Friday, February 27, 2015

प्रवास रोजचा …भाग ३

प्रवास रोजचा …भाग ३

 
या शिवाय डब्यात इतर विक्रेत्यांचीही ये जा सुरु असते. आताही एक बांगडीवाली हजर आहे. मग गरज नसेल तरी
"अगं, इथे ये"
म्हणत तिच्या हातातला तो लखलखत्या बांगड्यांचा डबा हातात घेतला जातो. लाल ,हिरव्या ,केशरी,गुलाबी,सोनेरी मोत्यांच्या अशा विविध प्रकारच्या बांगड्या जोडीने रचून ठेवलेल्या असतात. आणि मग ते पाहून खरेदी करायची नसेल तरी नेत्रसुखासाठी तरी प्रत्येकजण त्या बांगड्यांवर तुटून पडते.
"कित्ती छान आहेत ना या मोत्यांच्या बांगड्या . या कितीला देतेस? " गोरेमावशी एक सुंदर मोत्यांनी घडवलेली जोडी उचलत विचारतात.
रंगबिरंगी टिकल्यांचा एक डबा निशाकडे देत ती बांगड्यांची किंमत सांगते.
मग कोणीतरी लगेच " बापरे ! फारच महाग कि गं! आमच्या डोंबिवलीला किनई याच्या अर्ध्या किमतीत मिळतील. गोरे मावशी मी आणून देते उद्या तुम्हाला हवे तर". 
विकणारी या अस्सल डोंबिवलीकर असलेल्या या मुलीकडे दुर्लक्ष करत मावशींकडे आशेने पाहू लागते.
आता गोरे मावशी थोडया विचार करू लागतात. मनातल्या मनात खूप आवडत असूनही चेहऱ्यावर तसा अविर्भाव आणता म्हणतात ,
" हे बघ , विकत घेण्याचा काय तो भाव सांग लवकर. मला उतरायचे आहे पुढच्या स्टेशनवर. नाही तर मग राहू दे."
मग ती थोडीफार किंमत कमी करून सांगते. हि नव्याने सांगितलेली किंमत नेहमीच गिऱ्हाईकाच्या अपेक्षेपेक्षा थोडी जास्तच असते.
"काय ? नाही नाही. थोडे आणखी कमी करत असशील तर मी पण घेईल बघ " असे आश्वासन देत पार खिडकीकडे बसलेली एक तरुणी  लगेच या खरेदी-विक्रीच्या सोहळ्यात सामील होते.
हे पाहून मावशीनं पण हुरूप आला आता.
"हो.  बरोबर भाव लावला तर मी आणखी घेईन मग. मला दोन नाती आहेत. दोघींनाही  जोडया होतील "     

