Saturday, February 7, 2015

स्वप्नपाकळी

स्वप्नपाकळी

( प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न असते जे नयनरुपी पाकळीत वर्षानुवर्षे आपण बाळगत असतो.
ते स्वप्न पुर्ण करण्याचा प्रयत्न करताना अनेकदा अपयशाचाही सामना करावा लागतो.
पण तीव्र इच्छा असेल तर तुटून न जाता स्वप्नपूर्तीचा ध्यासच मनात असावा. 
असेच एक स्वप्न……)



इवल्याशा पाकळीत दडले स्वप्नविश्व माझे ।
कुणास ठाऊक, कधी होईल हे भविष्य माझे ।।

घरकूल असावे सुंदर,इवलेसे परि मंगल ।
हे असावे प्रेमसागर ,नसावी रिकामी घागर ।।
नाही भांडण नाही बंधन, असावे हे शांतीसदन ।
शुभसकाळी करुनि वंदन, सुदिनाला होतसे प्रारंभ ।।

सुख-दुःखाला असे थारा, कुटुंब माझे संसार सारा ।
नाही चढतसे कधी पारा, सदा वाहती प्रेमधारा ।।
नसे प्रेमापासून पारखा, हा जीव जिव्हाळ्याचा ।
सखी माझी आशा-निराशा,जन्म देते नवस्वप्नाला ।।

यशापयश नाचते अंगणी, लुकलुकते मी चांदणी ।
बनुनि कधी मंद  तर कधी तेजस्विनी ।।
तेलावाचून विझणारी ज्योती नजरेस पडली ।
अन जगी प्रकाश अर्पाया सुदैवी ठरली ।।

नाजूकसाजूक नयनपाकळ्या परी, स्वप्न विशाल गड्या।
म्हणुनि पाहुनि या जगा, नसे याला आसरा ।।
म्हणुनि ओघळले हे गालांवरुनी बनुनि अश्रुधारा ।
संपताच ही वर्षा, सज्ज झाले सहण्यास वैशाख-वणवा ।।  


- रुपाली ठोंबरे

No comments:

Post a Comment

Blogs I follow :