प्रक्षेपित होत असतात. नंदीचे वैशिष्ट्य म्हणजे नंदीकडून या लहरी आवश्यकतेप्रमाणेच प्रक्षेपित होत असतात. त्यामुळे पिंडीचे दर्शन घेणार्‍याला प्रत्यक्षात शिवाकडून लहरी मिळत नाहीत; त्यामुळे त्याला शिवाकडून येणार्‍या शक्‍त‍ीशाली लहरींचा त्रास होत नाही. येथे लक्षात घ्यायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे, शिवाकडून येणार्‍या लहरी सात्त्विकच असल्या, तरी सर्वसाधारण व्यक्‍त‍ीची आध्यात्मिक पातळी अधिक नसल्याने त्या सात्त्विक लहरी सहन करण्याची क्षमता तिच्यात नसते़ त्यामुळे त्या लहरींचा तिला त्रास होऊ शकतो." माझ्याकडे पाहत माझ्या न विचारलेल्या प्रश्नालाही त्याने हवे तसे उत्तर दिले. 

पुढे आम्ही दोघे एकदमच गर्दीच्या इतर लोकांसोबत गाभाऱ्यात पोहोचलो. तिथे प्रत्येकच जण पूजा करून आणि पिंडीला अर्धप्रदक्षिणा घालून बाहेर पडत होते. मीही पिंडीशेजारी पोहोचले. अक्षतांकडे निर्गुण ईश्वरी तत्त्वाशी संबंधित उच्च देवतांच्या लहरी आकर्षिल्या जातात; म्हणून अधिकाधिक निर्गुणाशी संबंधित असलेल्या शिवाला त्याच्या पांढर्‍या रंगाशी साधर्म्य असलेल्या पांढर्‍या रंगाच्या अक्षता,त्याचप्रमाणे शाळुंकेला निशिगंध, जाई, जुई, मोगरा यांसारखी १० पांढरी फुले, त्यांचे देठ पिंडीकडे करून वाहिली. उदबत्ती आणि अत्तर यांतून प्रक्षेपित होणार्‍या गंधलहरींकडे देवतांच्या लहरी लवकर आकृष्ट होतात; म्हणून शिवपूजेत केवडा, चमेली किंवा हीना या शिवाला प्रिय असणार्‍या गंधांच्या उदबत्त्यांनी तीन वेळा ओवाळले. "हळद-कुंकू उत्पत्तीचे प्रतीक आहे; म्हणून लयाची देवता असलेल्या शिवाला इतर देवतांप्रमाणे हळद-कुंकू वाहत नाहीत. तसेच  शाळुंकेच्या स्रोतातून शक्ती बाहेर पडत असल्याने सर्वसाधारण भाविकाने तो स्रोत वारंवार ओलांडल्यास त्याला शक्तीचा त्रास होऊ शकतो; म्हणून शिवपिंडीला अर्धप्रदक्षिणाच घालावी", असे एकदा माझ्या आजीने मला सांगितले होते. त्याप्रमाणे मीही अर्धप्रदक्षिणा घातली आणि बाहेर आले. आधीच ठरवल्याप्रमाणे मी सोबत आणलेले दूध एका याचकाच्या मुलाला प्यायला दिले. 

त्या तरुणाचे आभार मानणार इतक्यात त्यानेच मला एक प्रश्न विचारला ," आता काही वेळापूर्वी तुम्ही शिवाला एका विशिष्ट पद्धतीने उपडे बेलपान वाहिले? यामागचे कारण माहित आहे का ?

नक्कीच याबद्दल फारशी कल्पना नसलेल्या मला पुन्हा तो बेलपत्राचे महत्व सांगू लागला. 

" त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रयायुधम् ।
  त्रिजन्मपापसंहारं एकबिल्वं शिवार्पणम् ।।
सत्त्व, रज आणि तम यांमुळे उत्पत्ती, स्थिती अन् लय उत्पन्न होतात. कौमार्य, यौवन आणि जरा या अवस्थांचे प्रतीक म्हणून शंकराला बिल्वपत्र वहावे, म्हणजे या तिन्ही अवस्थांच्या पलीकडे जाण्याची इच्छा प्रगट करावी; कारण त्रिगुणातीत झाल्याने ईश्वर भेटतो.शिवाला त्रिदल बेल आवडतो, म्हणजे जो आपले सत्त्व, रज आणि तम हे तीनही गुण शिवाला अर्पण करून समर्पण बुद्धीने भगवत्कार्य करतो, त्याच्यावर शिव संतुष्ट होतो.सर्वसाधारण व्यक्तीला ईश्वराच्या निर्गुण, निराकार रूपाची उपासना करणे कठीण असते. बेल आणि दूर्वा यांसारख्या गुणातीत अवस्थेत राहून कार्य करणार्‍या पत्रींच्या साहाय्याने सगुण भक्ती करत, भक्ताला सगुणातून निर्गुणाकडे जाणे सुलभ होते.बेलाच्या पानाचे देठ पिंडीकडे आणि अग्र (टोक) आपल्याकडे करून जेव्हा आपण बेलपत्र वहातो, तेव्हा बेलपत्राच्या अग्रावाटे शिवाचे तत्त्व वातावरणात पसरण्याचे प्रमाण अधिक असते. या पद्धतीमुळे समष्टी स्तरावर शिवतत्त्वाचा लाभ होतो. याउलट बेलाच्या पानाचे देठ आपल्याकडे आणि अग्र (टोक) पिंडीकडे करून जेव्हा आपण बेलपत्र वाहतो, तेव्हा देठाच्या माध्यमातून शिवतत्त्व केवळ बेलपत्र वाहणार्‍यालाच मिळते. या पद्धतीमुळे व्यष्टी स्तरावर शिवतत्त्वाचा लाभ होतो.बेलाचे पान शिवपिंडीवर उपडे वाहिल्यावर त्यातून निर्गुण स्तरावरील स्पंदने अधिक प्रमाणात प्रक्षेपित होतात. त्यामुळे बेलाच्या पानाचा भाविकाला अधिक लाभ होतो. शिवाला बेल ताजा न मिळाल्यास शिळा चालतो; परंतु सोमवारचा बेल दुसर्‍या दिवशी चालत नाही."

आज गेली कित्येक वर्षे जग करते म्हणून किंवा आईने सांगितले म्हणून करत असलेल्या शिवपुजेतील कितीतरी गोष्टींचा उलगडा मला झाला. आणि त्या तरुणाचे अगदी मनापासून आभार मानत मी मंदिराबाहेर पडले… एक समाधानाचा प्रसन्न भाव मनात घेऊन.

- रुपाली ठोंबरे 

(या लेखातील बराच माहितीपर भाग http://www.sanatan.org वरून आहे. अशा प्रकारच्या अधिक माहितीसाठी या साईटला त्वरित भेट द्या आणि माहिती मिळावा जे आजपर्यंत माहित नसलेल्या गोष्टींची.)





2 comments:

  1. Sahi yaar...thoda thoda mahiti hota pan aaj knowledge madhe ajun bhar padali...super rupali!

    ReplyDelete
  2. Nice Rupali .....................knowledge madhe bhar padli :)

    ReplyDelete

Blogs I follow :