जराशी पण ओळख नसलेल्या त्या तरुणीला जणू मावशीचे अख्खे कुटुंब माहित या अविर्भावात मावशी सांगत असतात. कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी संवाद हे लोकलचेच काय तर मुंबईचेच वैशिष्टय आहे.
      आता तीन अधिक एक एकूण चार असे आमिष दाखवल्यावर मग तीही आपला नफा मापून तोलून १०-२० रुपये मागे घेऊन बांगडया देते. मग एकदाचे पैसे हातात पडले कि ती सुटकेचा निश्वास टाकत चेहऱ्यावर वेगळेच समाधान आणत नव्या उमेदीने दिवसाला सुरुवात करते.
विकत घेतल्यानंतरची या ग्रुपमधील कुजबुजही फार मजेशीर असते. मावशी आमच्या अजूनही टेन्शन मध्ये आहेत. क्षणापूर्वी केलेला व्यवहार योग्य कि अयोग्य या कात्रीत त्या आहेत.
"घाई केली का मी? थोडे आणखी कमी सांगितले असते तर दिले असते ना तिने ? महागच पडल्या. "मावशी थोड्याशा पश्चातापाच्या सुरात म्हणाल्या.
" नाही हो मावशी , इतक्या स्वस्त नाही मिळत कुठेही. आमच्या इथे याच दुप्पट किमतीला मिळतील." ती डोंबिवलीकर मावशीच्या शंकेचं निरसन करत अगदी सहज बोलून गेली.
हिनेच आमच्या इथे अर्ध्या किमतीला मिळतील असे म्हणून मावशींच्या मनात पश्चातापाचे बीज रोवले होते हे मात्र ती विसरली. मी मात्र काही कालावधीनंतर बदललेल्या बोलण्यातील तफावत बघून कोडयात पडले. नक्कीच मावशीचे टेन्शन दूर करण्यासाठी आणि समाधान मिळावे म्हणून केलेले तिचे प्रयत्न असावेत.
"जाऊ दे. आता घेतले ना. यापेक्षा कमीला नाहीच मिळाले असते. आणि ३ महिने पण टिकले तरी पैसे वसूल."
असे मावशी स्वतःलाच समजावत त्यातले एक एक कंकण आपल्या गोऱ्या करकमलाच्या देठावरती पुढे सरकवतात. आणि मग स्वतःच
"किती छान दिसतात ना घातल्यावर "
म्हणत स्वतःची प्रशंसा सुरु करतात. आणि मग सर्व जणी मावशीने माळलेल्या फुलांपेक्षा अधिक स्तुतिसुमने उधळतात. मग ती प्रशंसा बांगडीची कमी आणि तिला शोभणाऱ्या साडी, इतर दागिने पार चपलेपर्यन्त होते .
"अरे तुम्हीच इतक्या छान . काहीही घाला. तुमच्यावर छानच दिसेल "
 अशी हवी असलेली प्रतिक्रिया मिळवत या खरेदीचा शेवट होतो .
अशा प्रकारची १०-२० रुपयांसाठी चालणारी घासाघीस आणि त्यातुन मिळणारा 'हा आनंद रोजच या डब्यात पाहायला मिळतो. 
         मी खूप वेळापासून बाहेरच्या मोकळ्या जागेत उभी राहून हा कार्यक्रम पाहत आहे. आता डबा बऱ्यापैकी मोकळा झाल्याने जाहिरातींनी सजवलेल्या डब्याच्या भिंती सहज डोळ्यांसमोर आल्या . आणि मग ‘स्वस्त दरात अमक्या ठिकाणी घर आणि त्यावरही आकर्षक सुट’,’वर्षानुवर्षे दिसणारे वजन कमी करण्याचे स्वप्न आता पूर्ण’ किंवा ‘घरबसल्या मोठ्या पगाराची नोकरी’ अशी नाना तऱ्हेची आश्वासने देणाऱ्या या जाहिराती पाहून मनात अचानक सुरु झालेली विचारचक्रे आता गाडीच्या चाकांपेक्षाही वेगाने धावू लागली . खाली पायांशेजारी ५-५ अशा उलट सुलट तिरप्या पर्णाकृती रेषांनी रचलेली रांगोळी उन्हाच्या प्रकाशात चमकत लक्ष वेधून घेण्यात शेवटी यशस्वी ठरली. डोक्यावर डब्यात आता उभ्या असलेल्यांची संख्या कमी झाल्याने काही काळ विश्रांती मिळाल्याने आनंदाचे झोके घेत कड्या गाडीच्या वेगासोबत एका तालात ,एका नादात डुलत आहेत. मी उगाचच दरवाजाशेजारी छतावर असलेले 'उपनगरीय रेल्वे मानचित्र ','आपत्कालीन फोन नंबर','खिडकीशेजारी खाली लटकणारी चेन ' न्याहळते आहे.
          इतक्यात मला जागा देणारी बाई उठते आणि मी मोठ्या आनंदाने आसनाधीन होते. फोर्थ सीटच ती.शिवाय माझ्या आसपास खात्यापित्या घरच्या बायका असल्याने पूर्वी म्हटल्याप्रमाणे मला जरा जास्तच तडजोड करावी लागत आहे. त्यात laptopसारखी इथे नको ती वस्तू मिरवत अशी तडजोड करणे म्हणजे महाकठीण. अशा प्रकारे बसण्याचा अट्टहास करण्यापेक्षा पुन्हा मोकळ्या हवेत जायचे का?, असा सौम्य विचारही मनाला हळूच स्पर्शून गेला. पण अथक प्रयत्नांनंतर मिळालेल्या या सीटचा मोह काही कमी झालेला नाही आणि तेवढाच पाठीला आराम म्हणून मी तिथेच चिकटून राहिले. मग तसेच स्वतःला या एवढयाशा जागेत सामावून घेण्याचा प्रयत्न सफल होईपर्यंत माझे स्टेशन कधी आले हे कळलेच नाही.
          गाडी स्टेशनवर पोहोचताच मी माझ्या लोकल प्रवासाच्या अनुभवांच्या मनातील वहीत आजचे नवे पान जोडत काहीशा निर्विकार भावनेने बाहेर पडून चालू लागले.

- रुपाली ठोंबरे

1 comment:

Blogs I follow :