Monday, February 9, 2015

भूत-भविष्याची अनोखी किमया

भूत-भविष्याची अनोखी किमया

( तसे पहिले तर भूतकाळ कधीच विसरता येत नाही आणि कुठेनाकुठे आज हा त्या गत काळासोबत जोडलेला असतो . पण म्हणून भूतकाळाच्या आठवणींत वेळ घालवला तर उदया आज भूत्कालात समाविष्ट झाल्यावर या आजला पाहून त्यावेळी फक्त पश्चातापाची वेळ येते.)


वाट  आहे ही नव्या आजची
साथ असे परि जुन्या कालची
जुना काल न दिसे कुणासी
नवा आज परि जुळे तयासी ।।

तिमिरातुनी जरी तेजास ही वाट चालली
पाठलाग करी भूतकाळी दाट सावली
उदात्त मरिचि सदा प्रसन्न
कोणा न कळे तरी का मन खिन्न ।।

फुलकळ्या आशास्वप्नांची
गुंफूनी होत्या काल मनाशी
आज जीवनी नवकळ्या उमलल्या
हार बनुनि मज संगे खेळल्या ।।

विस्कटून सुकलेली तीच सुमने
टोचती मनी हरलेली स्वप्ने
अश्रूंसवे वाहून जाता सारे
मनी प्रविशले नवआशांचे वारे ।।

पावलांनी तुडवली आज भूतछाया
माथ्यावरी सूर्य परि जाळी आज काया
आज काल बनुनि समर्पिला या वलया
अनुभवण्या भूत-भविष्याची अनोखी किमया ।।

 -  रुपाली ठोंबरे

No comments:

Post a Comment

Blogs I follow :