महाराष्ट्र...माझी मायभूमी 
मराठी... माझी मायबोली.  
माझ्या मंगलदेशाची मानलेली मायच... माझी मराठी 
मातीत माखलेल्या मुक्या मुलात मुरणारी... माझी मराठीच 
मुळाक्षरांच्या मोजक्या मेखलांनीही मोहवणारी... माझी मराठीच 
माऊलींनी मूलतत्त्वाचे  मर्म मोगरे माळले... माझ्या  मराठीतच 
मुकुंद-महागणपती-महेशाचे मंजूळ मनन ... माझ्या मराठीतच 
 मंदिरातील मृदूंग मागतो मोक्षमुक्ती मार्ग ... माझ्या मराठीतच 
मीरा-मुकुंद मूर्तिमंत माया म्हणते मन माझे... माझ्या मराठीतच
महाराजांची मेघडंबरी मानात म्हणे महिमा...माझ्या मराठीचाच  
मोकळ्या म्यानांनी म्लेच्छांचा मारा मावळती मावळातील मर्द मराठे...मराठी मातीचेच 
मोतियांच्या मल्हारवारीमध्ये मल्हारी मार्तंडाचा मुरळ्यांनी मांडला   मेघमल्हार...माझ्या  मराठीतच   
मांडवात मुहूर्तावर मंगलमयी मंगलाष्टकांच्या मंत्रमाळा...माझ्या मराठीतच  
मेंदीसंगे मुंडावळ्यांत मापाप्रसंगी मुखे मांडते मालिनी  ... माझी मराठीच 
मंतरलेल्या मधुभेटींच्या मनोहारी मृग-मिलनात मोहोरते... माझी मराठीच 
माहेराचे मीपण मधात मंथून मिसळले मोठया महाली...माझ्या मराठीतच   
मितभाषी मंजिरी माझ्या मानसीची मैत्रीण माळते माळा मनाशी... माझ्या मराठीतच 
मदन मित्र मयूर मेघवर्षावात मिरवतो मनोरथ-मनोरे मानसीचे... माझ्या मराठीतच   
माणुसकीच्या मंचावरती माणूस म्हणून मारतो मायेची मिठी... माझ्या मराठीतच 
माड्या-मळ्यांमध्ये मुलुख-मुशाफिरांमध्ये महोत्सवाची मौक्तिके... माझ्या मराठीतच      
म्हणूनच म्हणते मानाने, 
  महाराष्ट्र...माझी मायभूमी 
    मराठी... माझी मायबोली !!!
जागतिक मराठी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
जागतिक मराठी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
  - रुपाली ठोंबरे. 

 


 
मस्त शब्दरचना
ReplyDeleteमस्त
ReplyDeleteखूप छान
ReplyDelete